Irriagation Management : पाट पाण्याचा कार्यक्षम वापर

Agriculture Water Management : पाट पाण्यातही कार्यक्षमता वाढविण्याचे भरपूर मार्ग आहेत. त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन होणे गरजेचे वाटते. सर्वप्रथम पाट पाण्यात कार्यक्षमता वाढविण्याचे मार्ग आहेत. याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
Agriculture Management
Agriculture ManagementAgrowon
Published on
Updated on

Water use in Agriculture Irrigation : पाट पाण्याच्या कार्यक्षमता वाढविण्याबाबत पुरातन काळापासून शेतकरी काहीसा जागरूक आहे. भारतात १९५० च्या सुमाराला ऑइल इंजिन पंप आले असावेत. तत्पूर्वी मोटेने पाणी खेचले जाऊन त्यावर ओलित होत असे. पावसाळा अखेर पाटातील तणे भांगलून काढून पाट साफ केले जात. असे पाट भेगाळत. भेगामध्ये पाणी मुरू दिल्यास रानापर्यंत पाणी पोहोचणे अवघड होई. मग पहाटे चार- पाच वाजता उठून शेणाने पाट सारविले जात. सारवून पूर्ण झाल्यानंतर मोट चालू केली जाई.

मोटेने पाणी खेचणे हे प्रामुख्याने बैलाने केले जात असे. ते अतिशय कष्टाचे काम असल्यामुळे पहाटे चालू करून उन्हे वाढण्यापूर्वी बंद करावे लागे. मोटेच्या पाण्याचा प्रवाह थांबून थांबून होत असल्याने ही काळजी घेतली जाई. ही कार्यक्षमता वाढविण्याचा पुरातन प्रकार पुढे प्रथम ऑइल इंजिन पंप आणि पुढे वीज मोटार पंप असे बदल झाले. पाणी एकसारख्या प्रवाहाने भरपूर मिळू लागल्यानंतर हे सारविणे बंद झाले. आज हे वाचून नव्या पिढीतील शेतकरी आश्‍चर्यचकित होतील.

प्रथम सिमेंट पाइप व पुढे पीव्हीसी पाइपच वापर करून पार रानापर्यंत पाणी पोहोच करणे हाही एक कार्यक्षमता वाढविण्याचाच प्रकार. पाणी चढावर नेण्यासाठी नळ्यांची गरज आहे. परंतु पूर्वी उताराने दूरवर पाणी फिरविले जाई. आजही अनेक ठिकाणी चढावर पाणी नेल्यानंतर सर्वत्र पाटानेच खेळविले जाते. अशा जागी नळे घालून पाणी नेले तर खूप कार्यक्षमता वाढेल हे कळत असूनही असे सर्वत्र नळे घालणे हे खूप खर्चिक काम असल्याने भारतीय शेतकऱ्यांची क्रयशक्ती विचारात घेता पाट पाणी अपरिहार्य आहे.

पाटाने सतत ओल असल्याने तणे वाढतात. पाणी तणाला तटल्याने त्याचे पाझरण्याचे प्रमाण वाढते. अभ्यासकांनी असे सांगितले आहे, की पाटात पाणी पडल्यापासून रानापर्यंत जवळपास पाझरून ५० टक्के पाणी कमी होते. अशा वेळी पाणी उपसण्याची साधने दुप्पट वेळ चालवावी लागतात. इथे फक्त पाण्याचेच नुकसान होत नाही. पाटाच्या बाजूचे मीटर दोन मीटर रानात सतत गरजेपेक्षा जास्त ओलावा राहिल्याने पिकाची वाढ खुंटते. उत्पादनाचे नुकसान होते. त्या जागी बहुवार्षिक तणे वाढतात ती स्वच्छ करणे अवघड झाल्याने त्या क्षेत्राला पाणी देताना पाण्याचे नुकसान होतेच, या व्यतिरिक्त पाटाने पाणी देत असता पाण्याचे कट्टे धरणे खूप अवघड बनते. बऱ्याच वेळा अशा कट्ट्यातून पाण्याचा पाझर चालूच राहिल्याने पाण्याचा गैरवापर वाढतो.

