Gram Panchayat Elections : निवडणुका उन्नतीचे की सत्ताकरणाचे साधन

कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविणे व त्याची दिशा ठरवून अंमलबजावणी करणे अशा स्वरूपाचा विषय असताना त्याला अकारण राजकीय स्वरूप दिले जाते, ही खरी शोकांतिका आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Agrowon

मागील महिन्यात हजारांवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Elections) पार पडल्या व त्याचा निकाल लागून महिना होत नाही तोच नवीन ७७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होऊ घातल्या आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत (Zilla Parishad) समित्यांच्या तसेच विविध महापालिकांच्या निवडणुका होतील.

अशाप्रकारे हे राज्य कायम निवडणुकांच्या ज्वरात ठेवण्याचे काम राजकीय पक्ष इमानेइतबारे करत आहेत. राजकीय पक्ष असोत की, प्रसार माध्यमे असो ते असा काही माहोल तयार करतात की, येणारी निवडणूक हा जणू काही लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यातून खरे व मूलभूत प्रश्न मागे पडतात.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीची आजपासून रणधुमाळी

सर्व पक्षांनाच आपल्यालाच यश मिळालेच पाहिजे किंवा मिळणार अशी धारणा बनून जाते. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारासह स्थानिक नेते/ कार्यकर्ते या निवडणुकांसाठी आपले कसब पणाला लावताना दिसतात. त्यांच्या दृष्टीने या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका/जिल्हा पातळीवरील निवडणुकीसाठी होईल, या उद्देशाने सर्वांची धडपड दिसून येते.

त्यामुळे सार्वजनिक विकास अथवा सर्वांगीण विकास व गावातील गोष्टींचा गाव म्हणून केंद्रीभूत धरून करावयाच्या विकासाच्या वल्गना केवळ प्रचारी व तोंडी लावण्यासाठी होतात. त्याच्याशी कुणाचे काही फार देणे घेणे असतेच असे नाही. केवळ ईर्षा व सत्ता स्पर्धेसाठी सगळ्या गोष्टी घडविल्या जातात. त्यातून मोठ्या प्रमाणावर गैरमार्गाने निवडणुका लढविण्याची स्पर्धा चालू असून मताच्या किमतीचे आश्चर्यकारक आकडे समोर येत आहेत. याशिवाय इतर कितीतरी गैरप्रकार चालू आहेत.

लोकही त्याची खुमासदार चर्चा करीत असतात. हे सर्व प्रकार लोकशाहीला साक्षी ठेवून केले जातात. या सर्व गोष्टीत मतदारही कळत नकळत वाहवत जात आहे व गैरप्रकारांना एक प्रकारे प्रोत्साहन देत आहे. त्यातच राज्यातील सध्याच्या राजकीय स्थित्यंतराच्या परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींत निवडणूक

निवडणुका जास्तीत जास्त फायद्याच्या वेळी जाहीर करणे, त्यात निवडून येणे/आणणे व सत्ता हाती घेणे हा तर राजकारण्यांचा धंदा आहे. एकूणच सर्व राजकारण्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित आहे. लोकांमधील ईर्षेला प्रोत्साहन देणे, केवळ सत्तेसाठी राजकारण करणे, जात-पात, भावकी-रावकीचे घोडे दामटून लोकांची दिशाभूल करणे, सत्ता संपत्तीच्या खेळात लोकांना लाचार बनवायचे, लालूच दाखवायची, लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावतात.

त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. उमेदवाराची पात्रता, चारित्र्य, व्यक्तिगत सचोटी, कर्तबगारी, सेवावृत्ती, गावाविषयीची आत्मीयता याचा विसर पडून राजकारणापायी कोणाची तरी तळी उचलली जाते. आज इतक्या वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही खेडी बकाल होत चालली आहेत. गावातील माणूस हवालदिल आहे.

हे दिसत असूनसुद्धा निवडणुकीत लोकांना लालूच दाखवून व त्याचे लाभार्थी बनवून आपला कार्यभाग साध्य करावयाचा हेच निवडणुकीचे उद्दिष्ट बनले आहे. निवडणुकीच्या माध्यमातून केवळ प्रतिष्ठा व सत्ता मिळवून लोकांच्यात गटबाजी, वादविवाद व जीवघेण्या स्पर्धेतून पोलीस स्टेशन कोर्ट-कचेरीतील प्रकरणांत वाढ होत आहे.

