
डॉ. गोपाला, डॉ. बीना नायर, डॉ. विद्यासागर बिरादार
Pest and Disease Outbreaks : जवस हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकामध्ये येणाऱ्या कीड-रोगांमुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. वेळीच कीड-रोगाचा प्रादुर्भाव ओळखून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मर रोग
लक्षणे : जवसातील मर रोग हा फ्युजारिअम ऑक्झिस्पोरम लिनी या बुरशीमुळे होतो. ही बुरशी मुळांद्वारे झाडांवर आक्रमण करते. झाडामध्ये पाणी वाहून नेणाऱ्या ऊतींमध्ये स्वतःची वाढ सुरू ठेवते. बुरशी पाण्याच्या शोषणात व्यत्यय आणते. परिणामी, झाडे शेंड्यापासून सुकून वाळतात. प्रादुर्भाव होताच पाने पिवळी पडून कोमेजतात, शेंडा मलुल होतो व झाड हिरवे असतानाच वाळते. साधारण पिकाच्या रोपावस्थेत व पीक ६ आठवड्यांनंतरच्या अवस्थेमध्ये अशा स्थितीमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
रोपावस्थेतील मर : रोपावस्थतील मर पीक पेरणीनंतर ३ आठवड्यांत दिसून येते. ३ ते ५ आठवड्यांतील अवस्थेतील पीक कोलमडते व जमिनीवर आडवे पडते. या अवस्थेत रोप हिरवेच असते. असे रोप उपटले असता जमिनीवरील व जमिनीखालील खोडाचा भाग बारीक झालेला आढळतो. परंतु खोड कुजलेले दिसत नाही. रोप उभे चिरून पाहिले असता त्यातील उती काळपट तांबूस झालेल्या दिसतात. अशी रोपे काही दिवसांत वाळतात.
प्रौढावस्थेतील मर : पीक साधारण ६ आठवड्यांचे झाल्यानंतर हा मर रोग दिसून येतो. झाड शेंड्याकडून मलूल होऊन सुकते. झाडाची खालची पाने पिवळी पडतात. काही पाने मात्र हिरवीच राहतात. २ ते ३ दिवसांनी हळूहळू सर्व पाने पिवळी पडतात. ही पिवळी झालेली पाने पिक परिपक्व अवस्थेपर्यंतही झाडावर सुकलेल्या अवस्थेत दिसतात. रोगग्रस्त झाड वाळलेल्या अवस्थेत दिसते. परंतु वरील भागावर कुजलेले लक्षणे दिसत नाहीत. झाड उभे चिरले असता उतीमध्ये काळपट भाग दिसतो. कधी कधी संपूर्ण झाड न वाळता काही फांद्याच वाळलेल्या दिसतात. झाड वाळल्यानंतरही बुरशी उर्वरित अवशेषांमध्ये वास्तव्य करते.
नियंत्रण : मर रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे पेरणीपूर्वी प्रक्रिया करणे गरेजेचे असते. जमिनीतून ट्रायकोडर्मा देताना पेरणीच्या वेळी आणि पेरणीनंतर ४० दिवसांनंतर ट्रायकोडर्मा २.५ किलो प्रमाणात सुमारे २५० किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टर वापरता येईल. (जवस पिकांसदर्भात राष्ट्रीय वार्षिक बैठकीतील शिफारस.)
भुरी रोग
लक्षणे : या रोगाची लक्षणे प्रामुख्याने पानावरील बुरशीच्या पांढऱ्या भुकटीच्या स्वरूपात दिसून येतात. त्याची सुरुवात लहान डागांपासून होते. पुढे प्रादुर्भाव वाढत तो संपूर्ण पानांच्या पृष्ठभागावर वेगाने पसरतो. जास्त प्रादुर्भाव झालेली पाने सुकतात, कोमेजतात आणि वाळली जातात. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडे खराब होऊ शकतात. बियाण्याचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी होऊ शकते.
नियंत्रण : या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जवसाच्या अधिक उत्पादनासाठी व भूरी रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सॅलिसिलीक आम्लाची ५० मिलिग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे करावी. पेरणीनंतर ३० व ४५ दिवसांनी सॅलिसिलिक आम्ल (५० पीपीएम म्हणजेच) ५० मिलिग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी. किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, हेक्झाकोनॅझोल (५ टक्के ईसी) १ मिलि प्रति लिटर पाणी या फवारणी करावी. १० दिवसांच्य अंतराने दोन फवारण्या करण्याची शिफारस करण्यात येत आहे. (जॉईंट ॲग्रेस्को शिफारस.)
