Vegetable Farming : मालवाहतूक सुविधेमुळे भाजीपाला शेतीस चालना

Agriculture Development : धाड (ता. जि. बुलडाणा) या मध्यवर्ती ठिकाण परिसरातील अनेक गावांमध्ये वर्षभर भाजीपाला पिकवला जातो. येथील शेतकऱ्यांचा नाशिवंत माल विविध बाजारपेठांमध्ये वेळेवर पोहोचविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था उभी राहिली आहे.
Vegetable Farming
Vegetable Farming Agrowon
Published on
Updated on

Transport Facilities Success Story : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील धाड हे ५० ते ५२ गावांची बाजारपेठ असलेले मध्यवर्ती ठिकाण ओळखले जाते. धाडसह वरुड, मासरुळ, तराडखेड, सोयगाव, ढालसावंगी, सातगाव मसला, कुंबेफळ, बोरखेड, जामठी, सावळी, चांडोळ, देवपूर, दहीद अशी अनेक गावे व तेथील शेकडोच्या संख्येने शेतकरी भाजीपाला उत्पादनात आघाडीवर आहेत. बहुतांश शेतकरी वर्षातील आठ महिने टोमॅटो, हिरवी मिरची, वाल, कोबी, वांगी आदी विविध प्रकारचा भाजीपाला पिकवतात. अनेक शेतकरी तुकड्यांमध्ये भाजीपाला पिकवतात. काही प्रमाणात मालाची स्थानिक बाजारात विक्री होतो. तर बहुतांश माल नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, राजस्थान मधील कोटा याप्रमाणे राज्यासह राज्याबाहेरील बाजारपेठांनाही पाठवण्यात येतो. जुलै ते ऑक्टोबरदरम्यान हंगाम शिगेला पोचलेल्या काळात या गावांमधून भाजीपाला घेऊन जाणारी दोनशे वाहने दररोज ये-जा करताना दिसतात. वाहनधारकांची दुपारपासूनच भाजीपाला संकलित करण्याची लगबग सुरू होते. दोन टनांपासून ते दहा टनांपर्यंत क्षमता असलेली वाहने वाहतुकीच्या कामात व्यस्त होतात. त्यातून अर्धा एकरांपासून पाच- दहा एकरांपर्यंत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मालवाहतूक व्यवस्थेची सुविधा मिळतेच. पण वाहनधारकांना नियमित व्यवसाय मिळण्याबरोबर माल भरण्यासाठी मजुरांनाही रोजगार मिळतो.

वाहतूक व्यवस्था

वाहतुकीच्या व्यवस्थेबाबत व्यावसायिक सांगतात, की बाजाराचे अंतर व दहा-वीस किलो वजनाची बॅग यानुसार वाहतुकीचे शुल्क शेतकऱ्यांकडून आकारले जाते. अकोला बाजारात माल पाठविण्यासाठी किलोला दोन ते तीन रुपये, तर नागपूर बाजारपेठेसाठी हेच शुल्क चार ते पाच रुपये रुपये असते. अंतर वाढेल तसा दर वाढतो. यात एक आणखी सुविधा म्हणजे शेतकऱ्याला बाजारात स्वतः जाण्याची गरज पडत नाही. प्रतवारी व मोजूनच प्लॅस्टिक बॅग, गोणी वा क्रेटमध्ये माल वाहनात भरला जातो. त्यावर शेतकऱ्याचे नाव, वजन लिहिलेले असते. बाजारात विक्री केल्यानंतर त्याची पट्टी, मिळालेले पैसे या बाबी गाडीमालक परतल्यानंतर भाडे वजा करून त्वरित शेतकऱ्याला सुपूर्त करतो. काही शेतकरी बांधावरही व्यापाऱ्यांना विक्री करतात. अशावेळी वाहतुकीसह अडतीचा खर्चही लागत नाही. छोटे-छोटे व्यापारी हा माल मग या वाहतूक यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवतात.

