Wildlife Census : अकोले तालुक्यात वन्यजीवांची गणना

Bird and Wildlife Enumeration : नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रसिद्ध कळसूबाई हरिश्‍चंद्र गडाचा परिसर प्रचंड जैवविविधतेने नटलेला आहे. या भागात नुकतीच पक्षी व वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. त्या माध्यमातून शेतीत पक्षांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Wildlife Census
Wildlife Census Agrowon
Published on
Updated on

Akole Birds and Wildlife Enumeration : नगर जिल्ह्यातील अकोले तालुका निसर्गसंपन्न व जैवविविधेतेने नटलेला प्रदेश आहे. येथील अनेक शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या देशी बियाणांचा वारसा जतन केला आहे. पर्यावरण हा शेतीचा अविभाज्य घटक आहे.

शेती शाश्‍वत होण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व संवर्धन असणे अत्यंत गरजेचे आहे. अकोले तालुक्यात हा प्रत्यय नक्कीच येतो. तालुक्यातील कळसूबाई हरिश्‍चंद्र गड सर्वत्र प्रसिद्ध आहे.

येथील अभयारण्यातील पशुपक्षांची वन्यजीव विभागातर्फे नुकतीच गणना झाली. त्यात १४५२ पर्यंत पक्षी आढळले. तीसहून अधिक प्रकारच्या या पक्षांमध्ये सर्वाधिक संख्या बगळ्यांची ३७६ आढळली. कावळे २०० तर २१ घुबड, ७६ बुलबुल, ५ ससाणे, १८ सुतार पक्षी, ११५ लाव्हरी, ३० टिटवी, ३१ भारद्वाज, १२ घारी, १९ मोर तर राघू चार आढळले.

याशिवाय चिमण्या, पानघार, बुलबुल, कोकीळ, गायबगळा, पारवे, रानकोंबडी, पाणकोंबडी, साळुंकी, कोतवाल, कुंभरकुकडा, वटवाघूळ, रानकोंबडा, चंचूक, धोबी, खंड्या अशी पक्षांची विविधता आढळली.

Wildlife Census
Wild Animal Count : बुद्ध पौर्णिमेला वऱ्हाडातील अभयारण्यात प्राण्यांची गणना

शेतीत पक्षांचे महत्त्व

अनेक प्रजातींचे पक्षी केवळ शत्रूकीटकच खात नाहीत तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करून टाकतात. त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते. काही उंदीर वर्षभर प्रजनन करतात.ते एका वेळी पाच ते दहा पिलांना जन्म देतात, मात्र ऑक्टोबर- नोव्हेंबर काळात ही संख्या चौदा ते अठरापर्यंत जाते. पक्षांनी मारलेली उंदराची एक जोडी म्हणजे ८८० उंदरांची संख्या वाढण्यावर ठेवलेला अंकुश आहे. घुबडाची व अनेक निशाचर यांची उपजीविका मोठ्या प्रमाणात उंदरांवर होत असते.

त्यामुळे गरुड, घुबड, पिंगळा यांसारखे विविध शिकारी पक्षी शेतीसाठी किंबहुना शेतकऱ्यांसाठी वरदानच आहेत. शृंगी जातीची घुबडे एका रात्रीत एक किंवा त्याहीपेक्षा जास्त कुरतडणारे प्राणी खात असतात. घुबडाची एक जोडी व त्यांची पिल्ले मिळून जवळपास एक हजारांपर्यंत कुरतडणाऱ्या प्राण्यांना खातात. त्यामुळे घुबड शेतकऱ्यांचे खरे मदतनीस आहेत. एकात्मिक कीड व्यवस्थापनात बगळ्यांचेही तेवढेच महत्त्व आहे.

मशागत, नांगणीच्यावेळी बगळे किडींना वेचून टिपून त्यांची संख्या कमी करत असतात. पांढऱ्या मानेचा करकोचा, क्षत्रबलाक हे पक्षी शेतात आढळणाऱ्या गोगलगाईच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. अलीकडील वर्षात मोठ्या आकाराच्या आफ्रिकन गोगलगाईनी शेतीत मोठ्या प्रमाणात उपद्रव देण्यास सुरवात केली आहे. त्यांचे खूप जलद गतीने प्रजनन होते.

शंखांच्या आत दडल्या असल्याने शंख फोडून गोगलगाईना खाणे केवळ काहीच पक्षांना साधते. शिंपल्यातील मृदूशिरी प्राणी बाहेर काढून खाण्याचे कसब केवळ करकोचा सारख्या पक्षांना साधले आहे. भारतीय राखी धनेश पक्षीही आफ्रिकन गोगलगाईंवर ताव मारताना आढळून आले आहेत.पक्षीतज्ज्ञ डॉ.विनोद कुमार गोसावी यांनी याबाबतची सर्व माहिती दिली आहे. परागीभवनात देखील पक्षांचे मोठे महत्त्व आहे.

Wildlife Census
Wildlife Project : ‘‘वन्यजीव’ प्रकल्पांमधील जीवसृष्टीचा अभ्यास होणार’

वन्यप्राण्यांची नोंद

कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात झालेल्या गणनेनुसार सुमारे एक हजारांपर्यंत वन्यप्राणी आढळून आले आहेत. भंडारदरा विभागातील कोळटेभे, रतनवाडी, घाटघर, साम्रद, शिंगणवडी, पांजरे, उददावणे येथील जंगलात आठ पाणवठ्यावर तसेच राजूर विभागातील शिरपुंजे, कुमशेत, पाचनई, अंबित,लाव्हाळी ओतूर. पळसुंदे व कोथळे येथील १७ पाणवठ्यावर ही गणना झाली.

यात निवडक प्राणी सांगायचे तर बिबटे १२, रानडुक्कर ७४, सांबर ७९, भेकर ६६, ससा ५६, वानर ३८३, कोल्हे २७, तरस ३९, मुंगूस ३२, रानमांजर ३३, खार ५९, घोरपड एक, उदमांजर एक, शेकरू ६ याशिवाय तीन निलगाई आणि एक रानगवा आढळले आहेत. राजूर विभागात विविध जातीचे ७४३ तर भंडारदरा विभागात ७०९ पक्षी आढळले.

अभयारण्य क्षेत्रात रानगव्यांसाठी पोषक असा अधिवास उपलब्ध झाला आहे. अभयारण्यामधील इकोसिटी घाटघर, उडदावणे, पांजरे, रतनवाडी या भागात चारा देखील चांगला वाढला आहे. तसेच साम्रद, रतनवाडी, पांजरे भागात स्थानिक गवताच्या प्रजातींसह पवण्या, मारवेल या गवताच्या जातींचीही लागवड यावर्षी वन्यजीव विभागाने केली आहे.

वनसंरक्षक दत्तात्रेय पडवळ म्हणाले की अभयारण्य क्षेत्रातील भंडारदरा ‘रेंज’मधील गावांतील सरपंच, ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे पदाधिकारी तसेच ‘तंबू कॅम्पेनिंग’ करणारे युवक यांची संयुक्त बैठक घेण्यात आहे. रानगव्याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली आहे. त्याच्यामुळे कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com