Grape Management : पावसानंतर ‘ऑक्टोबर हीट’ चे द्राक्ष बागेवरील परिणाम

Grape Advisory : द्राक्ष लागवडीखालील विविध विभागांमध्ये वातावरणाचा आढावा घेतला असता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार फार लवकर मॉन्सून राज्यातून बाहेर पडत असल्याचे बोलले जाते.
Grape Management
Grape ManagementAgrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर

Grape Crop : द्राक्ष लागवडीखालील विविध विभागांमध्ये वातावरणाचा आढावा घेतला असता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार फार लवकर मॉन्सून राज्यातून बाहेर पडत असल्याचे बोलले जाते. या वातावरणाचा विचार करता दिवसाच्या किमान व कमाल तापमानात वाढ होताना दिसते. त्यामुळे थंडी सुरू होण्याची लक्षणे कमी राहून उष्णता जास्त राहील. यालाच ‘ऑक्टोबर हीट’ असेही म्हटले जाते.

या ऑक्टोबर हीटचा अनुभव दरवर्षी असला तरी या वर्षी बऱ्याच ठिकाणी कमी अधिक पाऊस झाल्यामुळे ही ऑक्टोबर हीट जास्त प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. या वातावरणाचे परिणामही द्राक्ष बागेवर दिसून येतील. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्या बागेमध्ये असलेल्या विविध अवस्थांतील बागेमध्ये करावयाची कार्यवाही जाणून घेऊ.

१) पानगळ न होण्याची समस्या ः
गेल्या आठवड्यात नाशिक येथील द्राक्ष बागायतदारांशी झालेल्या चर्चेत फळछाटणीपूर्वी रसायनाचा वापर करूनही योग्य प्रमाणात होत नसल्याचे अनेकांनी सांगितले. ही समस्या फक्त नाशिकचीच नसून, अन्य भागातही अशीच थोडीबहुत परिस्थिती असल्याचे बोलले जाते. फळछाटणीनंतर डोळे लवकर फुटून एकसारखी फूट निघावी, या उद्देशाने साधारण पंधरा दिवस आधी इथेफॉनची फवारणी केली जाते. मात्र या वर्षी या फवारणीचे परिणाम चांगले मिळत नसल्याचे कळते. पानगळ होण्यासाठी वेलीवर फवारणीचे कव्हरेज पूर्ण होणे गरजेचे असते. फवारणी करण्यापूर्वी द्राक्षवेलीला पाण्याचा ताण बसणे तितकेच गरजेचे असते.

फवारणी करण्याआधी पाच ते सहा दिवसाआधी बागेचे पाणी बंद करावे लागते. वेलीला जितका ताण बसेल, तितकी पानगळ चांगली होईल. त्यानंतर इथेफॉन अडीच ते तीन मि.लि. अधिक ०-५२-३४ हे खत पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची फवारणी केली जाते. या द्रावणाचा सामू ३ पर्यंत असतो. फवारणीची मात्रा बागेतील कॅनॉपी किती आहे, यानुसार ठरेल. आधीच रोगग्रस्त झालेल्या कॅनॉपीला कमी द्रावण लागेल, तर पूर्ण कॅनॉपी असलेल्या बागेला साधारण पाचशे लिटर द्रावण प्रति एकर लागेल.

फवारणीच्या तीन ते चार दिवसानंतर वेलीचे एक ते दोन पाने पिवळी पडून खाली गळू लागतील. अकरा ते बारा दिवसात पूर्ण पाने गळायला हवीत. या वेळी वेलीत इथिलीनचे प्रमाण हळूहळू वाढत जाऊन ऑक्झिन्स हळूहळू कमी होत पानातील अन्नद्रव्ये देठाद्वारे डोळ्यात येऊन साठते. पान आपल्याच वजनाने गळून खाली पडते. ही परिस्थिती मिळण्यासाठी वेलीला ताण बसणे महत्त्वाचे असते.

Grape Management
Grape Management : अवकाळी पावसाचे बागेवरील परिणाम

साधारणपणे पुढील एक किंवा अनेक कारणांमुळे पानगळीवर परिणाम झालेला असावा.
१) ज्या बागेत बोर्डोच्या फवारण्या जास्त प्रमाणात झाल्या आहेत, अशा ठिकाणी पानांची मजबुती जास्त असेल व त्यामुळे वापरलेली इथेफॉनची मात्रा पुरेशी झाली नसेल.
२) गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला, त्यामुळे वेलीला पाण्याचा ताण बसला नसावा.


३) या पूर्वी झालेल्या संशोधनातून इथेफॉनसोबत ०-५२-३४ या खतांचे परिणाम पानगळीसाठी चांगले मिळत असल्याचे निष्कर्ष होते. मात्र या वर्षी बऱ्याच बागायतदारांनी इथेफॉन सोबत ०-५२-३४ ऐवजी स्वतःच १८-४६-० किंवा १३-०-४५ या सारख्या खतांचा वापर केल्याचे समजते. या खतात नत्र असल्यामुळे त्याची फवारणी केल्यास पानांची देठ व काडीसोबत उलटी मजबुती अधिक वाढेल. यामुळे पानगळीस अडचणी येतील.
४) जास्त काळ ढगाळ वातावरण टिकून राहिल्यामुळे काडी तापण्यासाठी वेलीला वेळ मिळाला नसावा.