Vegetable Farming
Vegetable Farming : ‘काटोल’ तालुक्यातील गावांची फ्लॉवरमध्ये ओळख

नागपूरच्या बाजारात ‘धाड’ची चलती

नागपूर येथील बाजारपेठेत धाड पंचक्रोशीत उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्याची चलती असते. दररोज हा माल घेऊन पंधरा ते वीस गाड्या या बाजारात धावतात. नागपूरला धाड भागातील वांग्याला किलोला ३० ते ३५ रुपये, पोपटवालला ४५ ते ५५ रुपये, मिरचीला ३० ते ४० रुपये असे दर मिळतात. शेतकऱ्यांना या बाजारात शेतीमाल पाठविण्यासाठी किलोला चार ते पाच रुपयांचा खर्चही द्यावा लागतो. मात्र वाहने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांच्या विक्रीतील अडचणी खूप कमी झाल्या आहेत.

तरुणांचा आश्‍वासक पुढाकार

सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे उत्पादन वातावरण बदलामुळे दरवर्षी घटत चालले आहे. समाधानकारक दर नसल्याने या पिकांना पर्याय म्हणून धाड परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनात पाऊल ठेवले. धाड परिसरातील करडी, शेकापूर, मासरुळ येथील पद्मावती, ढालसांगवीसह अनेक लहान- मोठे प्रकल्प फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे परिसरात सिंचनाची मोठ्या प्रमाणात व्यवस्था तयार झाली आहे. त्यामुळे ठिबक, तुषार सिंचन, पॉली मल्चिंग पेपर आदींचा वापर करीत भाजीपाल्याचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी हे तरुण धडपडत आहेत.

Vegetable Farming
Vegetable Farming : फ्लॉवर पिकातून मिरवडीची बनतेय ओळख
माझ्याकडील वालाची दररोज दोन ते तीन क्विंटल विक्री होत आहे. दररोज गावातून मालवाहतुकीची सुविधा मिळाल्याने वेगवेगळ्या बाजारांना माल पाठवणे शक्य होते.
प्रदीप तायडे, करडी, जि. बुलडाणा
माझ्याकडे भाजीपाला वाहतूक करणाऱ्या चार गाड्या आहेत. माझ्यासह अन्य शेतकऱ्यांचा भाजीपाला घेऊन दररोज नागपूर व अन्य बाजारपेठांना जातो. दुसऱ्या दिवसापर्यंत मालविक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडतात.
परमेश्‍वर श्रीकृष्ण वाघ
भाजीपाला वाहतुकीचे काम १० वर्षांहून अधिक काळ करीत आहे. माझ्यासारखेच या भागात शंभराहून अधिक वाहतूकदार कार्यरत आहेत. आम्ही स्वतःही भाजीपाला उत्पादक आहोतच. शिवाय शेतकऱ्यांकडून बांधावरही खरेदी करतो.
मुकुंदा शेनफड काळे, वरूड, जि. बुलडाणा
नागपूर येथील बाजारात बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. धाड परिसरातील पोपटवाल, वांगी, मिरचीची वर्षभर आवक असते. पोपटवाल व वांगी नागपूर, मध्य प्रदेशातील बाजारात चांगला भाव खातात. हा सर्व माल नागपूरसह अन्य जिल्हे व मध्य प्रदेशात पाठवला जातो.
कैलास सेठ, भाजीपाला खरेदीदार, ताज सब्जी भंडार, नागपूर
वांगी, मिरची अशी पिके घेतो. वाहतुकीची नियमित सुविधा तयार झाल्याने नागपूरच्या बाजारात माल पाठवणे परवडते. मागील वर्षात वांगे सरासरी ३० रुपये प्रति किलो दराने विकले. काही वेळा व्यापाऱ्यांना जागेवरही दिले.
गोकूळसिंग भिकाजी वाघ, सावळी, जि. बुलडाणा

शासनाचे प्रतवारी केंद्र हवे

धाड परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन केले जाते. भाजीपाला नाशिवंत असल्याने वेळेवर विकला न गेल्यास नुकसान होते. त्यासाठी शासनाने पुढाकार घेत धाड परिसरात मोठ्या क्षमतेचे प्रतवारी, साठवणूक केंद्र उभारावे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

राजेंद्र बैरागी ९२८४१२१७१५ संचालक, शेतकरी उत्पादक कंपनी, धाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com