Poultry Farming: कुक्कुटपालन शेडमधील वातावरण थंड राखण्यावर भर

Summer Poultry Management: पुणे जिल्ह्यातील तरडे गावातील नंदकुमार चौधरी यांनी करार पद्धतीने सुरू केलेल्या कुक्कुटपालन व्यवसायात ऋतुनुसार व्यवस्थापनावर विशेष भर दिला आहे.
Poultry
PoultryAgrowon
Published on
Updated on

Farming Management:

शेतकरी नियोजन । कुक्कुटपालन

शेतकरी : नंदकुमार चौधरी

गाव : तरडे, ता. हवेली, जि. पुणे

एकूण क्षेत्र : सात एकर

एकूण पक्षिगृह : २

पक्षिगृह क्षमता : १५ हजार पक्षी

पुणे जिल्ह्यातील तरडे गावाच्या नंदकुमार चौधरी कुक्कुटपालन व्यवसायात अनुभवातून पारंगत झाले आहेत. त्यांची ७ एकर शेती आहे. शेतीला पूरक म्हणून करार पद्धतीने ब्रॉयलर कुक्कुटपालनास सुरुवात केली. व्यवसायाच्या सुरुवातीस आलेल्या अनेक अडचणींवर हार न मानता जिद्दीने मात केली. आज नंदकुमार चौधरी सुमारे १५ हजार पक्ष्यांचे संगोपन यशस्वीरीत्या करत आहेत. ऋतुनिहाय व्यवस्थापनावर भर देत व्यवसाय वाढीवर त्यांचा भर असतो. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने त्यानुसार व्यवस्थापन पद्धतीत बदल करण्यात आले आहेत.

श्री. चौधरी सांगतात, शेतीला पूरक म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाचे करण्याचे २००६ मध्ये ठरविले. त्यानंतर लेअर आणि ब्रॉयलर कुक्कुटपालनाविषयी माहिती घेतली. त्यासाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. या दरम्यान अनेकांनी या व्यवसायात पडू नका, असा सल्ला दिला. मात्र जिद्दीने या व्यवसायात उतरलेल्या नंदकुमार चौधरी यांनी कुक्कुटपालन व्यवसाय करण्याची खूणगाठ बांधली होती. त्यासाठी चालू स्थितीतील कुक्कुटपालन प्रत्यक्ष जाऊन पाहिले. विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर व्यवसायातील बारकावे, तांत्रिक बाबींची माहिती मिळत गेली.

Poultry
Poultry Farming: वाढत्या तापमानात कुक्कुटपक्ष्यांचे आरोग्य उत्तम राखण्यावर भर

ब्रॉयलर आणि लेअर या दोन्ही कुक्कुटपालन व्यवसायासाठी आवश्यक साधनांची माहिती घेत अभ्यास केला. व्यवसायाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर ब्रॉयलर कुक्कुटपालन योग्य वाटल्याने तेच करण्याचे ठरविले. त्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणुक आवश्यक होती. त्यासाठी बँकेकडून काही रक्कम कर्ज स्वरूपात तर उर्वरित स्वतःकडील काही रक्कम घालत व्यवसायाची सुरुवात केली. कुक्कुटपालनासाठी प्रत्येकी ३० बाय २५० फूट आकाराची दोन शेड उभारली. त्यात लहान पिल्लांच्या संगोपनापासून ते मोठ्या पक्ष्यांच्या विक्रीपर्यंतचे व्यवस्थापन केले जाते, असे श्री. चौधरी सांगतात.

करार पद्धतीने कुक्कुटपालन

एका खासगी कंपनीसोबत कुक्कुटपालनाचा करार करण्यात आला आहे. करार केलेल्या कंपनीकडून लहान पिल्ले, खाद्य, लसीकरण आदी सुविधा पुरविल्या जातात. शिवाय कंपनीकडून पक्ष्यांची खरेदी केली जाते. त्यामुळे केवळ पक्ष्यांना नियमित खाद्य देऊन त्यांचे अपेक्षित वजन मिळविण्यासह संगोपन करणे एवढेच काम करावे लागते. त्यामुळे ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय योग्य वाटत असल्याचे श्री. चौधरी सांगतात.

करार केलेल्या कंपनीकडून पिल्ले मिळाल्यानंतर साधारणपणे ४० ते ५० दिवस पक्ष्यांचे संगोपन केले जाते. या कालावधीत पक्ष्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि अपेक्षित वजन मिळविण्यासाठी लसीकरण आणि खाद्य व्यवस्थापनावर भर दिला जातो.

कंपनीचे अधिकारी नियमित शेडवर येऊन पक्ष्यांची आरोग्य तपासणी करतात. त्यांच्याकडून लसीकरण केले जाते. तसेच पक्ष्यांच्या वयानुसार खाद्य पुरवठा केला जातो.

लहान पक्षी शेडवर आणल्यापासून प्रत्येक टप्प्यावर नियमित लसीकरण केले जाते. त्यामुळे पक्ष्यांमध्ये मरतुक कमी होण्यास मदत मिळते.

