Water Conservation : प्रत्येक शेत म्हणजे लघू पाणलोटच!

Watershed Management : महाराष्ट्रामध्ये पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र मोठे असून, त्यातील पिकेही पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. कमी पाऊस किंवा त्यातील मोठे खंड यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान होते.
Watershed Management
Watershed ManagementAgrowon

Water Management : भारत हा मोसमी हवामानाचा प्रदेश असून, प्रामुख्याने खरीप हंगाम त्यावर अवलंबून असतात. मात्र पावसाचे उशिरा आगमन, पावसात मोठे खंड, अयोग्य वितरण व परतीच्या पावसाची लवकर वापसी अशा अनेक बाबींचा फटका पिकांना बसताना दिसतो. जून ते सप्टेंबर मध्यापर्यंत मिळणारा पाऊस मोसमी पाऊस, तर सप्टेंबर मध्यापासून ऑक्टोबरपर्यंत मिळणारा परतीचा पाऊस समुद्रातील उष्ण पाण्याच्या प्रवाहाच्या स्थितीवर (अल निनो आणि ला निनो) निर्भर असतो. ‘अल निनो’ कालावधीमध्ये सामान्यतः पावसाची वाट पाहावी लागते, संपूर्ण खरीप हंगामात पावसात २ किंवा ३ मोठे खंड पडतात.

‘ला निनो’ म्हणजे न मागता पाऊस पडणार. यामध्ये खंड पडण्याचे प्रमाणही अगदी नगण्य असणार. या वर्षीच्या हवामान पूर्वानुमानुसार, पावसाळ्यात ला निनो प्रणाली कार्यरत असणार आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर येऊन प्रमाण सरासरीइतके किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता गृहीत धरून शेतकऱ्यांनी नियोजन केले पाहिजे. पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतात जिरवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा या दोन्हींबाबत सजग राहणे क्रमप्राप्त आहे. विशेषतः प्रत्येक शेत म्हणजे लघू पाणलोट ही संकल्पना राबवणे गरजेचे झाले आहे.\

शेताच्या उताराला आडवी पेरणी

शेतात पडलेले पावसाचे पाणी ज्या दिशेने शेतातून वाहून जाते, त्या दिशेच्या विरुद्ध दिशेने पेरणी करावी. त्यामध्ये ठरावीक अंतरावर डवरणीच्या वेळी डवऱ्याच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून मृत सऱ्या (Dead Furrow) पाडून घ्याव्यात.

जर शेतात पडणारे पावसाचे पाणी, वेगवेगळ्या दिशेने २ ते ३ बाजूकडे जात असल्यास अर्धचंद्रकोर पद्धतीने (कंटूरवर) पेरणी करावी. त्यातही प्रत्येक ६ ते ८ ओळींनंतर मृत सरी काढण्यासाठी जागा ठेवावी. यामुळे कमी पावसाच्या स्थितीत पाण्याचे मूलस्थानी संवर्धन आणि जास्त पावसाच्या स्थितीत अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो.

Watershed Management
Integrated Watershed Management : एकात्मिक पाणलोटचा ५० टक्के निधी अखर्चित

प्रचलित पद्धतीमध्ये मृत सऱ्या पाडणे

नेहमीसारखी पेरणी केल्यास शेतात प्रत्येक सहा ओळींनंतर उभ्या पिकात दोन ओळींमधील जागेत मृत सऱ्या काढाव्यात. डवरणीनंतर डवऱ्याच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून मृत सऱ्या काढणे सोपे जाते.

निचरा न होणाऱ्या शेतात अवजारे वापर

सबसॉयलर ः दीर्घ काळ पावसाचे पाणी साचून राहणाऱ्या (पानबसन, चिबड अथवा चोपण) शेतात जमिनीची मशागत आटोपल्यानंतर (म्हणजेच शेत पेरणीसाठी तयार झाल्यानंतर) ट्रॅक्टरचलित सबसॉयलर या अवजाराद्वारे प्रत्येक ३.५ ते ४ फुटांवर जमिनीखालून १.५ ते २ फूट खोलीवरून भूमिगत चर पाडून घ्यावा. म्हणजे अतिरिक्त पाण्याचा निचरा वेगाने होईल.

