
डॉ. विजयकुमार देसाई, डॉ. गोपाळ गोळवणकर, डॉ. यशवंत गोवेकर
Cashew Yield Improvement: काजू या फळ पिकामध्ये ढेकण्या (टी मॉस्किटो बग) नंतर दुसरी महत्त्वाची रसशोषक कीड म्हणजे फुलकीड (थ्रीप्स) आहे. भारतासह अन्य काजू उत्पादक देशांमध्येही हंगामात मोठ्या प्रमाणावर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. भारतात महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तमिळनाडू, गोवा, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि मध्य प्रदेशामध्ये बहुतांश काजू उत्पादक प्रदेशांमध्ये आढळते. आपल्या कोकण विभागात दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. कोवळ्या पालवी अवस्थेपासून सुरू झालेला प्रादुर्भाव आणि नुकसान पुढे मोहर आणि फळधारणेदरम्यानही चालू राहते.
ओळख : आकाराने अतिशय लहान व रंगाने फिकट पिवळसर असलेली ही फुलकीड डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही.
यजमान वनस्पती ः बहुभक्षक असलेली कीड भाजीपाला पिके, फळपिके, फुलपिके व कडधान्य, गळीतधान्ये, ऊस, कापूस अशा अनेक पिकांमध्ये दिसून येते.
जीवनक्रम : या किडीची मादी साधारणपणे ५० ते १०० अंडी घालते. अंडी अतिशय लहान असून कोवळ्या पालवीच्या पेशींमध्ये पानाच्या खालच्या बाजूला असतात. ५ ते ८ दिवसांनंतर या अंड्यांमधून पिले बाहेर पडतात. या किडीचा संपूर्ण जीवनक्रम १५ दिवसांमध्ये पूर्ण होतो. उन्हाळी हंगामात या किडीचा जीवनक्रम १० ते १२ दिवसांमध्येच पूर्ण होतो.
नुकसानीचे स्वरूप : या किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांत कोवळी पालवी फुटल्यावर प्रथम कोवळ्या पालवीच्या व पानांच्या देठांवरही आढळून येतो. मात्र लहान फळे धरावयास लागल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. पूर्ण वाढ झालेली प्रौढ फुलकीड व पिले कोवळी पालवी, मोहराचा देठ तसेच कोवळ्या बिया व बोंडूवरील साल खरवडतात. त्यामधून बाहेर येणारा रस शोषतात. अशा ठिकाणी भुरकट, चंदेरी रंगाचे चट्टे पडतात. पानांच्या कडा, शेंडे करपतात. पाने वेडीवाकडी होतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानगळ होऊन फक्त शेंडेच शिल्लक राहतात. जास्त प्रादुर्भाव झालेली फुले फलनासाठी उघडू शकत नाहीत. परिणामी, उत्पादनात लक्षणीय घट होते. बियांवर चट्टे पडल्यामुळे बिया खरबडीत, अस्वच्छ दिसतात. त्यांचा आकार वेडावाकडा होतो. बियांची गळ होते. प्रादुर्भावित बोंडू जसेजसे वाढत जातील, तसे ते हळूहळू तडकतात. आकाराने वेडेवाकडे होऊन लहान राहतात.
प्रादुर्भावाचा हंगाम
या किडीच्या वाढीवर पाऊस आणि आर्द्रता यासारखे हवामान घटक परिणाम करतात. त्यांचा प्रादुर्भाव हा सप्टेंबर - ऑक्टोबरपासून म्हणजेच कोवळी पालवी आल्यानंतर दिसून येतो. झाडे पूर्ण बहरलेली असताना जानेवारीमध्ये किडीचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतो. हा प्रादुर्भाव एप्रिल ते मे पर्यंत टिकून राहतो.
एकात्मिक व्यवस्थापन
कोवळी पालवी आल्यापासून ते फळधारणा होईपर्यंत फुलकिडीसाठी नियमित सर्वेक्षण आणि त्याच्या संख्येचे निरीक्षण करावे.
या किडीसाठी आर्थिक नुकसानीची पातळी (ETL) ही १.२५ टक्का प्रादुर्भावित फळे किंवा १० फुलकीड प्रति पालवी/ मोहर/ फळ अशी आहे.
काजू बागेत पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक असून घनदाट लागवड टाळावी. हंगाम संपल्यानतर कीड-रोगग्रस्त फांद्यांची विरळणी करावी.
बागांमध्ये मित्रकीटकांचे संवर्धन करावे.
