Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Turmeric Productivity : वाशीम जिल्ह्यातील हळद उत्पादकांनी सुधारित तंत्रज्ञान व्यवस्थापनातून हळदीची उत्पादकता व दर्जा वाढविण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी एकरी १५ ते १८ क्विंटलपर्यंत असलेले उत्पादन आता ३० ते ३५ क्विंटलच्या दरम्यान पोहोचले आहे.
Turmeric Farming
Turmeric Farming Agrowon

Washim News : हळद पिकात वाशीम जिल्हा अग्रणी ठरत आहे. सन २०१० ते २०१२ च्या काळात सरासरी १००० ते १५०० हेक्टर असलेले क्षेत्र आजमितीला आठ ते दहा हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. पिकाचे हे महत्त्व लक्षात घेता वाशीम- करडा कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) हळदीची उत्पादकता व गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित केले.

त्यासाठी उत्पादन तंत्रातील बारकाव्यांचा अभ्यास करून त्याचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार केला. आजमितीला साडेतीनशे शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचविण्यात आल्याचे केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील सांगतात. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केव्हीकेने मार्गदर्शन केले. ‘आत्मा’च्या सहकार्याने हंगामात शेतीशाळा, प्रयोग व प्रात्यक्षिके घेतली.

Turmeric Farming
Turmeric Seed : पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी थांबवली हळद बियाणे खरेदी

पूर्वीची जिल्ह्यातील परिस्थिती

-सरासरी उत्पादकता १५ ते १८ क्विंटल प्रति एकर होती.

- पारंपरिक लागवड पद्धतीचा वापर व्हायचा.

-सरी पद्धत किंवा सरळ जमिनीवर लागवड व्हायची.

-पाटपाणी किंवा स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जायचे.

-बियाणे म्हणून कांडीचा वापर होता.

-बेणे प्रक्रिया, जैविक निविष्ठांचा वापर व यांत्रिकीकरण फार नव्हते.

केव्हीकेने दिलेले सुधारित व्यवस्थापन (मागील पाच वर्षांतील)

-वाण सेलम, व काही ठिकाणी पीडीकेव्ही वायगाव.

-लागवडीसाठी ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या, कीड- रोग मुक्त मातृकंद बेण्याचा वापर.

-उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीपूर्व १५ दिवस आधी बेण्यावर पाणी शिंपडणे.

-बेण्यावर जैविक, रासायनिक प्रक्रिया.

-गादीवाफा (बेड- (चार फूट रुंदी, सव्वा ते दीड फूट उंची) पद्धत, ठिबक, रासायनिक व सेंद्रिय अशी संतुलित व शिफारशीत खते असा वापर होऊ लागला. पिकाला भर घालणे सुरू झाले.

-प्रति हेक्‍टरी २५ टन शेणखत वा गांडूळ खत अधिक २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद अधिक २०० किलो पालाश असा शिफारशीप्रमाणे खतांचा वापर. वाढीच्या अवस्थेनुसार खते विभागून देणे.

-करपा या प्रमुख रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपाययोजनांवर जोर दिला.

हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी मेटॅरायझीयम या जैविक कीडनाशकाचा प्रतिबंधात्मक वापर.

साध्य उत्पादकता

-एकरी सरासरी उत्पादकता २२ ते २५ क्विंटल (वाळवलेली) मिळू लागली. सर्वाधिक उत्पादकता ४० ते ४८ क्विंटलपर्यंत पोहोचली.

-एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्याने उत्पादनात १६ टक्के, मातृकंद बेणे वापर केल्याने

१३ टक्के, बेणे प्रक्रिया, नवे वाण वापर यातून २२ टक्के, तर सेंद्रिय व रासायनिक पद्धतीवर अधिक भर दिलेल्या पद्धतीतून ३२ ते ४४ टक्के अशी उत्पादनवाढ मिळाली.

