
Shetkari Niyojan : परभणी जिल्ह्यातील देऊळगाव दुधाटे (ता. पूर्णा) येथील मोतीराम दुधाटे यांनी रेशीम उद्योगात चांगला जम बसविला आहे. काटेकोर व्यवस्थापनातून दर्जेदार कोष उत्पादनाचे कौशल्य अवगत केले आहे. सध्या वाढत्या तापमानाच्या स्थितीत योग्य उपाययोजना करून उन्हाळ्यातही दर्जेदार रेशीम कोषाचे उत्पादन घेत आहेत.
शेतकरी नियोजन ः रेशीम शेती
शेतकरी ः मोतीराम दुधाटे
गाव ः देऊळगाव दुधाटे, ता.पूर्णा, जि. परभणी.
एकूण क्षेत्र ः १० एकर
तुती लागवड ः २ एकर
मोतीराम दुधाटे यांचे मोतीराम, शिवराम, दामाजी या तीन भावांच्या संयुक्त कुटुंबाची १० एकर शेती आहे. हवामान बदलाच्या स्थितीत उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी २०१६ मध्ये श्री. दुधाटे रेशीम शेतीकडे वळाले. मनरेगा अंतर्गत तुती लागवडीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी करून व्यवसायास सुरुवात केली.
तुती बाग व्यवस्थापन ः
तुती लागवड करण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत २० ट्रॉली प्रमाणे २ एकर क्षेत्रात पसरून घेतले. देवठाणा येथील शेतकऱ्यांकडून लागवडीसाठी तुती बेणे खरेदी केले. दोन एकर क्षेत्रावर ५ फूट बाय ३ फूट बाय २ फूट अंतरावर जो़डओळ पद्धतीने तुतीच्या व्ही-१ जातीची कांडी पद्धतीने लागवड केली. जून महिन्यात लागवड केल्यामुळे लगेच पाणी देण्याची गरज पडली नाही. पावसाळा संपल्यानंतर प्रवाही पद्धतीने पाणी देण्यास सुरुवात केली. लागवडीनंतर पाच महिन्यांनी तुती बागेत नोव्हेंबरमध्ये पहिली छाटणी केली. तुती लागवड केल्यानंतर गावातील सुदाम दुधाटे यांच्या शेतावर दररोज जाऊन रेशीम कोष उत्पादनाची संपूर्ण बॅच पूर्ण होईपर्यंत कीटक संगोपनाची प्रात्यक्षिकासह रेशीम शेती उद्योगातील बारकावे जाणून घेतले.
संगोपनगृहातील व्यवस्थापन ः
सिमेंट, विटा, टिन पत्रे, लोखंडी पट्ट्या आदी साहित्याचा वापर करून २३ फूट (उत्तर दक्षिण) बाय ६० फूट (पूर्व-पश्चिम) आकाराच्या जागेत संगोपनगृहाची उभारणी केली. त्यात दोन्ही बाजूने ६ फूट बाय ५० फूट आकाराचे प्रत्येकी ५ कप्पे असलेले रॅक उभारले. दोन रॅकमध्ये ४ फूट, तर दोन्ही रॅकच्या बाजूने ३ फूट मोकळी जागा सोडली आहे. त्यामुळे रेशीम कीटकांना चारही बाजूने तुती पाने टाकणे सोयीचे झाले आहे. संगोपनगृह उभारणीसाठी १ लाख ६५ हजार रुपये खर्च आला. मनरेगातून ९३ हजार रुपये अनुदान मिळाले. या संगोपनगृहाची एकूण क्षमता २५० अंडीपुंजाची इतकी आहे. मागील १५ दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली. त्यामुळे संगोपनगृहाच्या छतावर रेन पाइपद्वारे पाणी सोडले जात आहे. तसेच संगोपनगृहाच्या चारही बाजूंनी शेडनेट लावले आहे. त्यावर ठिबकच्या नळ्या सोडून त्याद्वारे पाणी सोडले आहे. त्यामुळे संगोपनगृहातील तापमान कमी करण्यास मदत होत असल्याचे श्री. दुधाटे सांगतात.
रेशीम कोष उत्पादनातील बारकावे ः
रेशीम कोष उत्पादनासाठी पहिली बॅच १५० अंडीपुजांची घेतली. त्यापासून ८० किलो कोष उत्पादन मिळाले. उत्पादित कोषाची तेलंगणा येथील जनगाव मार्केटमध्ये कोष विक्री केली. त्यावेळी प्रतिकिलो ४०० रुपये दर मिळाला. पहिल्या वर्षी साधारणपणे १५० ते २५० अंडीपुजांच्या ६ बॅच घेतल्या. दुसऱ्या बॅचपासून रामनगरम येथे कोष विक्रीसाठी नेण्यास सुरुवात केली. सध्या रामनगरम आणि बीड येथील मार्केटमध्ये कोष विक्रीसाठी घेऊन जातात. दरवर्षी प्रत्येकी २०० अंडीपुंजाच्या ६ बॅच घेतल्या जातात. सर्व बॅच मिळून ७ ते ८ क्विंटल रेशीम कोष उत्पादन मिळते. रेशीम शेतीमध्ये मोतीराम यांना पत्नी सौ. लोचना, बंधू शिवराम, भावजय सौ. ऊर्मिला यांची मदत मिळते.
मागील कामकाज ः
- डिसेंबर २०२४ मधील १५० अंडीपुजांच्या बॅचपासून ए ग्रेडचे ९० किलो कोष उत्पादन मिळाले. उत्पादित कोषाची बीड येथील रेशीम कोष मार्केटमध्ये २७ जानेवारीला प्रति किलो ५८० रुपये दराने विक्री
झाली. ही बॅच संपल्यानंतर बॅच संपल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण केले.
- साधारणपणे ३० जानेवारीला तुती बागेची छाटणी केली. बागेत नत्र, स्फुरद, पालाश या खतांची मात्रा दिली. त्यानंतर सिंचनाच्या पाच पाळ्या दिल्या. बैलचलित कोळपे तसेच खुरपणी करून आंतरमशागत केली.
- नवीन बॅच नियोजनानुसार भेंडेंगाव (ता. वसमत) येथून २०० अंडीपुंज (चॉकी) मागणी केली. चॉकी शेडवर आणण्यापूर्वी संगोपनगृहात स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची कामे केली. या महिन्यात सोमवार (ता.१०) पासून नवीन बॅच सुरू झाली आहे.
- चॉकी शेडवर आणल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस रेशीम कीटकांची विशेष काळजी घेण्यात आली.
आगामी नियोजन ः
- मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे रेशीम कीटकांच्या कोष निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे संगोपनगृहातील तापमान कमी राखण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. संगोपनगृहाभोवती हिरवे शेडनेट लावले आहे. तसेच संगोपनगृहाच्या छतावर रेन पाइपद्वारे पाणी सोडले आहे.
- रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध करण्यावर अधिक भर दिला जाईल.
- सध्याच्या बॅचमधील कोष काढणी साधारणपणे ५ एप्रिलच्या दरम्यान काढणीस येतील. या बॅचपासून २०० किलो कोष उत्पादन अपेक्षित आहे. कोष विक्रीसाठी रामनगरम येथील मार्केटमध्ये नेण्याचे नियोजन आहे.
- बॅच संपल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण केले जाईल.
- तुती पानाच्या उपलब्धतेनुसार पुढील बॅच घेण्याचे नियोजन केले जाईल, असे मोतीराम दुधाटे सांगतात.
- मोतीराम दुधाटे, ९६५७३१६६८५
(शब्दांकन ः माणिक रासवे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.