पेरणीसाठी बीबीएफ यंत्राचा वापर :- ज्यांच्याकडे बीबीएफ यंत्र उपलब्ध आहे आणि तुषार सिंचनाद्वारे ओलिताची व्यवस्था आहे, त्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग यांसारख्या पिकांची बीबीएफ पेरणी यंत्राने करावी. या यंत्राला दोन्ही बाजूंना रीजरसारखे लोखंडी नांगर असते. या यंत्राद्वारे गादीवाफ्यावर चार ओळींमध्ये पेरणी होऊन सोबत दोन्ही बाजूंना नाल्या पडतात. पेरणी यंत्र प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना नांगराची फाळ नालीमध्येच ठेवावी.

या यंत्राचा वापर चांगला वाफसा असताना किंवा सुरुवातीचा पाऊस येऊन जमीन थोडी कोरडी असताना करता येतो. जास्त पावसाच्या स्थितीत किंवा अति भारी काळ्या जमिनीत पेरणी करतेवेळी अडचणी उद्‌भवतात.

बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यानंतर लगेच पावसात खंड पडल्यास, अशा वेळी तुषार सिंचन संचाद्वारे ओलित करून उगवण करून घ्यावी. अन्यथा, गादीवाफ्यावरील कमी ओलीमुळे सोयाबीनचे कोंब अथवा रोपटे अवस्थेतील पीक जळण्याची समस्या उद्‌भवू शकते. बीबीएफ यंत्राद्वारे रब्बी हंगामात हरभरा पिकाची सुद्धा पेरणी करता येते.

जोडओळीत पेरणी

सिंचनासाठी तुषार सिंचन संचाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग यांसारख्या पिकांची गादीवाफ्यायवर (वरंब्यावर) जोडओळीत पेरणी करावी. त्यासाठी जमीन तयार केल्यानंतर, साधारणत: ३ ते ३.५ फूट अंतरावर रिजर, बेडमेकर, अथवा तत्सम अवजाराने सऱ्या पाडून घ्याव्यात. म्हणजे साधारणत: अडीच ते पावणेतीन फुटांचे वरंबे तयार होतील. वरंब्याचा पृष्ठभाग मजुरांच्या साह्याने सपाट करून घ्यावा. या वरंब्यावर मजुरांच्या साह्याने टोकण पद्धतीने अथवा मानवचलित टोकण यंत्राने जोडओळीत झिगझॅग पद्धतीने पेरणी करावी. यासाठी ठिबकचाही वापर करता येईल.

ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र

पेरणीपूर्वी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने अथवा बैलजोडीचलित काकरी, सरते किंवा तिफणीच्या साह्याने संपूर्ण शेतात हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. माणसांनी अथवा मानवचलित टोकण यंत्राने जोडओळीत पेरणी करताना प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. या खाली ठेवलेल्या तिसऱ्या ओळीच्या ठिकाणी डवरणीच्या वेळी डवऱ्याच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घ्याव्यात.

ट्रॅक्टरचलित सात फण्यांच्या पेरणी यंत्राचे पहिले, मधले व शेवटच्या नळीचे छिद्र बंद करावे. पेरणी करताना ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना पेरणीयंत्राचे शेवटचे दाते शेवटच्या खाली ठेवलेल्या काकरात ठेवावे. त्यामुळे प्रत्येक तिसरी ओळ खाली राहते. या ठिकाणी डवरणीच्या वेळी वरील प्रमाणे सऱ्या पाडून घ्याव्यात.

Watershed Management
Watershed Management : नियमित रोजगार निर्मिती गुणोत्तर

ट्रॅक्टरचलित सहा फणांच्या पेरणीयंत्राचे अलीकडील दोन नंबरच्या व पलीकडील दोन नंबरच्या नळीचे छिद्र बंद केल्यास व ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना नेहमीप्रमाणे प्रचलित पद्धतीसारखी पेरणी करावी. म्हणजे जोडओळीत पेरणी होते. डवरणीवेळी खाली राहिलेल्या प्रत्येक तिसऱ्या ओळीच्या ठिकाणी सऱ्या पाडून घ्याव्यात.