Agriculture Management
Agriculture Water Management : उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर महत्त्वाचा

पाटातील तणनियंत्रण

पाटात भांगलणी करून पाट स्वच्छ राखणे याचे महत्त्व सर्वांना कळते; परंतु पाटात अशी काही गवतवर्गीय तणे वाढतात की ती मानवी हाताने काढणे खूप अवघड असते. अशावेळी कापून काढली जातात. अशी तणे झपाट्याने परत वाढतात. यात शेतकरी कंटाळून साफसफाई बंद करतो. ग्लायफोसेटसारख्या तणनाशकाच्या आगमनानंतर पाटातील तणे मारणे खूप सोपे झाले. मी प्रथम आमचे गावातील पाणीपुरवठा संस्थेला ग्लायफोसेटचे प्रात्यक्षिक दाखविले त्यानंतर त्याचा वापर संस्था करू लागली. पाटाचे तळ व पाटाचे दोन्ही बाजूंची चढावरील गवती तणे ग्लायफोसेटने बऱ्यापैकी मारणे सोपे झाले.

बटण दाबले की पाण्याचा मोठा प्रवाह वाढू लागल्याने नवीन पिढीत पाटाकडे लक्ष देण्याचे महत्त्व कमी झाले आहे. आमच्या भागात बहुतेक गावात १-२ पाणीपुरवठा संस्थांकडून पाण्याचा पुरवठा केला जातो. खासगी क्षेत्रावरील पाट लहान व कमी लांबीचे असतात. पाणीपुरवठा संस्थेचे पाट मोठे व लांबीला जास्त असतात. संस्थेतर्फे मोठे पाट स्वच्छ करण्याचे काम चालते. परंतु मोठ्या पाटापासून शेतकऱ्यांच्या रानापर्यंतचे पाट शेतकऱ्यांनी साफ ठेवणे बंधनकारक असते. असे पाट अनेक शेतकऱ्यांच्या रानातून जात असतात. तो स्वच्छ करत नाही मग मी एकटाच का करू अशा वादात असे पाट नेहमीच अस्वच्छच राहतात. वादविवाद टाळण्यासाठी संस्था पाण्याचे नुकसानीला सामोरे जाणे पसंत करते. येथे तणनाशक उत्तम काम करू शकते.

पर्यावरणासाठी शेताच्या बांधावर झाडे लावण्याची गरज सांगितली जाते. मात्र पाटालगत अशी मोठी झाडे अगर झुडपे नकोत. पूर्वी मजूर टंचाई नव्हती. या काळात प्रत्येक पाटावर दोन पाणके ठेवण्याची प्रथा होती. एक पाटाचे बाजूला दारे मोडायला तर दुसरा आलेल्या सऱ्या बंद करण्यास सांगण्यासाठी, यातून पाण्याची बचत होत असे व पोहोच पाणी देता येई. अलीकडे एकच पाणक्या असल्याने तो विरुद्ध बाजूला पाणी पोहोचल्याचे पाहून पाटाकडे येऊन पाणी बंद करेपर्यंत पाणी गरजेपेक्षा

भरपूर जास्त जाते व सरीच्या शेवटी ४-६ मीटर जाऊन तेथे साठून राहाते. पाटाकडील सरी पाण्याला आली तरी विरुद्ध बाजूची ओल वाळलेली नसते. यामुळे सर्वत्र पीक एकसारखे असते; परंतु सरीचे शेवटचे ४-६ मीटर पीक डावे असते. विरुद्ध बाजूस पाणक्या ठेवणे गरजेचे असूनही आता शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून (पाटाचे) विरुद्ध बाजूची तोंडे रिकामी करून जादा पाणी रानाबाहेर निघून जाईल, अशी सोय करावी लागली.

