
डॉ. विजयकुमार देसाई, डॉ. गोपाळ गोळवणकर
Sustainable Farming Solution : काजूवरील ढेकण्या (टी मॉस्किटो बग) ही अत्यंत महत्त्वाची रसशोषक कीड आहे. काजू उत्पादक भागामध्ये हंगामात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या किडीमुळे कोवळ्या पालवी अवस्थेपासून नुकसान होण्यास सुरुवात होऊन ते मोहर आणि फळधारणेदरम्यान दिसून येते. या किडीच्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार काजू बी उत्पादनात सुमारे २० ते ८० टक्क्यांपर्यंत घट येते. या किडीचा प्रादुर्भाव साधारणत: कोवळ्या पालवीवर २५ टक्के, मोहरावर ३० टक्के व कोवळ्या फळांवर १५ टक्के इतका दिसून येतो.
ढेकण्या किडीच्या प्रजाती
काजूवरील ढेकण्या किडीच्या देशामध्ये प्रामुख्याने हेलोपेल्टिस ॲन्टोनी, हेलोपेल्टिस ब्रॅडी आणि हेलोपेल्टिस थिव्होरा या तीन प्रजातींची नोंद आहे. त्यापैकी ‘हेलोपेल्टिस ॲन्टोनी’ ही काजूवर सर्वाधिक प्रादुर्भाव करणारी प्रजाती असल्याचे दिसून आले आहे.
हेलोपेल्टिस ॲन्टोनी
पूर्ण वाढ झालेला ढेकूण हा डासाच्या आकाराचा असतो.
डोक्यावरील भाग बदामी, तांबडा किंवा काळा असतो. पोटाच्या पुढील भाग काळा आणि पांढरा असतो. उर्वरित शरीर काळ्या रंगाचे असते.
पाठीवर बारीक टाचणीसारखा भाग वर आलेला दिसतो.
किडीची पिले देखील लालसर तपकिरी रंगाची आणि लांब असतात.
नर ढेकणाचे आयुष्य ९ ते १० दिवस, तर मादी ढेकणाचे आयुष्य ७ ते ८ दिवस इतके असते. मादी ढेकूण नरापेक्षा मोठे असतात.
हेलोपेल्टिस ब्रॅडी
या प्रजातीचा मादी ढेकूण हा नरापेक्षा मोठी असते. मादी साधारणपणे ६.० ते ८.८ मिमी लांबीचे असतात.
या प्रजातीचा सामान्य रंग हेलोपेल्टिस ॲन्टोनी सारखाच असतो. परंतु मागील पायांच्या तळाशी एक स्पष्ट पांढरा पट्टा दिसून येतो.
हेलोपेल्टिस थिव्होरा
या प्रजातीचा प्रौढ ढेकूण हा ५.५ ते ८.० मिमी लांबीचा असतो.
पाठीकडील भाग तपकिरी-पिवळा आणि पोटकडील भाग हिरवट असतो. डोके पिवळसर-तपकिरी, हिरवट-काळ्या रंगाचे, पोट आणि छातीकडील भाग गडद लाल व पिवळसर असतो. शरीर सडपातळ आणि लांब असते.
यजमान वनस्पती
काजू, चहा, कोको, कडुनिंब, शेवगा, जंगली भेंडी वृक्ष, रानवांगी, चांदवा/चांदवड, रानमोडी व उक्शी.
जीवनक्रम
या किडीची मादी कोवळ्या पालवीच्या देठामध्ये, पानांच्या दांड्यामध्ये व मोहराच्या कोवळ्या दांड्यामध्ये, सालीच्या आतील पेशीमध्ये अंडी घालते. अंडी १.५ ते २.० मि.मी. लांब असतात. एक मादी साधारणत: ५० अंडी घालते. अंडी घातलेल्या ठिकाणच्या सालीमधून दोन बारीक केसासारखे पांढरे धागे बाहेर आलेले दिसतात. अशा अंड्यांमधून ६ ते ७ दिवसांमध्ये तांबूस लहान पिले बाहेर पडतात. पिलांचे पूर्ण वाढ झालेल्या ढेकण्यात रूपांतर होण्यास १२ ते १५ दिवस लागतात. या किडीचा संपूर्ण जीवनक्रम पूर्ण होण्यास २५ दिवसांचा कालावधी लागतो.
