Summer Heat : हापूसवर वाढत्या उन्हाचा परिणाम

Hapus Mango : कोकणातही उन्हाचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम आंबा पिकासह कलिंगडावर झाला आहे.
Mango
MangoAgrowon

Ratnagiri News : कोकणातही उन्हाचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम आंबा पिकासह कलिंगडावर झाला आहे. उन्हामुळे हापूस आंबा भाजला असून साका तयार होत आहे. तर कलिंगडाच्या आकारावर परिणाम झाला आहे. परिणामी शेवटच्या टप्प्यातील उत्पादन घटणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचे ७० हजार हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. यंदा ४० टक्क्यांहून अधिक आंबा उत्पादन फेब्रुवारी, मार्चमध्येच हाती आले होते. उर्वरित पीक टप्प्याटप्प्याने येत आहे. मेच्या पहिल्या आठवड्यात उत्पादन कमी झाले असून १५ मे नंतर शेवटच्या टप्प्यातील आंबा काढणीला सुरुवात होईल. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कलमांना मोहर आला होता. त्याचे जतन केल्यामुळे त्यामधील उत्पादन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिळत राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Mango
Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यातीला लगाम

गेल्या काही दिवसांत उष्मा लाट मोठ्या प्रमाणात येत आहे. रत्नागिरीत कातळावर ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे या परिसरातील हापूस आंबा भाजून गळ झाली. तसेच काढणी केलेल्या फळामध्ये साका तयार झाला होता. हे प्रमाण मोठ्या फळामध्ये सर्वाधिक आढळत असल्याचे आंबा बागायतदारांचे मत आहे. उन्हाचा परिणाम होऊ नये यासाठी सूर्याची प्रखरता जाणवणाऱ्या दिशेची फळे लवकर काढली जात आहेत.

तसेच झाडांना वेळेत पाणीही दिले गेले आहे. कोकण कृषी विद्यापीठाकडून झाडांना पाणी देण्याच्या सूचनांचे पालन होतेच असे नाही. उत्पादन खर्च वाढण्याच्या भीतीने आणि बाजारात दर स्थिर असल्यामुळे अनेक बागायतदार लालसर झालेला आंबा आठ ते दिवस आधीच काढत आहेत.

असा आंबा पिकला तर त्याच्या चवीवर आणि आकारावर परिणाम करतो. ही परिस्थिती काही अंशी बागायतदारांना जाणवत आहे. शंभर आंब्यात दहा आंबे असे निघत असल्याचे बागायतदारांचे मत आहे. या सर्वांचा परिणाम आंबा दरावर होत असून बागायतदारही हतबल झाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात सुमारे चारशेहून अधिक हेक्टरवर कलिंगड लागवड केली जाते. बहुसंख्य शेतकरी कलिंगडाची शेती व्यावसाय म्हणून करतात. ऑक्टोबरमध्ये पहिल्या टप्प्यातील कलिंगड पिकामधून चांगले उत्पादन मिळाले. मात्र पुढे उन्हाचा परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. काहींच्या शेतामध्ये करपा रोगाने उभे पीक नष्ट झाले, तर काही शेतकऱ्यांना अर्धेच उत्पादन मिळाले. शेवटच्या टप्प्यात लागवड केलेल्या कलिंगडाच्या वेलांमधून अपेक्षित फळधारणा झालेली नाही.

Mango
Mango Market : अक्षय तृतीयेच्या बाजारात आंब्याची आवक सर्वसाधारण

तीन किलोचे कलिंगड एक ते दीड किलोचेच राहिले. त्यामुळे वीस रुपये प्रतिकिलो मिळणारा दर कमी झाला आहे. याबाबत संगमेश्‍वर तालुक्यातील धामणी येथील प्रकाश रांजणे म्हणाले, उन्हाचा परिणाम यंदा कलिंगड शेतीवर झाला आहे. मे महिन्यामध्ये उत्पादन हाती येईल, अशा दृष्टीने सोडतीन हजार रोपांची लागवड केली होती. त्यामधून अपेक्षित उत्पादन आलेले नाही. वेलांची वाढच झालेली नाही, तर फळाचा दर्जाच राहिलेला नाही.

दर्जा आणि दरावरही परिणाम

याबाबत रत्नागिरीतील आंबा बागायतदार उमेश रहाटे म्हणाले, की कातळ भागातील तापमान अधिक आहे. जास्तीत जास्त ३४ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान हापूस सहन करू शकतो. त्यापुढे तापमान गेले तर त्याचा परिणाम फळावर होतो आणि उत्पादन घटते. तसेच दर्जाही घसरतो आणि दर कमी होतात.

वेळेत पाण्याच्या नियोजनाची गरज

वातावरणातील बदलांविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. महेश कुलकर्णी म्हणाले, की झाडांना वेळेत पाणी दिले गेले असेल तर फळामध्ये साका होणार नाही. त्यामुळे बागायतदारांनी वेळेत पाण्याचे नियोजन करणे आवश्यक होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com