Tomato Cultivation : नियोजनबद्ध टोमॅटो लागवडीवर भर

Tomato Farming : नाशिक जिल्ह्यातील वडगाव पिंगळा (ता. सिन्नर) येथील ज्ञानेश्वर रामनाथ मुठाळ यांची ८ एकर शेती. त्यापैकी अडीच एकरांत टोमॅटो लागवड आहे.
Tomato farming
Tomato farmingAgrowon

ज्ञानेश्वर रामनाथ मुठाळ

Success Story of Tomato Farming : नाशिक जिल्ह्यातील वडगाव पिंगळा (ता. सिन्नर) येथील ज्ञानेश्वर रामनाथ मुठाळ यांची ८ एकर शेती. त्यापैकी अडीच एकरांत टोमॅटो लागवड आहे. सिन्नर तालुका तसा बागायती असल्याने येथे द्राक्ष हे प्रमुख पीक. पोषक हवामान आणि पुरेशा सिंचन सुविधा असल्याने द्राक्ष लागवडीमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाली होती. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागांचे होणारे मोठे नुकसान लक्षात घेऊन ज्ञानेश्वर मुठाळ यांनी द्राक्ष पिकाला पर्यायी पीक म्हणून मागील १५ वर्षांपासूनच टोमॅटो लागवडीवर भर दिला आहे.

वाण निवड

दर्जेदार टोमॅटो लागवडीसाठी वाण निवड हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. चांगला दर असलेले, टणक फळ उत्पादन, एकसारखा रंग, चकाकी, आकार व वजन असलेल्या वाणाची लागवडीसाठी निवड केली जाते. त्यानुसार रोपांची उपलब्ध करण्यासाठी रोपवाटिकेत आगाऊ मागणी नोंदवली जाते. जेणेकरून वेळेवर लागवड करण्यासाठी रोपे उपलब्ध होतील.

लागवड नियोजन

लागवड करण्यापूर्वी शेतजमीन चांगली तयार करून घेतली जाते. पूर्वमशागतीसाठी रोटाव्हेटर मारून सऱ्या काढल्या जातात.

पूर्वतयारी झाल्यानंतर पीक पोषणासाठी भरखते म्हणून १०:२६:२६, पोटॅश, निंबोळी पेंडची मात्रा दिली जाते.

ट्रॅक्ट्ररचलित औजाराने सऱ्या पाडल्या जातात. त्यानंतर सऱ्यांवर २५ मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरूण घेतला जातो.

लागवड अंतर निश्चित करून सरीवर अंथरलेल्या मल्चिंग पेपरला छिद्रे पाडून घेतली जातात. त्यावर साधारण १.५ बाय ४ फूट अंतरावर रोपांची लागवड केली जाते.

लागवड पूर्ण झाल्यानंतर २५ दिवसांत पहिली बांधणी केली जाते. त्यांनतर ३५ दिवसांनी दुसरी बांधणी, ४५ दिवसांनी तिसरी आणि आवश्यकता भासल्यास चौथी बांधणी केली जाते.

Tomato farming
Tomato Market : कुणीही या, टोमॅटो फुकट घेऊन जा

खत व्यवस्थापन

लागवड पूर्ण झाल्यानंतर शिफारशीनुसार बुरशीनाशके व सूक्ष्म अन्नद्रव्यांची आळवणी केली जाते. त्यात ह्युमिक ॲसिड, १२:६१:६१ किंवा १३:४०:१३ यांचा वापर केला जातो.

वाढीच्या अवस्थेत झाडे होऊन फुलधारणा आणि फळवाढ चांगली होण्यासाठी ठिबकमधून १२:६१:०, १३:४०:१३, ०:५२:३४ यांचा प्रत्येक आठवड्यात वापर केला जातो.

फुलकळी लागल्यानंतर नत्राचे प्रमाण कमी करून पोटॅशचे प्रमाण वाढविले जाते.

शेवटच्या टप्प्यात फळ फुगवणीसाठी आवश्यकतेनुसार ०:६०:२०, ०:०:५० या प्रमाणे रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात.

सिंचन व्यवस्थापन

लागवड करण्यापूर्वी बोध ओला करून सुरुवातीच्या काळात भरपूर प्रमाणात पाणी दिले जाते. त्यानंतरच रोपांची लागवड केली जाते. दरवर्षीची लागवड ही साधारण पावसाळ्याच्या दिवसांत होत असल्याने लागवडी नंतरच्या टप्प्यात वापसा अवस्था तपासून नंतर सिंचन करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे फक्त मुळांच्या कक्षेत पाणी पोहोचते.

तसेच अतिरिक्त पाणी बोधाच्या खाली येणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. झाडांच्या वाढीच्या अवस्थेत सिंचन कालावधी टप्प्याटप्प्याने वाढविला जातो. फुलकळीच्या अवस्थेत पिकास पाण्याचा थोडा ताण दिला जातो. याशिवाय थंडीच्या दिवसात पिकास पाण्याची जास्त गरज नसते. त्यामुळे जमिनीतील वाफसा स्थिती आणि पिकाची पाण्याची गरज यांचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जातो.

Tomato farming
Tomato Farming : निर्यातयोग्य टोमॅटोची यशस्वी शेती

कीड व रोग व्यवस्थापन

टोमॅटो लागवडीत प्रामुख्याने नागअळी व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. वेळीच नियंत्रण करण्यासाठी पिकाची सातत्याने निरीक्षणे नोंदवून घेतली जातात. आवश्यकतेनुसार शिफारशीप्रमाणे रासायनिक फवारण्या घेतल्या जातात.

पावसाळ्याच्या काळात ढगाळ वातावरण व पाऊस अशी स्थिती कायम राहते. या काळात पिकावर विविध जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रादुर्भाव पाहून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातात.

अलीकडच्या काळा रोपांची मरतुक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावेळी भरखते टाकताना सल्फरची मात्रा दिल्यामुळे चांगले परिणाम मिळतात.

- ज्ञानेश्वर मुठाळ, ९१७२७७७७६४ (शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

फळ काढणी

टोमॅटो लागवडीनंतर साधारण ६० तर ७५ दिवसांत तोडे सुरू होतात. बाजारपेठेचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने तोडे केले जातात. उष्ण वातावरणात तिसऱ्या दिवशी तर थंडीत पाचव्या दिवशी तोडे होतात. त्यानुसार तोड्यासाठी मजुरांची उपलब्धता केली जाते.

टोमॅटो तोडणी करून सर्व माल क्रेटमध्ये भरून एकत्रित केला जातो. त्यानंतर हाताळणी आणि प्रतवारी करून बाजारपेठेत विक्रीसाठी टोमॅटो पाठविले जातात. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती व सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेला पांढुर्ली बाजारात विक्री केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com