सध्याच्या स्थितीमध्ये पुढील काळात छाटणी होत असलेल्या बागेत पुढील उपाययोजना उपयोगी ठरतील.
१) इथेफॉनच्या फवारणीपूर्वी वेलीला पाण्याचा ताण गरजेचा असेल.
२) बोर्डो मिश्रणाची जास्त प्रमाणात फवारणी झालेल्या बागेत इथेफॉनची मात्रा (३.५ मि.लि. प्रति लिटरपर्यंत) वाढवावी.


३) इथेफॉनच्या फवारणीनंतर लगेच पाऊस झाल्यास पानगळीचा परिणाम मिळणार नाही. तेव्हा पाऊस थांबल्यानंतर जमीन वाफशात येताच पुन्हा तितक्याच मात्रेने इथेफॉनची फवारणी करावी.


२) घडकुज व डाऊनी मिल्ड्यूची समस्या ः
बऱ्याचशा बागेत छाटणीनंतर प्री ब्लूम अवस्थेत घडकुज व डाऊनी मिल्ड्यूची समस्या दिसून येते. फळछाटणीनंतर बागेत आपण वेलीच्या प्रत्येक काडीवर साधारण चार ते पाच डोळ्यावर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग करतो. इथेफॉनचा वापर केल्यामुळे डोळे चांगले फुगलेले असतात. त्यामुळे सर्वच डोळे फुटून निघतात. यानंतर घड पाच पानांच्या अवस्थेत स्पष्टपणे दिसून येतो. ही अवस्था फळछाटणीनंतर साधारणपणे चौदाव्या दिवसानंतर दिसून येते.

या कालावधीत फेलफुटी काढण्याला प्राधान्य दिले जाते. वाढीच्या या अवस्थेत पाऊस जास्त प्रमाणात झालेला असल्यास बागेत अचानक आर्द्रता वाढते. आपण या वेळी कॅनॉपी नसल्याचे समजतो, पण परिस्थितीचा आढावा घेतल्यास असे लक्षात येईल की एका काडीवर साधारणपणे २५ पाने या वेळी असतात. वेलीवर जर चाळीस काड्या असतील, तर एक हजार पाने झाली.

म्हणजे प्री ब्लूम घड अवस्थेत नुकताच पाऊस झाल्यामुळे या छोट्याशा कॅनॉपीमध्ये आर्द्रता वाढू शकते. या कॅनॉपीमध्ये दम घुटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते.दोन ओळीमध्ये असलेली मुळे पाऊस जास्त झाल्यामुळे कार्यरत होते. मुळांद्वारे ऑक्झिन्सची उत्पत्ती जास्त होत असल्यामुळे वेलीमध्ये अंतर्गत जिबरेलिन तितक्याच प्रमाणात वाढू लागते. परिणामी, पानांची लवचिकता वाढून वेल अशक्त होण्याची लक्षणे दिसतात. प्री ब्लूम किंवा दोडा अवस्थेत असलेल्या घडांवर पाण्याचे थेंब साचून राहिल्यास कुजेला बळी पडतात. बऱ्याच परिस्थितीत रात्री झालेल्या पावसानंतर सकाळी बागेत संपूर्ण घड कुजलेले दिसू शकतात.


बऱ्याच बागेत पावसाळी वातावरणात गवतही जास्त प्रमाणात वाढते. पाऊस झाल्यानंतर या गवतामुळे जमिनीवरील भागात आर्द्रता जास्त काळ टिकून राहते. ओलांडा ते जमीन हे अंतर कमी असते. ढगाळ वातावरणात हवाही खेळती राहत नाहीत. या दोन्ही गोष्टींमुळे आर्द्रतेचे प्रमाण अधिकच वाढते. हे डाऊनी मिल्ड्यू रोगाच्या प्रादुर्भावासाठी पोषक ठरते. ही परिस्थिती दाट कॅनॉपी असलेल्या ठिकाणी हमखास दिसून येते. याचा अर्थ कुज आणि डाऊनीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कॅनॉपीवर लक्ष देणे आवश्यक आहे.

यावर पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.
१) घड स्पष्टपणे दिसताच फेलफुटी त्वरित काढून घ्याव्यात.
२) वेलीवर झिंक आणि बोरॉन प्रत्येकी अर्धा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे करून घ्यावी.
३) पालाश (०-०-५० ) एक ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करून घ्यावी. यामुळे वेल सशक्त होण्यास मदत होईल.
४) एखादे सायटोकायनीनयुक्त संजीवक कमी प्रमाणात फवारून घ्यावे.
५) पाऊस जास्त असलेल्या परिस्थितीत ओलांडा किंवा खोडावर चाकूने जखम करावी. त्यामुळे सायटोकायनीनची पातळी वाढण्यास मदत होते.
---------------
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com