Vegetable Farming : बारमाही भाजीपाला लागवडीवर भर

Vegetable Cultivation : परभणी जिल्ह्यातील मिरखेल (ता. परभणी) येथील विठ्ठल धामणे हे मागील अनेक वर्षांपासून बारमाही भाजीपाला उत्पादन घेत आहेत.
Vegetable Farming
Vegetable Farming Agrowon
Published on
Updated on

Vegetable Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : भाजीपाला

शेतकरी : विठ्ठल धामणे

गाव : मिरखेल,ता. जि. परभणी

एकूण क्षेत्र : ८ एकर

भाजीपाला लागवड : २ एकर

परभणी जिल्ह्यातील मिरखेल (ता. परभणी) येथील विठ्ठल धामणे हे मागील अनेक वर्षांपासून बारमाही भाजीपाला उत्पादन घेत आहेत. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन योग्य पीक व्यवस्थापनातून दर्जेदार भाजीपाला उत्पादन ते घेत आहेत. कुटुंबीयांच्या मदतीने भाजीपाला लागवडीपासून काढणी ते विक्रीपर्यंतची कामे स्वतः करतात. त्यामुळे मजुरीच्या खर्चात बचत होत आहे. पारंपारिक पिकांपेक्षा दररोज उत्पन्न देणारी भाजीपाला लागवड अधिक फायदेशीर ठरत असल्याचे विठ्ठलराव सांगतात.

विठ्ठल धामणे यांची मिरखेल शिवारात ८ एकर खोल काळी माती असलेली जमीन आहे. सिंचनासाठी बोअरची सोय आहे. एकूण क्षेत्रापैकी दोन एकर जमीन भाजीपाल्यासाठी राखीव असते. भाजीपाल्यातून दररोज खात्रीशीर उत्पन्न हाती येत असल्याने मागील अनेक वर्षांपासून त्यांनी भाजीपाला लागवडीत सातत्य राखले आहे. यातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे.

Vegetable Farming
Vegetable Farming : श्रावणातील मागणीनुसार उत्पादन, थेट विक्री

बारमाही विविध भाजीपाल्याचे उत्पादन

बाजारातील मागणी लक्षात घेऊन विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची छोट्या छोट्या क्षेत्रावर लागवड केली जाते. त्यात वांगी, टोमॅटो, दोडकी, कारली, दुधी भोपळा, चवळी, वाल, भेंडी, फ्लॉवर, अळू आदी पिकांचा समावेश असतो.

दरवर्षी साधारण गुढीपाडव्याला एक एकरात दोडक्याची लागवड केली जाते. दोडक्याचा हंगाम साधारणतः दोन महिने सुरू राहतो. वांगी पिकाचे बारमाही उत्पादन सुरू असते. पावसाळ्यात चवळी, भेंडी, वाल लागवड केली जाते. बाजारपेठेतील मागणी, दर यांचा अंदाज घेऊन टोमॅटो, फ्लॉवरची दखील लागवड केली जाते.

भाजीपाला व्यवस्थापन

लागवडीसाठी सहा फूट अंतरावर सरी मारून त्यावर ठिबक सिंचनाच्या नळ्या अंथरल्या जातात. दीड फूट अंतरावर दोडक्याचे एक बी याप्रमाणे लागवड केली जाते. लागवडीनंतर दोन महिन्यांनी बांबू आणि तारांचे मांडव तयार करून त्यावर दोडक्याचे वेल सोडले जातात. कारले पिकाची देखील याच पद्धतीने लागवड केली जाते.

वांगी पिकाची सहा बाय दीड फूट, तर, टोमॅटोची चार बाय दीड फूट अंतरावर लागवड केली जाते.

फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी सापळे लावले जातात. नियमितपणे विद्राव्य खतांच्या मात्रा देण्यावर त्यांचा भर असतो.