पक्षी योग्य वजनाचे झाल्यानंतर कंपनीद्वारे पक्ष्यांचे लिफ्टिंग केले जाते. त्यामुळे विक्री व्यवस्था स्वतंत्र तयार करण्याची आवश्यकता भासली नाही.

Poultry
Poultry Management : कोंबड्यांतील उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी वनौषधी

स्वच्छ पाण्याची उपलब्धता

पक्ष्यांना पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी विहिरीतील पाणी वापरले जाते. विहिरीतील पाणी शेडवर आणून टाकीत सोडले जाते. त्यासाठी शेडवर दोन टाक्या बसविल्या आहेत. टाक्यांवर वेगळे पाण्याचे फिल्टर जोडले आहेत. या टाक्यांद्वारे स्वयंचलित निप्पल सिस्टम पद्धतीने पक्ष्यांना थेट जागेवरच पाणी पिण्याची उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे पक्ष्यांना त्यांच्या गरजेनुसार पाणी पिणे सोयीचे झाले आहे. पक्ष्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेतली जाते. यामध्ये पाण्याचे हार्डनेस, टीडीएस, सामू यांची तपासणी केली जाते. पाण्याची गुणवत्ता योग्य कशी राखता येईल याची वेळोवेळी काळजी घेतली जाते. जेणेकरून पक्ष्यांना त्रास होत नाहीत. अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन केल्यामुळे पक्ष्यांना पुरेशा प्रमाणात योग्य गुणवत्तेचे पाणी मिळणे सोयीचे झाले आहे.

बॅच नियोजन

एका वर्षात ब्रॉयलर पक्ष्यांच्या साधारणपणे ६ बॅच घेतल्या जातात. एका बॅचमध्ये सुमारे १५ हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. करार केलेल्या कंपनीकडून पिल्ले पुरविली जातात. पिल्ले शेडवर आणण्यापूर्वी शेडची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी बाबी करण्यावर भर दिला जातो. पिल्ले शेडवर आणल्यानंतर साधारणपणे ४० ते ४५ दिवस पक्ष्यांचे संगोपन केले जाते. पक्ष्यांच्या खाद्य, आरोग्य आणि पुरेसे पाणी पुरविण्यावर भर दिला जातो. त्यामुळे पक्ष्यांचे अपेक्षित वजन मिळविणे शक्य होते. योग्य वजनाचे पक्षी झाल्यानंतर त्यांची करार केलेल्या कंपनीला विक्री केली जाते. वजनानुसार कंपनीकडून योग्य मोबदला दिला जातो. त्यातून खर्च वजा जाता चांगले उत्पन्न हाती येते.

कोंबडखताची विक्री

शेडमधून दर्जेदार कोंबडीखताची उपलब्धता होते. खताचा दर्जा चांगला असल्याने शेतीमध्ये वापरासाठी अनेक शेतकऱ्यांकडून खताला चांगली मागणी असते. परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी खत खरेदीसाठी आगामी मागणी नोंदवून ठेवतात. प्रत्येक बॅचमधून साधारपणे ७ ट्रॉली कोंबडीखत उपलब्ध होते. स्वतःच्या शेतीमध्ये वापर करून उर्वरित खताची विक्री केली जाते. विक्रीवेळी प्रति ट्रॉली ८ हजार रुपये इतका दर मिळतो.

उन्हाळ्यातील व्यवस्थापन

मागील काही दिवसांत उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. वाढत्या तापमानात कुक्कुटपक्ष्यांच्या संगोपनात योग्य बदल करणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा पक्ष्यांच्या शरीरावर ताण येऊन मरतुक होण्याची शक्यता असते.

शेडमधील वातावरण थंड राखण्यासाठी शेडच्या छतावर वेल चढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेडचे छत थंड राहून गारवा निर्माण होतो.

उष्ण वारे शेडमध्ये येऊ नयेत, यासाठी शेडच्या बाजूने पडदे लावले आहेत.

दुपारच्या वेळी शेडचे छत गरम झाल्यामुळे शेडमध्ये उष्ण वातावरण निर्मिती होते. त्यासाठी छतावर स्प्रिंलकर लावले आहेत. दुपारच्या वेळी ते चालू करून त्यातून पाण्याचे फवारे सोडले जातात.

शेडमध्ये फॉगर बसविले आहेत. त्यामुळे शेडमध्ये गारवा निर्मिती होण्यास मदत झाली आहे.

वाढत्या तापमानाचा अंदाज घेऊन पक्ष्यांची संख्या कमी ठेवली आहे. सध्याच्या बॅचमध्ये १० हजार पक्ष्यांचे संगोपन केले जात आहे. ही बॅच साधारण १४ मार्चला सुरु झाली आहे. सध्या चालू बॅचमधील पक्षी ३० दिवसांचे झाले आहेत.

सध्या खाद्य, आरोग्य आणि स्वच्छता या बाबींचे काटेकोर नियोजन केले जात आहे. पक्ष्यांना स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात थंड पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ही बॅच या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे.

चालू बॅच संपल्यानंतर १५ दिवसांचा विश्रांती कालावधी ठेवून पुढील बॅचचे नियोजन केले जाईल.

नंदकुमार चौधरी, ९६२३१ १५६७७

(शब्दांकन : संदीप नवले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com