रोग दिसताक्षणीच पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी २५ ग्रॅम प्रति १० लिटर. पाण्यात मिसळून फवारणी करावी व दुसरी फवारणी आवश्यकता भासल्यास १० दिवसांनी करावी. ॲझोक्सिस्ट्रोबिन (१८.२%) अधिक सायप्रोकोनॅझोल (७.३ टक्के एससी) (संयुक्त बुरशीनाशक) १ मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. (जवस पिकांसदर्भात राष्ट्रीय वार्षिक बैठकीतील शिफारस.)
बुरशीजन्य करपा (अल्टरनेरिया ब्लाइट)
लक्षणे : प्रथम कळी अवस्थेत कळीच्या देठावर पिवळी रिंगा दिसू लागतात. कालांतराने ते वाढून शेवटी गडद काळपट किंवा काळ्या रंगामध्ये रूपांतरित होते. खालील पानांवर काळ्या बिंदूच्या रूपात दिसतात. ज्याचा आकार हळूहळू वाढून गोलाकार ते अंडाकृती किंवा अनियमित आकाराचा होतो. गंभीर प्रादुर्भावामध्ये हे डाग एकत्र होत पानांचा मोठा भाग व्यापतात.
नियंत्रण : (१) बीजप्रक्रिया - थायरम ३ ग्रॅम प्रति किलो. (ॲड हॉक लेबल क्लेम) (२) मॅन्कोझेब २५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (ॲड हॉक लेबल क्लेम)
गादमाशी किंवा मिरी (Linseed bud fly)
गादमाशीची मादी डासासारखी दिसते. मात्र तिचा रंग नांरिगी असतो. अळी सुरुवातीला पांढऱ्या रंगाची असून, तिच्या पोटावर पिवळा पट्टा असतो. पूर्ण वाढ झालेली अळी बिनपायाची, गर्द गुलाबी रंगाची असून, २ मि.मी. लांब असते.अळ्या फुलकळ्यातील पुंकेसर व स्त्रीकेसर खाऊन टाकतात, त्यामुळे फलधारणा होत नाही. मादी कळीच्या त्रिदलपुंजाच्या पोकळीमध्ये अंडी घालते. त्यातून बाहेर आलेली अळी बिजांड खाते.
त्यामुळे कीडग्रस्त कळीचे बोंडात रूपांतर होत नाही. कीडग्रस्त कळ्या पोकळ होतात. एक मादी तिच्या आयुष्यामध्ये ८ ते १७ कळ्याचे नुकसान करते. परिणामी जवसाच्या उत्पादनात लक्षणीय घट येते. उत्पादनातील घट ही प्रादुर्भावाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. महाराष्ट्रात या किडीमुळे उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट झाल्याची नोंद आहे. माश्या १ ते ३ दिवस जगतात. या किडीच्या वाढीस १६ ते २० अंश सेल्सिअस तापमान व ६० ते ७० टक्के आर्द्रता अनुकूल असते.
गादमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन
जवसाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात केल्यास गादमाशीचा प्रादुर्भाव कमी राहतो.
गादमाशी प्रतिरोधक जाती (पार्वती, शेखर, पद्मिनी, एन.एल - २६०) पेराव्यात.
जवसासोबत हरभऱ्याचे (४:२) या प्रमाणे आंतरपिक घेतल्यास गादमाशीचा प्रादुर्भाव कमी राहून अधिक उत्पादन मिळते.
गादमाशी व्यवस्थापनासाठी कळी अवस्थेपासून सुरुवात करून १५ दिवसांच्या अंतराने किंवा ९ टक्के गादमाशी प्रादुर्भावग्रस्त कळ्या अशी आर्थिक नुकसानीची पातळी आढळून येताच निंबोळीयुक्त कीटकनाशक (ॲझाडीरॅक्टीन ३०० पीपीएम) ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात दोनदा फवारणी करावी. (जॉइंट ॲग्रेस्को शिफारस.)
डॉ. गोपाला (वनस्पती रोगशास्त्रज्ञ), ८८००५८०५४५, डॉ. बीना नायर (वनस्पती पैदासकार), ९४२२८११३८४, डॉ. विद्यासागर बिरादार (कीटकशास्त्रज्ञ), ९४२२८२६१५३
(अखिल भारतीय समन्वयीत जवस संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.