भाजीपाला लागवडीच्या क्षेत्राभोवतीच्या बांधावर विविध प्रकारची झाडी आहेत. त्यामुळे उन्हात तीव्र उन्हाच्या झळांपासून पिकाचे काही प्रमाणात संरक्षण होते. असे धामणे सांगतात.

Vegetable Farming
Vegetable Farming : मालवाहतूक सुविधेमुळे भाजीपाला शेतीस चालना

परभणी मार्केटमध्ये विक्री

मिरखेल गावातील बहुतांश भाजीपाला उत्पादक शेतकरी दररोज विविध वाहनांद्वारे परभणी येथे भाजीपाला विक्रीसाठी आणतात. त्यांच्यासोबत विठ्ठल धामणे हे देखील भाजीपाला घेऊन जातात. कोरोनापूर्वी परभणी येथील वसमत रस्त्यावर बाजारात विठ्ठल स्वतः भाजीपाला विक्री करत असत. त्यावेळी दररोज चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असे. मात्र लॉकडाऊनमुळे बाजार बंद झाले. याच दरम्यान त्यांनी भाजीपाला लागवड क्षेत्राचा विस्तार करण्याचे ठरविले. दोन एकरांपर्यंत भाजीपाला लागवडीचा विस्तार केला आहे. दररोज शाश्वत उत्पन्न हाती येत असल्याने त्यांनी वांगी तसेच वेलवर्गीय दोडके, कारली पिकांवर अधिक भर दिला. त्यातून उत्पादनही वाढले. सध्या हातविक्री न करता पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये नेऊन ठोक विक्री विठ्ठलराव करत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत लग्न समारंभामुळे वांग्यांना जास्त मागणी असते. या काळात आवक कमी असल्यामुळे दरांत तेजी असते. या काळात वांगी उत्पादन मिळेल असे नियोजन केले जाते, असे विठ्ठलराव सांगतात.

कुटुंबाची साथ

विठ्ठल यांचे चार सदस्याचे कुटुंब आहे. पत्नी सौ. सिंधूबाई यांच्यासह विठ्ठल शेतीकामे करतात. सुट्टीच्या दिवशी मुले देखील शेती कामांमध्ये हातभार लावतात. कुटुंबातील सर्वजण शेतीकामांमध्ये मदत करत असल्यामुळे बाहेरून मजूर लावण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. त्यामुळे मजुरी खर्चात मोठी बचत होत असल्याचे विठ्ठलराव सांगतात.

स्वच्छता व प्रतवारी करून विक्री

बाजारातील दरांचा अंदाज घेऊन भाजीपाला पिकांची काढणी केली जाते. बाजारात विक्रीसाठी पाठविण्याच्या आदल्या दिवशी भाजीपाला काढणी केली जाते. त्यानंतर शेतामध्येच प्रतवारी करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतला जातो. भाज्या सुकू नयेत यासाठी तागाच्या पिशव्यांमध्ये भरून नंतर क्रेटमध्ये ठेवल्या जातात. तागाच्या पिशव्यामुळे मालाची सुरक्षितपणे वाहतूक होते. तसेच भाजीपाल्याचा दर्जा टिकून राहण्यास मदत होते. ताजा आणि दर्जेदार भाजीपाल्यास बाजारात दरही चांगले मिळतात असे विठ्ठल धामणे सांगतात.

भेंडी, दोडका, वालाची तोड

जुलै महिन्यात ३० गुंठ्यावर दोडका लागवड करण्यात आली. सध्या या लागवडीमध्ये तोडे सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे दोडक्यासह इतर भाजीपाला पिकांच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

मागील महिन्यात १० गुंठे क्षेत्रावर भेंडी तसेच २० गुंठे क्षेत्रावर वाल लागवड केली आहे. पुढील आठवडाभरात आणखी एक एकर क्षेत्रात वांगी लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी जमीन तयार करण्यासाठी मशागती सुरु आहे.रोपे विकत आणून लागवड करणार आहोत.

विठ्ठल धामणे ९९२२८७००६० (शब्दांकन : माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com