प्रादुर्भावाचा हंगाम
किडीच्या वाढीसाठी पाऊस आणि आर्द्रता हे हवामान घटक ढेकण्याच्या वाढीवर परिणाम करतात. सप्टेंबर-ऑक्टोबरपासून म्हणजेच कोवळी पालवी आल्यानंतर प्रादुर्भावामध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होते.
झाडे पूर्ण बहरलेली असताना जानेवारीमध्ये प्रादुर्भाव सर्वाधिक असतो.
हा प्रादुर्भाव एप्रिल ते मे पर्यंत टिकून राहतो. पावसाळ्यात (जून-सप्टेंबर) विशेषत: जुन्या काजू बागांमध्ये किरकोळ प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.
नवीन लागवड केलेल्या लहान काजू झाडांवर याचे प्रमाण सातत्याने दिसून येते.
एकात्मिक व्यवस्थापन
प्रभावी व्यवस्थापनासाठी किडीचे नियमित सर्व्हेक्षण आणि त्याच्या संख्येचे निरीक्षण करणे (कोवळी पालवी आल्यापासून ते फळधारणा होईपर्यंत) अत्यंत आवश्यक आहे.
संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि नियमित कीड सर्वेक्षणावर भर द्यावा.
अतिसंवेदनशील निवासस्थानांवर, विशेषत: नवीन काजू लागवड किंवा पर्यायी यजमान वनस्पतींच्या जवळ असलेल्या बागांवर योग्य निरीक्षण ठेवणे आवश्यक आहे.
पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशातील काजू बागांमध्ये आढळणाऱ्या रानमोडी (क्रोमोलेना ओडोराटा) या अतिशय सामान्य तणावर ढेकण्या वाढतो. त्यामुळे किडीचा प्रसार टाळण्यासाठी वेळेवर तण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
बागेमध्ये मित्रकीटकांचे संवर्धन करावे.
सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करत असलेल्या बागेत थंडीच्या महिन्यात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) लेकॅनीसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)
रासायनिक नियंत्रण
आर्थिक नुकसान पातळी (ETL) ः ५ टक्के प्रादुर्भित झालेली पालवी/ मोहर/ फळ.
रासायनिक फवारणी ः (फवारणी ः प्रति १० लिटर पाणी)
पहिली फवारणी, कोवळ्या पालवीवर (तांबूस रंगाची पालवी पूर्ण उघडण्यापूर्वी)
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मिलि
दुसरी फवारणी, मोहोरावर (कळी अवस्था)
प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १० मिलि
तिसरी फवारणी, फळधारणा (तांबूस रंगाची फळे असताना)
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मिलि
फवारणीदरम्यान ढगाळ हवामान व पावसाळी असल्यास,
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे कीटकनाशकात मिसळून फवारणी करावी.
नुकसानीचे स्वरूप
प्रादुर्भाव ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात कोवळी पालवी फुटल्यावर सुरू होऊन जानेवारी- फेब्रुवारी महिन्यांपर्यंत वाढतो.
किडीची पिले व प्रौढ ढेकूण कोवळी पालवी, देठ, पाने, कोवळ्या मोहरामधून तसेच कोवळ्या काजू बोंडू व बियांमधून रस शोषून घेतात. रसशोषण करताना सोंडेद्वारे लाळेतून विषारी पदार्थ आत सोडतात. त्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी तांबूस तपकिरी ठिपके पडतात. हे ठिपके कालांतराने वाढत जाऊन प्रादुर्भावग्रस्त भाग काळा पडतो.
जास्त प्रादुर्भावामध्ये पालवी, मोहर पूर्ण वाळून जातो.
किडीचे पूर्ण वाढ झालेले एक पिलू एका दिवसात ११४ ठिकाणी, तर प्रौढ ढेकूण ९७ ठिकाणी काळे ठिपके पाडतो.
किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फळावर देखील होतो. फळावर काळ्या रंगाचे गोलाकार खड्डे पडतात, कोवळी फळे गळून पडतात.
(टीप ः ॲग्रेस्को शिफारशी आहेत.)
डॉ. विजयकुमार देसाई ९४०३६४१११६ - डॉ. गोपाळ गोळवणकर ९४०५९००२७६ (कीटकशास्त्र विभाग,
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.