Turmeric Farming Management :
शेतकरी नियोजन पीक : हळद
शेतकरी : संतोष शिवाजीराव दंडे
गाव : मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड
एकूण क्षेत्र : नऊ एकर
हळद लागवड : दोन एकर
नांदेड जिल्ह्यातील सावरगाव (ता.अर्धापूर) शिवारात संतोष शिवाजीराव दंडे यांची नऊ एकर जमीन आहे. त्यात दोन एकरांत हळद लागवड आहे. उर्वरित प्रत्येकी दोन एकरांत ऊस आणि सोयाबीन, तर अडीच एकरांत कापूस लागवड आहे. दंडे यांचे वडील शिवाजीराव हे सरीमध्ये हळद लागवड करायचे. पुढे संतोष यांच्याकडे शेतीची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी लागवड तंत्रात बदल करण्याचे ठरविले. मागील १० वर्षांपासून संतोषराव बेडवर हळद लागवड करत आहेत. योग्य नियोजनानुसार संतोषराव दरवर्षी एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत हळद उत्पादन घेतात.
लागवड नियोजन
या वर्षी दोन एकरांत हळद लागवडीचे नियोजन केले होते. त्यानुसार लागवडीपूर्वी शेतजमिनीची ट्रॅक्टरच्या साह्याने खोल नांगरट करून घेतली.
त्यानंतर एकरी दोन प्रमाणे शेणखत शेतात पसरून घेतले.
लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राने साडेचार फूट अंतरावर बेड तयार केले.
बेडवर दोन ओळींत दीड फूट, तर बेण्यात ९ इंच अंतर राखत झिगझॅक पद्धतीने बेणे लागवड केली. साधारण २० जूनला ही लागवड करण्यात आली.
संपूर्ण दोन एकरांत लागवडीसाठी हळदीच्या सेलम वाणाची निवड करण्यात आली आहे. लागवडीसाठी एकरी ८ क्विंटल बेणे लागले.
लागवडीपूर्वी बेणे बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या द्रावणामध्ये बुडवून घेतले. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जमिनीतून येणाऱ्या कीड-रोगांना अटकाव होण्यास मदत होते.
बेसल डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, एमओपी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा देण्यात आल्या.
लागवडीनंतर १५ दिवसांनंतर १६ एमएमचे ड्रीप लॅटरल टाकून सिंचनाची व्यवस्था केली.
पीक संरक्षण
उगवण झाल्यावर पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
लागवडीनंतर ६० दिवसांनी कंदकुजीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा, मेटाऱ्हायझीम यांचे द्रावण करून आळवणी केली जाईल.
पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशकासह कीटकनाशकाची फवारणी घेतली जाईल.
कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. आवश्कतेनुसार बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या तीन फवारण्या घेतल्या जातील.
आगामी नियोजन
सध्या हळद लागवड होऊन साधारण एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे.
मागील आठवड्यात निंदणी करून घेतली. त्यानंतर १४:३५:१४ हे खत आणि युरिया खताची मात्रा दिली आहे.
सध्या ठिबकद्वारे ०:०:५० हे विद्राव्य खत देण्याचे नियोजित आहे.
पुढील पंधरवड्यात वाफसा आल्यानंतर रासायनिक खतांचे डोस दिले जातील. त्यानंतर बेडला मातीची भर लावली जाईल.
लागवडीनंतर ४५ दिवसांनी तसेच ६० दिवसांनी खत नियोजनामध्ये सातत्य राखले जाईल. यात १२:३२:१६, सूक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी पेंड यांच्या मात्रा दिल्या जातील.
लागवडीच्या ९० दिवसांनंतर विद्राव्य खताचे नियोजन केले जाईल. यात १३:४०:१३, ०:५२:३४ ही विद्राव्य खते दर सात दिवसांनी देण्याचे नियोजित आहे.
संतोष दंडे, ९४२२४ ३०८२४ (शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.