एकरी ३० ते ४० निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
सेंद्रिय काजू उत्पादकांनी थंडीच्या महिन्यात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) लेकॅनिसिलिअम लेकॅनी या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
पीक सशक्त व निरोगी राखण्यासाठी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
करपा रोग नियंत्रण
कोकण विभागातील काजू पिकाचे करपा, शेंडेमर / पिंकरोग, डिंक्या/फांदीमर, शेंडे कुजणे व पानगळ, पानांवरील ठिपके, फळ व बी कुज यासारख्या रोगांमुळे नुकसान
होताना दिसते. त्यातही सर्वांत महत्त्वाचा रोग म्हणजे करपा. याचा प्रादुर्भाव कोवळ्या पालवी अवस्थेपासून सुरू होतो आणि तो मोहर आणि फळधारणेदरम्यान आढळून येतो. म्हणजेच काजू पीक वाढीच्या कोवळी पालवी, मोहर व फळधारणा अवस्था अशा तीनही अवस्थांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रामुख्याने ज्या काजू बागा डोंगराच्या आडोशाला, दरी-खोऱ्या अथवा ज्या भागात सूर्यप्रकाश उशिरा पोहोचतो अशा ठिकाणी आहेत, तिथे दरवर्षी करपा रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसतो.
रोगकारक बुरशी : करपा हा रोग कोलेटोट्रीकम ग्लोईओस्पोरीऑइड्स (Colletotrichum gloesporiodies) या बुरशीमुळे होतो.
यजमान पिके : मुख्यत: भाजीपाला पिके, फळपिके, शोभिवंत झाडे व कडधान्य व गळितधान्ये इ.
प्रादुर्भावाची लक्षणे : रोगाचा प्रादुर्भाव कोवळी पाने, फांद्या, मोहोर, बिया इ. आढळतो. रोगग्रस्त पानांवर भागावर फिकट, तांबूस रंगाचे पाणीदार ठिपके दिसतात.
कालांतराने ठिपके वाढत जाऊन रोगग्रस्त भाग वाळून जातो. रोगग्रस्त पाने आकसतात आणि कालांतराने गळून पडतात.कोवळ्या फांदीवर लांबट दाट तांबूस तपकिरी ते काळसर, पाणीदार ठिपके दिसून येतात. ते शेवटी वाळून जातात. लहान फिकट, तांबूस रंगाचे, पाणीदार ठिपके मोहोराच्या मुख्य दांड्यासहित उपदांड्यांवर आढळतात. उमललेली फुले अखेरीस सुकून जातात आणि गळून पडतात. अशा प्रकारे संपूर्णपणे मोहर वाळतो. मोहोराच्या मुख्य दांड्याला अगदी जवळ जवळ उपदांडे अशी रचना असल्यामुळे हा प्रकार काजूच्या संकरित जातींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. कोवळ्या बिया किंवा फळे काळसर पडून वाळून जातात. शेवटी गळून पडतात. बिया किंवा फळे पक्वतेकडे जात असताना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास बियांवर तांबूस काळसर अनियमित गोलाकार डाग दिसून येतात. हळूहळू तो भाग वाळून जातो.
रोगाचा प्रसार : बुरशी प्रामुख्याने खराब झालेल्या आणि संवेदनाक्षम उतीजवळ वसाहत करते. बहुतेकदा मृत उतींवर (सॅप्रोफाइट) वाढते. कमी अंतरावरील वाऱ्याचा प्रवाह, पावसाचा शिडकाव आणि प्रचंड दव याद्वारे बीजाणूंचा प्रसार होतो. कोवळ्या पानांवर, मोहोरावर आणि फळांवर बीजाणू जमा होऊन रोगाच्या वाढीस हातभार लावतात. ढेकण्या किंवा फुलकिडीने प्रादुर्भावित कोवळी पालवी, मोहर व फळ याद्वारे रोगाचा प्रसार होतो.
पोषक वातावरण : उच्च तापमान, अधिक दव किंवा अवकाळी पाऊस आणि उच्च आर्द्रता या बाबी रोगवाढीसाठी अनुकूल आहेत. बीजाणूंच्या उगवणीसाठी व प्रसारासाठी उच्च सापेक्ष आर्द्रता आवश्यक असते. कोरड्या हवामानात ही बुरशी सक्रिय नसते.
या रोगासाठी दमट व पावसाळी वातावरण पोषक असते. तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस, ८० ते ९० टक्के आर्द्रता, ओलसर कोवळी पाने, मोहोर व कोवळी फळे असे वातावरण रोगाच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असते. ढगाळ हवामान, ओलसरपणा आणि कोंदट हवा ही या रोगाच्या वाढीसाठी महत्त्वाची कारणे आहेत.
एकात्मिक व्यवस्थापन :
दाट लागवडीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो, त्यामुळे घन लागवड करू नये. झाडांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहणे आवश्यक आहे.