हळद उत्पादकांचे अनुभव

सुमारे २५ वर्षांपासून हळद घेत आहे. दरवर्षी ४ ते ५ एकर क्षेत्र या पिकाखाली असते. पूर्वी एकरी १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. केव्हीकेचे तंत्रज्ञान हळूहळू आत्मसात करीत व स्वअनुभवातून बारकावे लक्षात घेत आता ४० क्विंटलपर्यंत उत्पादनवाढीपर्यंत पोहोचलो आहे. किमान ३० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादकता आहे. सेंद्रिय, जैविक निविष्ठांचा पुरेपूर वापर करीत आहे. मातृकंद बेणे म्हणून वापरतो.

गजानन ढवळे, ९१४६८८१६८ शिरपूर जैन, जि. वाशीम

Turmeric Farming
Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

मागील १० वर्षांपासून हळद घेत आहे. पूर्वी रासायनिक पद्धतीवर अधिक भर होता. एकरी १५ ते ते १८ क्विंटल उत्पादन मिळायचे. पाच वर्षापासून ‘केव्हीके’च्या मार्गदर्शनात एकात्मिक आणि सेंद्रिय पद्धतीवर भर देऊन सुधारित पद्धतीने व्यवस्थापन करतो आहे. सेलम वाणाचे सरासरी ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेत आहे. जमिनीचा पोत खूप चांगला आहे.

-गोविंद देशमुख, ९५५२३२७१९८ करडा

पाच वर्षांपासून दोन- तीन एकरांवर हळद घेत असून, सुधारित व्यवस्थापनातून पीडीकेव्ही वायगाव वाणाचे एकरी सरासरी २४ क्विंटलपर्यंत उत्पादन घेत आहे.

-योगेश खानझोडे, ९८३४७४७८३४ आसेगाव

चार-पाच वर्षांपासून हळद घेतो. पूर्वी एकरी १५ ते १८ क्विंटल उत्पादन मिळायचे. आता ३४ ते ३६ क्विंटल उत्पादनापर्यंत पोहोचलो आहे. उत्पादन खर्चात सुमारे ४० टक्के बचत झाली आहे. प्रत्येकी वीस गुंठे सेंद्रिय व रासायनिक पद्धतीने हळदीचा प्रयोग केला आहे. शेणखताचा वापर एकरी पाच-सहा ट्रॉलीपर्यंत करतो.

यंदा तो १० ट्रॉलीपर्यंत वाढवणार आहे. मागील दोन ते तीन वर्षे क्विंटलला पाच हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. नुकतीच चार क्विंटल हळद वाशीम मार्केटला घेऊन आलो आहे. सध्या १५ हजार ते १६ हजार रुपये दर सुरू आहे. हळदीचे अर्थशास्त्र किफायतशीर वाटत असल्यानेच यंदा दीड ते दोन एकर क्षेत्र वाढवले आहे. यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. बेडमेकर तर आहेच. पण स्वयंचलित पद्धतीचे लागवड यंत्रही आणणार आहे.

गणेश गव्हाणे, ९२८४४३६००४ कोयाळी, जि. वाशीम

चौदा वर्षांपासून हळद घेतो. दरवर्षी १० ते १५ एकरांदरम्यान लागवड असते. यांत्रिकीकरण करून खर्च आणि मजुरीत बचत झाली आहे. सेलम वाणाचे सरासरी ३५ क्विंटल उत्पादन मिळते.

भय्यासाहेब देशमुख, ९४२३८४३५१६ लिंगा

रिसोड तालुक्यात सर्वात आधी भर जहाँगीर येथे हळद लागवडीला सुरवात करण्यात आली. आमच्या कुटुंबात आजोबांच्या काळापासून हे पीक घेत आहोत. दरवर्षी सहा एकरांत हळद लागवड करतो. त्यातून आर्थिक स्थिती सुधारली आहे. यंदा एकरी ३० क्विंटल उत्पादन मिळाले. हे पीक फायद्याचे असून जमिनीचा पोतही त्यातून सुधारतो. भावांत तेजी येणार असल्याचे अंदाज असून अजून विक्री केलेली नाही. रिसोड बाजार समितीतील दरांवर लक्ष ठेवून आहोत.

- शंकर चोपडे, भर जहाँगीर, ता. रिसोड

संपर्क ः निवृत्ती पाटील, ९९२१००८५७५

(उद्यानविद्या तज्ज्ञ, केव्हीके, करडा, जि. वाशीम)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com