Organic Curb : जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे संवर्धन

Indian Agriculture : जमिनीची सुपीकता ही प्रामुख्याने त्यातील सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्यांची वेळेवर पिकांना होणारी उपलब्धतेवर अवलंबून असते. पिकाचे आरोग्यामध्येही हेच घटक महत्त्वाचे ठरतात. सुपीकतेसाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे, ही अत्यावश्यक बाब झाली आहे.
Published on
Updated on

डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. संतोष काळे

Indian Agriculture Update : सद्यःस्थितीत जमिनीचे आरोग्य जपण्यापेक्षा त्यातून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याकडे अधिक लक्ष देत आहेत. अधिक उत्पादन हे अन्नसुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यकच आहे. मात्र ज्या जमिनीतून आपण हे उत्पादन काढत आहोत, त्या जमिनीकडे दुर्लक्ष करून कुणालाही परवडणारे नाही.

वेगवेगळ्या कारणामुळे समस्यायुक्त जमिनीचे क्षेत्र वाढत आहे. पर्यायाने अशा जमिनीतील विविध पिकांची उत्पादकताही कमी होत चालली आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, टिकविणे याकडे सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे.

साधारणपणे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६०% पेक्षा जास्त असणे गरजेचे असताना महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी (०.२ ते ०.४% पर्यंत) होत चालले आहे.

सेंद्रिय खतांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश अशा अन्नद्रव्ये कमी असली तरी ते जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहेत. जमिनीचे हे दोन्ही गुणधर्म जपले गेल्यास आपोआपच रासायनिक गुणधर्म सुधारतात.

जमिनीत स्थिर झालेली अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध स्थितीत मिळण्यास मदत होते. शेतामध्ये शेणखताचा वापर त्यामुळे वाढविण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शेणखताची प्रत सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

-ज्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो, त्या ठिकाणी ढीग पद्धतीने खत तयार करावे.

- कमी पाऊस असलेल्या प्रदेशात खड्डा पद्धतीने शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करावे.

-सेंद्रिय खत चांगले कुजवून घ्यावे. अन्यथा, शेणखतातील तणांच्या बियांमुळे शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

Organic Curb : जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे संवर्धन
Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा?

-बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेणखताचा एकच मोठा खड्डा असतो. त्यामध्ये सतत वरून शेण टाकले जात असल्यामुळे त्या खड्ड्यातील वरचा थर न कुजलेला, मधला थर कुजलेला तर खालचा थर न कुजलेला अशी परिस्थिती असते. थोडक्यात, हे संपूर्ण शेणखत जसेच्या तसे उचलून शेतात टाकले जातो. वास्तविक असे खत म्हणजे तणांना, किडींना व अपायकारक बुरशींना निमंत्रणच होय. अर्धवट कुजलेल्या शेणखतापासून गांडूळ खत तयार करणे कधीही चांगले. ते लवकर तयारही होते.

-सेंद्रिय खते विकत घेण्यापेक्षा स्वतःच आपल्या शेतावरच तयार करावीत. ती खूपच स्वस्त पडतात.

जमिनीची सुपीकता व उत्पादकता कायमस्वरूपी टिकविण्यासाठी उपाययोजना

१) पिकांच्या फेरपालटीत कडधान्य (मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, तूर) पिकांचा समावेश करावा.

२. पिकांना शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खतांचा (शेणखत / कंपोस्ट खत / गांडूळ खत) वापर शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर जमिनीत मिसळून करावा.

३) क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग जमिनीत पेरून दीड महिन्यात फुलोरा अवस्था सुरू होताच गाडावे. ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून ताग पेरून गाडावा.

४) रासायनिक खतांबरोबर निंबोळी किंवा करंज पेंडीचा वापर केल्यास सेंद्रिय कर्बाच्या वाढीबरोबरच रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.

५) शेतीमध्ये मशागतीसाठी यांत्रिकीकरणाचा विशेषतः खोलवर जाणाऱ्या कृषी अवजारांचा अतिरेकी वापर टाळावा. त्यामुळे जमिनीत स्थिर झालेला कर्ब हवेत उडून जाणार नाही. जमिनीची कमीत कमी मशागत करावी. म्हणजे धूप कमी होऊन त्याबरोबर वाहून जाणाऱ्या कर्बास प्रतिबंध होईल.

