Tomato Crop Management : टोमॅटो लागवडीत कीड-रोग, खत व्यवस्थापनावर भर

Tomato Farming : अकोला जिल्ह्यातील हिवरखेड (ता. तेल्हारा) येथील पुरुषोत्तम लक्ष्मण नाठे यांच्याकडे एकूण १० एकर शेती आहे. त्यापैकी चार एकरांत ते मागील १५ वर्षांपासून भाजीपालावर्गीय पिकांचे उत्पादन घेत आहेत.
Tomato Orchard
Tomato OrchardAgrowon

Management of Tomato Cultivation :

शेतकरी नियोजन

पीक : टोमॅटो

शेतकरी : पुरुषोत्तम लक्ष्मण नाठे

गाव : हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला

भाजीपाला क्षेत्र : ४ एकर

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड (ता. तेल्हारा) येथील पुरुषोत्तम लक्ष्मण नाठे यांच्याकडे एकूण १० एकर शेती आहे. त्यापैकी चार एकरांत ते मागील १५ वर्षांपासून भाजीपालावर्गीय पिकांचे उत्पादन घेत आहेत.

त्यात टोमॅटो, फुलकोबी लागवडीवर त्यांचा विशेष भर असतो. उर्वरित क्षेत्रात पारंपरिक पिके घेतली जातात. मात्र भाजीपाला पिकांपासून दरवर्षी चांगले उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव पुरुषोत्तमराव सांगतात.

टोमॅटो लागवड नियोजन

या वर्षी एक एकरात टोमॅटो लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार जमिनीची पूर्वमशागत करून घेतली. त्यानंतर ४ फूट अंतराचे बेड तयार केले.

बेड तयार केल्यावर रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. त्यात १९ः१९ः१९ हे खत १०० किलो, एमओपी ५० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो यांच्या प्रति एकरी मात्रा दिल्या.

त्यानंतर मल्चिंग पेपर अंथरून ठिबकच्या नळ्या टाकल्या. त्यानंतर साधारण ७ ते ८ तास बेड चांगले भिजवून वाफसा स्थितीत आणले.

सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर रोपवाटिकेतून २१ ते २२ दिवसांच्या सुमारे ८५०० रोपांची उपलब्धता केली. एक रोप साधारण १ रुपया ६० पैसे याप्रमाणे खरेदी केली.

रोपांची लागवड करण्यासाठी मल्चिंग पेपरला छिद्रे पाडून घेतली. दोन रोपांत दीड फूट अंतर राखत २५ नोव्हेंबरच्या दरम्यान रोपांची लागवड केली.

Tomato Orchard
Tomato Cultivation : नियोजनबद्ध टोमॅटो लागवडीवर भर

लागवड केल्यानंतर रोपे स्थिरावण्यासाठी ३ ते ४ दिवस वाफसा स्थिती कायम राखण्यावर भर दिला.

याशिवाय ह्युमिक ॲसिड, मायकोरायझा तसेच इतर जैविक घटकांची आळवणी केली.

रोपांची वाढ होऊ लागताच कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात होते. टोमॅटो पिकामध्ये प्रामुख्याने नागअळी, पांढरी माशी, फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करून आवश्यकतेनुसार रासायनिक फवारण्या घेण्यात आल्या.

फूल अवस्थेमध्ये कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन, सूक्ष्म अन्नद्रव्ये याशिवाय १३ः४०ः१३ यांचा वापर केला.

सेटिंग अवस्थेच्या साधारण महिनाभर आधी झाडांना आधार देण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. त्यानुसार बांबू आणि सुतळीचे स्ट्रक्चर तयार केले.

लागवडीनंतर साधारण ४२ ते ४५ दिवसांनी फळांची सेटिंग होण्यास सुरुवात होते.

सेटिंग अवस्थेत सिंचन, खत व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला. फळांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या आहेत.

Tomato Orchard
Tomato Crop Management : टोमॅटोच्या चांगल्या उत्पादनासाठी असे नियोजन करा

सिंचन नियोजन

टोमॅटो पिकात वाफसा पाहून एक दिवसाआड दोन ते तीन तास पाणी दिले जात आहे. पाणी अधिक प्रमाणात दिले गेले तर मुळांना त्याचा फटका बसू शकतो. परिणामी, पिकावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता येत्या दिवसांत जसजसे तापमान वाढेल त्या प्रमाणात पाणी देण्याचे नियोजन बदलावे लागेल. पाण्याची मात्रा अधिक करावी लागेल.

विक्री नियोजन

सध्या टोमॅटो पीक मालधारणेच्या अवस्थेत आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी एक तोडा झालेला आहे. सुरुवातीच्या काळात कमी उत्पादन मिळते, मात्र नंतरच्या तोड्यात उत्पादनात वाढ होत जाते.

दोन तोड्यांत साधारण ६ ते ७ दिवसांचे अंतर राखले जाते. जेणेकरून अपेक्षित उत्पादन मिळेल.

दरवर्षी सरासरी १० ते १२ तोडे होतात. एका तोड्यात साधारण १५० ते २०० क्रेट टोमॅटो उत्पादन मिळते.

सर्व उत्पादित टोमॅटोची अकोट, अकोला येथील बाजारांत विक्री केली जाते. सध्या प्रति क्रेट ६०० रुपये इतका दर मिळतो आहे.

आगामी काळात खत, कीड-रोग आणि सिंचन व्यवस्थापनावर विशेष भर दिला जाईल. फळांवर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल.

आगामी नियोजन

सध्या पिकाची फळ अवस्था सुरू असून एक तोडा झालेला आहे.

सध्या झाडांवर २५ ते ३० फळे लागलेली आहेत. यातील २० फळे जवळपास परिपक्व झालेली आहेत. फळधारणा अवस्थेत पिकाची अन्नद्रव्यांची गरज वाढते.

फळांचा आकार वाढविण्यासाठी तसेच दर्जा टिकवण्यासाठी मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सल्फर तसेच पोटॅश यांच्या वापरावर भर दिला जातो.

मागील आठवड्यात ठिबकद्वारे एकरी चार किलो प्रमाणे कॅल्शिअमची मात्रा दिली आहे. येत्या काळात १३ः०ः४५ चा वापर केला जाईल.

पुरुषोत्तम नाठे, ९९७०० ७७०५०

(शब्दांकन : गोपाल हागे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com