Mango Market : अक्षय तृतीयेला फुलली पुण्याची आंबा बाजारपेठ

Mango Fruit : मागील वर्षी हवामानाच्या संकटामुळे आंब्याची आवक तुलनेने कमी होती. यंदाचे चित्र मात्र तुलनेने समाधानकारक आहे. येत्या शुक्रवारी (ता. १०) अक्षय तृतीया असून त्यानिमित्ताने पुणे बाजार समितीमधील आंबा बाजारपेठ फुलली आहे. त्यानिमित्त घेतलेला आढावा.
Mango Market
Mango Market Agrowon

Success Story of Pune Mango Market : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया सणापासून आंब्याला मागणी वाढत जाते. येत्या शुक्रवारी (ता. १०) हा सण असून त्यानिमित्ताने पुणे बाजार समितीमधील आंबा बाजार फुलला आहे. कोकणासह परराज्यांतून मोठी आवक होत आहे. यावर्षीच्या हंगामाबाबत समितीमधील अडते असोसिएशनचे सचिव आणि कोकण हापूस आंब्याचे प्रमुख अडतदार करण जाधव यांनी माहिती दिली.

ते म्हणाले गेल्या वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये ऐन मोहरात आंब्याला अवकाळी पावसाचा, तर फळधारणेच्या अवस्थेत गारपिटीचा फटका बसला. त्यामुळे गेल्या वर्षी ऐन अक्षय तृतीयेस मोठ्या प्रमाणावर आंबाटंचाई निर्माण झाली होती. यापूर्वी अशी परिस्थिती आम्ही व शेतकऱ्यांनी कधी अनुभवली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी आंब्याचे दर प्रति डझनला एक हजार रुपयांपर्यंत होते.

अनेक ग्राहकांना पूजेसाठी देखील आंबा उपलब्ध नव्हता. या वर्षी मात्र हवामानाने दिलेल्या साथीमुळे यंदा जानेवारी अखेरीस आंब्याची आवक बाजारपेठेत सुरू झाली. टप्प्याटप्प्याने ती वाढत गेली. पहिल्या टप्यात दररोज दोन- तीन हजार पेट्या प्रमाणात होणारी आवक दहा हजार पेट्यांपर्यंत पोहोचली आहे.

अक्षय तृतीयेसाठी खरेदी सुरू

या वर्षी अक्षय तृतीया १० मे रोजी असली तरी शहर, उपनगरे, पुणे जिल्ह्यांतील तालुके आणि गावांतील फळ विक्रेत्यांकडून आंबा खरेदी सुरू झाली आहे. टप्प्याटप्याने १०० ते ५०० पेट्या याप्रमाणात ही खरेदी आहे. घरगुती ग्राहक साधारण अक्षय तृतीयेच्या दोन दिवस आधी खरेदी करतो. सुट्ट्यांचा हंगाम असल्याने मागणी व खरेदीही वाढली आहे. सध्या प्रति डझन ५०० ते ८०० रुपये दर आहे.

कोकण हापूसचा हंगामदेखील अंतिम टप्प्यात आला आहे. पंधरा मेपासून अखरेच्या हंगामातील आवक सुरू होऊन मे अखेर हंगाम संपेल असा अंदाज हापूस आंब्याचे अडतदार अरविंद मोरे यांनी व्यक्त केला. यावेळी १० ते २० टक्‍क्यांनी दरही वाढण्याचा अंदाज आहे.

Mango Market
Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

आवक आणि दर

पुणे बाजार समितीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड आणि रायगड जिल्ह्यांतून सध्या दररोज अंदाजे १० ते ११ हजार पेटी आवक झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ती १० टक्क्यांनी जास्त आहे. तसेच दरांमध्येही १० टक्के वाढ आहे. बाजारात कच्चा मालाच्या चार ते आठ डझनाच्या प्रति पेटीला १००० ते २५०० रुपये दर आहे. तयार मालाला दर्जा आणि आकारानुसार ४०० ते ८०० रुपये प्रति डझन दर आहे.

पणन मंडळाच्या महोत्सवास प्रतिसाद राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो. यंदा आत्तापर्यंत एक लाख डझन विक्रीतून सुमारे सात कोटी रुपयांची उलाढाल झाली. महोत्सव आणखी महिनाभर सुरू असणार असून एकूण उलाढाल १५ कोटींच्या आसपास पोचण्याची शक्यता असल्याचे पणन मंडळाचे साहायक सरव्यवस्थापक मंगेश कदम यांनी सांगितले.

कर्नाटक हापूसची आवक वाढली

लोकसभा निवडणूक तसेच अन्य कारणांमुळे कर्नाटकातून होणारी हापूसची आवक घटली होती.मागील दोन ते तीन दिवसांपासून ती वाढली आहे. सध्या दररोज प्रति ४ ते ५ डझनांच्या ७ ते ८ हजार पेटी, तर दोन डझनांच्या २० ते २५ हजार पेट्यांची आवक होत आहे. चार ते ५ डझनांच्या कच्चा मालाच्या पेटीला दर्जा आणि आकारानुसार ८०० ते १४०० रुपये दर मिळत असल्याचे या

आंब्याचे प्रमुख व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले. आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे.जूननंतर हंगाम गावरान आंब्याचा मॉन्सूनच्या आगमनाबरोबरच पुणे जिल्‍ह्यातील स्थानिक आंब्याचा हंगाम सुरू होईल असा अंदाज या आंब्याचे प्रमुख अडतदार तात्या कोंडे यांनी व्यक्त केला. यंदा या आंब्याचेही चांगले उत्पादन असून मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या भागांतून प्रामुख्याने आवक असते असे त्यांनी सांगितले.

Mango Market
Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

छोट्या बॉक्सला मागणी

शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबांचा लहान आकार पाहून कोकणातून लहान बॉक्समधील आंबा बाजारात पाठविण्याचा ट्रेंड आल्याचे करण जाधव यांनी सांगितले. चार- सहा डझनची पेटी तीन- चार हजार रुपयांना घेण्याऐवजी ६०० ते ८०० रुपयांचा एक ते दीड डझनाचा बॉक्स घेण्याकडे मध्यमवर्गीय कुटुंब प्राधान्य देत आहे. हा बॉक्स हाताळणीलाही सोपा असल्याने मागणी वाढत आहे.

आंबा बागायतदारांच्या प्रतिक्रिया

माझी आंब्याची ५०० झाडे असून दरवर्षी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात सहभागी होतो. या वर्षी हवामानाने साथ दिल्याने उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ३० टक्के अधिक आहे. यंदा एक एप्रिल ते सात मे दरम्यान सुमारे दोन हजार डझन आंब्याची विक्री केली. आणखी १०० पेट्यांची विक्री २० मेपर्यंत होईल. या वर्षी ३०० ते ६०० रुपये प्रति डझन दर मिळाला. गेल्या वर्षी उत्पादन कमी असल्याने हाच दर ५०० ते ८०० रुपये होता.

योगेश गुरव, वाघोटण, देवगड संपर्क : ९४२१२३८४३४

पणन मंडळाच्या महोत्सवात आतापर्यंत सुमारे साडेचार हजार डझन आंबा विक्री केली.

आणखी एक हजार पेटी माल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यंदा ३०० ते ७०० रुपये प्रति पेटी

आंबा विक्री झाली आहे.

विपुल गोणबरे, परचुरी, संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी संपर्क : ९११९५६२४०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com