सोयाबीनच्या जोड ओळ पद्धतीप्रमाणेच कपाशी व सलग तूर या पिकांची सुद्धा जोडओळीत पेरणी करून, दोन जोड ओळींच्या मधोमध सऱ्या पाडून घ्याव्यात. प्रचलित पद्धतीने कपाशी व सलग तूर या पिकांची पेरणी केलेली असल्यास दोन ओळींच्या मधोमध सऱ्या पाडून घ्याव्यात. यामुळे कमी पावसाच्या स्थितीत मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि जास्त पावसाच्या स्थितीत अतिरिक्त पाण्याचा निचरा या बाबी शक्य होतात.

ट्रॅक्टरचलित सात दातांच्या पेरणी यंत्राने पट्टापेर पद्धतीने पेरणी करता येते. त्यात आपल्या गरजेनुसार सात ओळींचा पट्टा, सहा ओळींचा पट्टा, पाच ओळींचा पट्टा अथवा जोडओळीत पेरणीचे नियोजन करावे. त्यानंतर खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवरणीच्या वेळी सऱ्या पाडून घ्याव्यात.

ट्रॅक्टरचलित सहा फण्याच्या पेरणी यंत्राने सहा ओळींचा पट्टा, चार ओळींचा पट्टा अथवा जोडओळीत पेरणी करता येते. तिथेही खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवरणीच्या वेळी सऱ्या पाडून घ्याव्यात.

बैलजोडीचलीत तीन दाती काकरी व सरत्याने किंवा तिफणीने पेरणी करताना सहा ओळींच्या पट्ट्यात खाली ठेवलेल्या सातव्या ओळीच्या ठिकाणी डवरणीचे वेळी सऱ्या पाडाव्यात.

सेंद्रिय आच्छादनाचा वापर

कपाशी पिकाची उलंगवाडी झाल्यानंतर उभ्या पिकात कॉटन श्रेडरचा अथवा स्लॅशरचा वापर करावा. पिकाचे बारीक तुकडे संपूर्ण शेतात पसरून घ्यावेत. सोयाबीनची काढणी हार्वेस्टरद्वारे केल्यास सोयाबिनचे कुटार संपूर्ण शेतात विखुरले जाते. त्यानंतर तुषार सिंचन संचाने पाण्याची सिप देऊन शेत ओलसर केल्यानंतर डीकंपोस्टिंग कल्चरची फवारणी करावी. यामुळे शेतात सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्यातून सेंद्रिय कर्ब मिळेल. जमिनीवर आच्छादन राहून ओलावा जपला जाईल.

पेरणी केल्यानंतर पिकाच्या दोन ओळींमधील जागेत गव्हाचा गव्हांडा, सोयाबीनचे कुटार, हरभऱ्याचे कुटार, निंदणी केलेल्या तणांचे अवशेष जमिनीवर पातळ थरात पसरवून द्यावे. यामुळे बाष्पीभवन रोखले जाते.

रब्बी व उन्हाळी पिकासाठी प्लॅस्टिक आच्छादनांचा वापर उपयुक्त ठरत असला तरी खरिपातील अधिक पावसाच्या स्थितीत तो तितकासा उपयुक्त ठरताना दिसत नाही. उलट पाण्याच्या निचऱ्याची समस्या निर्माण होते.

हिरवळीच्या खताचा वापर

जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब व अन्नद्रव्ये वाढविण्यासाठी बोरू व धैंचा यांसारख्या हिरवळीच्या खताच्या पिकाची लागवड करावी. ही पिके फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी जमिनीत गाडावीत. अर्थात, यासाठी एखादा हंगाम शेतकऱ्यांना द्यावा लागतो. हिरवळीच्या खतांची झाडाच्या (उदा. ग्लिरिसिडीया (गिरिपुष्प), सिझाल्पिनिया, सुबाभूळ इ.) पानांसह कोवळ्या फांद्या दोन ओळींमधील जागेत टाकाव्यात. यामुळे आच्छादन होते.

जिप्सम अथवा सुपर फॉस्फेटचा वापर

जिप्समसारख्या भूसुधारकाचा किंवा सुपर फॉस्फेटचा वापर केल्यास जमिनीची पाणी धारणक्षमता वाढते.

रासायनिक खताची मात्रा सेंद्रिय खतामध्ये (उदा. शेणखत, कंपोस्ट खते) मिसळून दिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढतेच, पण जमिनीची जलधारण क्षमता व निचरा दोन्हीसाठी उपयुक्त ठरते.

- जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७

(सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com