पावसाळ्यापूर्वी म्हणजे पीक हंगाम संपल्यानंतर आणि पावसाळ्यानंतर म्हणजे पीक हंगाम सुरू होण्यापूर्वी मेलेल्या, रोगट फांद्याची छाटणी करावी. त्यानंतर संपूर्ण झाडावर बोर्डोमिश्रण १ टक्का (१:१:१००) द्रावणाची दोन वेळा फवारणी करावी.
पावसाळ्यात उघडीप पाहून बोर्डोमिश्रण १ टक्का किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे गरजेनुसार बुरशीनाशक बदलून २ ते ३ फवारण्या कराव्यात.
रोगग्रस्त पाने, फांद्या, शेंडे कापून रोगग्रस्त भाग स्वच्छ करावेत. हे रोगग्रस्त अवशेष जाळून नष्ट करावेत. कापलेल्या भागावर १ टक्के बोर्डोपेस्ट लावावी.
काजू पिकामध्ये येणाऱ्या ढेकण्या व फुलकिडीसोबत या बुरशीचा प्रसार होतो. त्यामुळे किडीच्या नियंत्रणासाठी नवीन पालवीवर लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के प्रवाही) ६ मि.लि., मोहोर फुटताना प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १० मि.लि. व फळधारणा अवस्थेत अॅसिटामिप्रिड (२० टक्के एससी) ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. या कीटकनाशकांसोबत कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाण मिसळावे.
टीप :
वरील सर्व कीटकनाशके व बुरशीनाशके ही जॉएंट अॅग्रेस्को शिफारसप्राप्त आहेत.
परागीभवन करणाऱ्या मधमाश्यांचा वावर बागेत असलेल्या कालावधीमध्ये (सकाळी १० ते दुपारी १) फवारणी करू नये. शक्यतो सकाळी १० पूर्वी आणि सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान फवारणी करावी.
कीडनाशकांचे प्रमाण हाय व्हॉल्यूम पंपासाठीचे आहे.
टाकाऊ कचऱ्यांचे जीवघेणे प्रदूषण
दक्षिण इटलीच्या नेपल्सजवळील मार्सिसिझ भागामध्ये मोठ्या प्रमाणात टाकाऊ कचऱा टाकला जात आहेत. काही प्रमाणात जमिनीत गाडून तर काही प्रमाणात जमिनीवर उघड्या स्वरूपामध्ये टाकलेलया घरगुती आणि औद्योगिक कचऱ्यामुळे प्रदूषण वाढले आहे. नेपल्स आणि कॅसर्टा दरम्यान या कचऱ्याला लागणाऱ्या व लावल्या जाणाऱ्या आगीमुळे हवेचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या भागाला लॅण्ड ऑफ फायर म्हणूनच ओळखले जाते. त्यातील विषारी घटकामुळे जमीन व भूजलही प्रचंड खराब झाले आहे. युरोपियन मानवाधिकार न्यायालयाच्या वतीने ३० जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या एका निकालामध्ये या भागात विषारी प्रदूषणामुळे होत असलेल्या मृत्यूसाठी इटालिटन सरकारला दोषी धरले आहे. छायाचित्रात ॲकेरा वेस्ट (लॅण्ड ऑफ फायर) येथील शेतीखालील जमीन, ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प.आणि (इनसेटमध्ये ) सर्वत्र पसरलेला कचरा दिसत आहे.
रासायनिक नियंत्रण
क्र. फवारणी कीटकनाशकाचे नाव व वापरण्याची मात्रा झाडाची अवस्था अन्य बाबी
१. पहिली लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मि.लि. प्रति १० लिटर पाणी (तांबूस रंगाची पालवी पूर्ण उघडण्यापूर्वी) कोवळ्या पालवीवर फवारणीदरम्यान हवामान ढगाळ व पावसाळी असल्यास कार्बेन्डाझिम ०.१ टक्का (१० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी) करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकात मिसळून फवारणी करावी
२. दुसरी प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी मोहरावर (कळी अवस्था)
३. तिसरी ॲसिटामिप्रिड (२० टक्के पाण्यात विरघळणारी पावडर) ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी फळधारणा (तांबूस रंगाची फळे असताना – फळ अवस्था)
डॉ. विजयकुमार देसाई (प्राध्यापक - कीटकशास्त्र), ९४०३६४१११६
डॉ. गोपाळ गोळवणकर (संशोधन सहयोगी-कीटकशास्त्र), ९४०५९००२७६
डॉ. यशवंत गोवेकर (प्राध्यापक - वनस्पती रोगशास्त्र), ८३५५८२२८३६ (प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.