विकास पुरता खुंटून कोसो दूर लांब राहतो आहे. असत्य, खोटा, विखारी प्रचार, व्यक्तिगत हेवेदावे घुसडले जाऊन समाजात बेबनाव निर्माण होतोय. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. सुजाण व जाणकार नागरिक मूग गिळून बसू पाहत आहेत

Gram Panchayat Election
Gram Panchayats Election : परभणी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

वास्तविक पाहता गाव म्हणजे गावातील सर्व लहान-थोर, शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, शेतकरी-व्यावसायिक, शेतमजूर कामगार, अपंग यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वांना समान संधी व विविध उपयोगी सुविधा उपलब्ध करणे, हे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे आद्य कर्तव्य आहे.

गावातील शांततापूर्ण व सौहार्ददायी सहजीवनाच्या निर्मितीसाठी जनतेच्या विवेकाचा वापर करून गावातील ज्येष्ठ व जाणकार मंडळींच्या साहाय्याने जास्तीत जास्त लोकांच्या सहभाग वाढवून गावातील विचाराने गावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठीचा आविष्कार म्हणून निवडणुकीकडे पाहायला हवे.

निवडणुकांना पक्षीय राजकारणाचा अड्डा बनविण्यात काय हशील आहे? गावाबद्दल अपार प्रेम, सकारात्मक विचार, विचारप्रवृत्ती, गुणवत्ता, सक्रियता व कार्यक्षमतेच्या जोरावर आपण मोठ्यातले मोठे प्रश्न सोडवू शकतो, असा विश्वास निर्माण करून ज्याच्या मनात गावाविषयी खरोखर कळकळ आहे, अशा उमेदवारांना गावकऱ्यांनी निवडून द्यायला हवे.

त्याद्वारे गाव शिवारात आमूलाग्र बदल घडू शकतो हे पोपटराव पवार, भास्करराव पेरे पाटील यांच्यासारख्या अनेक धुरीणांनी सिद्ध केलेले आहे. हेच तर २१व्या शतकाचे समाजकारण विकासाचे व कार्यक्षमतेचे लक्षण आहे.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Elections : जळगाव तालुक्यात होणार १२ लोकनियुक्त सरपंच

तसे पाहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा राजकीय पक्षाशी संबंध जोडणे कितपत गरजेचे आहे? सर्व गावगाड्यातील लोकांचे कल्याण साधने हेच उद्दिष्ट असताना गाव किंवा भागासारख्या मर्यादित कार्यक्षेत्रात लोकांना एकमेकांची ओळख चांगल्या प्रकारे असते. तसेच गाव/भाग पातळीवर देश-राज्य पातळीवरील धोरणात्मक किंवा वैचारिक निर्णय घेण्याचा विषयही नसतो.

शिवाय गावातील सर्वांचे हितसंबंध एकमेकांवर अवलंबून असताना गावातील उमेदवाराची निवड व्यक्तिगत सचोटी, कर्तबगारी, सेवावृत्ती लक्षात घेऊन गावातील लोकच सक्षमपणे करू शकतात. गावातील समस्या, ग्रामपंचायतीचे अधिकार, योजना, निधी उभे करण्याचे मार्ग यासाठी गावातील लोकांचा जास्तीत जास्त सहभागाने सर्वांगीण विकासास मदत होऊन सगळ्यांच्या विकासात आपलाही विकास ही भावनाही वाढू शकते.

एकमेकातील विश्वास व आस्था आपल्याला या सर्व गोष्टीत तारून नेऊ शकतील. या सर्व प्रक्रियेत राजकीय पक्षांची किंवा पक्षीय अभिनिवेशाची गरज ती काय? सर्व राजकीय पक्षांचा ग्रामपंचायतीपासून ते महापालिकेपर्यंत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत आपलेच राज्य हवे हा अट्टहास असतो. स्थानिक सर्वपक्षीय लोकांनी स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर गुणवत्तेवर आधारित एकत्र येण्याचा निर्धार केल्यास सर्वच पक्षांचा अट्टहास मोडून ‘नांदा सौख्यभरे’चा गजर झाल्याशिवाय राहणार नाही.

या सर्व परिस्थितीचा विचार करता स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांना बाजूला ठेवून राजकारणामुळे निर्माण होणाऱ्या मतभेदांना तिलांजली देऊयात. आपण सर्वच राजकीय पक्ष विरहित निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार करुया.

एक नवीन मतप्रवाह सुरू करावा व या विचारला मागे पुढे न पाहता डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये कृतिशील अमलात आणल्यास तुमच्या गावच्या इतिहासात नव्या राजकीय इतिहासाचे पान उघडल्याशिवाय राहणार नाही. गावच्या विकासासाठी ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ ही घोषणा घेऊन कामाला लागल्यास सुजलाम सुफलाम गावाची पहाट दूर नाही.

(लेखक शेतकरी असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com