६) शेतातील पिकांच्या अवशेषांचा पुनर्चक्रीकरण किंवा आच्छादन म्हणून वापर करावा. उदा. पिकांची धस्कटे, फुले येण्यापूर्वी तणांचा वापर, तूस, फोलकट, उसाची खोडकी किंवा खोडवा उसातील पाचट न जाळता आच्छादन म्हणून वापर करावा.

७) चोपण जमिनीत सेंद्रिय भूसुधारक (मळी कंपोस्ट) व रासायनिक भूसुधारक जिप्सम हे शेणखतात मिसळून वापर करावा. आम्ल जमिनीत लाइमचा सामूच्या प्रमाणानुसार वापर करावा.

८) शेतातील सर्व मशागती उताराच्या आडव्या कराव्यात. बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी.

९) जैविक खतांचा बीजप्रक्रियाद्वारे करावा. समस्यायुक्त जमिनीतही शेणखतात मिसळून जैविक खतांचा वापर करावा.

१०) क्षारपड तसेच चुनखडीयुक्त जमिनींमध्ये जीवामृत किंवा शेणस्लरीचा वापर वापशावर पिकांना पाण्याद्वारे किंवा ड्रेचिंगद्वारे जमिनीद्वारे करावे.

११) ठिबक सिंचन किंवा तुषार सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व खतांचे नियोजन करावे.

संवर्धन शेती :

-संवर्धित शेती म्हणजे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनातून पिकांच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ साध्य करणे होय.

-या शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठांचा वापर केला जातो. या निविष्ठा प्रामुख्याने स्वतःच्या शेतावरच तयार करून वापरल्या जातात. पहिल्या पिकांच्या सेंद्रिय अवशेषाचा खत म्हणून पिकांस उपयोग करून घेता येतो.

-नवीन संशोधनाप्रमाणे शास्त्रज्ञांचा कल आता जमिनीस कमीत कमी मशागत करून पीक उत्पादन वाढवण्याकडे झुकत चालला आहे. इंधन अथवा बैल शक्ती वापर, मशागत कमी करून खर्च वाचविता येतो. उदा. खरिपामध्ये भातानंतर उर्वरित ओलीवर वाल/पावटा अशी पिके घेतली जातात. उसाच्या शेतीमध्ये सुद्धा लागवडीच्या उसानंतर खोडवा ठेवताना शून्य मशागतीचा अवलंब करतात. त्यात फक्त पाचटाचा आच्छादन म्हणून वापर करून यशस्वी उत्पादन घेता येते.

-शून्य मशागतीमध्ये जमिनीची धूप कमी होते. धुपेद्वारे वाहून जाणारी पोषक अन्नद्रव्ये वाचविता येतात. पुढील पिकाची लवकर पेरणी करता येते.

Organic Curb : जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे संवर्धन
Water Conservation Scheme : जल संवर्धन योजनांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

-संवर्धनशेती याचा अर्थ फक्त मशागत कमी करणे असा नव्हे, तर शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांमध्येही बचत करणे होय.

-रासायनिक खतांची मात्रा कमी करून उपलब्ध असणारे पीक अवशेष, धान्य घेतल्यानंतर त्याच जमिनीत बारीक करून गाडल्यास ते कुजून पुढील पिकास त्याचा फायदा होतो. खताची कार्यक्षमता वाढवून रासायनिक खतांची मात्रा, पीक उत्पादनात घट न येऊ देता कमी करता येते.

-संवर्धन शेतीमध्ये पाण्याचाही काटेकोर वापर किंवा बचतीतून कार्यक्षमता वाढवता येते. जमिनीस पाणी देण्यापेक्षा पिकांना आवश्यक तितकेच पाणी देण्याचे धोरण राबवले जाते. त्यासाठी जमीन, पीक, हवामान यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. दिलेले पाणी बाष्पीभवनाद्वारे उडून जाऊ नये याकरिता सेंद्रिय पदार्थाचे अथवा प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे.

-कोरडवाहू शेतीमध्ये जल व मृद संधारणाचे उपाय राबवावेत. अशा प्रकारे वरील सर्व बाबींचा अवलंब केल्यास जमिनीच्या सुपीकता वाढवता येते. सेंद्रिय व रासायनिक खतांचे योग्य नियोजन केल्यामुळे खर्चात बचत तर होतेच पण पिकांची उत्पादकताही वाढण्यास मदत होते.

संपर्क - डॉ. अनिल दुरगुडे (मृद्‍ शास्रज्ञ), ९४२०००७७३१, डॉ. संतोष काळे (कनिष्ठ संशोधन सहकारी), ९७६४८८१७९९, (मृद्‍ विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com