Agriculture Management
Water Management : गव्हासाठी पाणी व्यवस्थापन

ऊस शेतीमधील अनुभव

उसाला सरी वरंब्याने पाणी दिले जाते. खांदणीच्या वेळी औताने कडेला थोडी जादा माती गेल्याने कडेला चढ होतो. नाके करीत असता काळजीपूर्वक भरून तो आत टाकला नाही तर कडेचे १ मीटर पाणी पाटापर्यंत चढविण्यासाठी मागे ३-४ मीटर सरीत पाणी तुंबवावे लागते. अशा वेळी पाण्याचा वापर वाढतो. त्याचबरोबर पिकाचेही नुकसानी होते. यासाठी सरी सोडल्यावर अगर भरणीनंतर काळजीपूर्वक नाके करणे गरजेचे असते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नाके देण्याच्या कामाचे कंत्राट देणे बंद केले आणि स्वतः उभा राहून नाके करून घेण्यास प्रारंभ केला. त्यानंतर नाके करण्याच्या कामात फक्त खोरे व टिकावाबरोबर एक घमेलेही नेणे चालू झाले.

उसाला मशागत करून सऱ्या पाडत असता सुरुवातीला ३५ अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या पल्टी फाळाने काढल्या जात. अशा सऱ्या काढत असता एक चाक सरीतून व एक चाक वरंब्यावरून जाते. यामुळे तेथील जमीन दबली जाते. सरीत पाणी सोडल्यानंतर या दबण्यामुळे बाजूला पाणी मर्यादित पाझरे. मशागतीचे भाडे वाचविण्यासाठी पॉवर टिलर घेतला. पॉवर टिलरने नांगरणी आणि बैलाने (स्वतःच्या) सरी सोडली. रान कोठेच दबले न गेल्याने सरी कडेला जाण्यास प्रचंड वेळ लागू लागला. पाण्याचा वापर वाढला त्याचबरोबर रानास वाफसा येण्यास दुप्पट कालावधी लागू लागला. मग रान दबले जाण्याचे महत्त्व लक्षात आले. परत काही काळ ट्रॅक्टरने सरी सोडणे सुरू करून भाडे मोजले. पुढे ४५ सेंमी रान नांगरणी व पुढील ४५ सेंमी रान नांगरणी बंद असे चालू केले. नांगरणी केलेल्या रानात रिजर (बैलाचा) चालवून सऱ्या काढल्या.

वरंब्याखालील जमीन नांगरलेली नसल्याने आडवे पाणी पाझरले नाही. भाडे वाचले. पुढे १०० टक्के विना नांगरणीची शेती चालू केल्यानंतर सरीत सोडलेले पाणी चटकन विरुद्ध कडेला पोहोचू लागले. उसाची सुरुवातीच्या काळातील पाण्याची गरज कमी असते, ती उत्तम प्रकारे भागविली गेली. पाण्याची बचत झाली व उत्पादनात वाढ झाली. कमीत कमी पाण्यात पाण्याचा फेर तर पाण्याच्या दोन पाळ्यांत योग्य अंतर हा कार्यक्षम पाणी वापराचा मंत्र पूर्ण झाला. बाकी या तंत्राचे काही फायदे यापूर्वी दिले आहेत.

पिकाच्या वाढीची व हवामानाची अवस्था पाहून रानाला पाटाचे पाणी देणे कमी जास्त करणे गरजेचे असते. यासाठी उपलब्ध पाटाचे पाणी एकावेळी किती सऱ्यांना लावावे हे कौशल्य शेतकऱ्याने प्राप्त करणे गरजेचे आहे, हे लेखन वाचून अगर भाषणात ऐकून समजणारे नाही. यासाठी निरीक्षणशक्ती जागृत ठेवून स्वतः पाणी पिकाला देण्यास उभे राहणे गरजेचे आहे.

शेवटी पाणी बचत म्हणजे ठिबक अगर तुषार असे नसून आपल्या पाट पाण्यातही बचतीचे अनेक मार्ग आहेत. यावर फारशी चर्चा होत नसल्याने ‘कार्यक्षम पाणी वापर’ या मालिकेत हा विषय मी स्वतःच्या अनुभवातून लिहिला आहे. जास्तीत जास्त कार्यक्षमता गाठू शकलो तर ठिबक तुषारपेक्षा पीकवाढीसाठी पाटपाणी हीच पद्धत जास्त चांगली आहे. प्रत्येकात काही फायदे काही तोटे असणारच! इथे या विदेशी तंत्राला नावे ठेवण्याचा उद्देश अजिबात नाही. माझ्याकडेही ५० टक्के जमिनीला ठिबक काही ठिकाणी तुषार वापर चालू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com