Marathi Language University : मूल्यशिक्षणाचे धडे घेऊया मराठी भाषा विद्यापीठात

Education Lesson : राज्य सरकारने देशातील पहिले मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ रिद्धपूर येथे नुकतेच स्थापन केले आहे. या विद्यापीठातून भाषा, साहित्य, संस्कृती, संशोधनाला नवे आयाम मिळतील. ‘हे विश्‍वचि माझे घर’ ही शिक्षण विचारांची भूमिकाही हे विद्यापीठ बजावत राहील.
Marathi Language University
Marathi Language University Agrowon
Published on
Updated on

Marathi Language Update : एकंदर मराठी समाज, साहित्य, भाषा, संस्कृती या चार पातळ्यांवर विचार करू जाता राज्य सरकारने देशातील पहिले मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ सुरू केले आहे. हे विद्यापीठ महानुभाव पंथाची काशी असलेल्या रिद्धपूर (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथे स्थापन झाले आहे. राज्य सरकारचे यासाठी मराठी जनतेच्या वतीने तसेच मराठी भाषिकांच्या वतीने अभिनंदन! अमरावतीपासून चांदूरबाजार मार्गावर रिद्धपूर ३० किलोमीटर अंतरावर आहे. अवघ्या वर्षभरातच तातडीने पावले उचलत शासनाने मराठी विद्यापीठ उभारणीचा/विद्यापीठ सत्यात उतरविण्याचा निर्णय स्तुत्य आहे, शिवाय भूषणावह असा म्हणावा लागेल. संत साहित्याचे व्यासंग विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने मराठी विद्यापीठ स्थापना निर्मिती समिती गठीत करून या समितीला यथार्थ स्वातंत्र्य दिले आणि जलद गतीने विद्यापीठ निर्मितीला वेग द्यावा या दृष्टीने सरकारने विशेष लक्ष घातले. शासनाचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय, अधिकारी वर्ग यांनी या कामी फार मोठे सहकार्य केले, ही जाणीवतः नोंद येथे करायलाच हवी.

मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी एक मसुदा उपसमितीही डॉ. मोरे सरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. मसुदा समितीने अहोरात्र बौद्धिक प्रयत्न करून सर्वोत्कृष्ट दूरदृष्टीचा मसुदा सरकारला सादर केला आणि हे मराठी विद्यापीठ सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. मसुदा समितीत माझ्यासह डॉ. वरखेडे रमेश, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. अविनाश आवलगावकर यांनी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम कार्य केले आणि देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ कसे असावे, याचा पायाच मसुद्यामधून तयार झाला. संपूर्ण गुणवत्ताधिष्ठीत या विद्यापीठाची भूमिका मसुद्यात अंतर्भूत आहेच.

Marathi Language University
Marathi Language : लोकांमुखी मोठी व्हावी मराठी भाषा

विद्यापीठ रिद्धपूरलाच का?

महानुभाव पंथाची काशी आणि आद्य मराठी लेखनाचीही आरंभभूमी म्हणून रिद्धपूर या श्रीक्षेत्राचा मान मोठा आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांचा स्मरणभक्तीचा आद्यगद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ निर्माण झाला तोच मुळात रिद्धपूरमध्ये! मराठीच्या साहित्य परंपरेची सुरुवात ग्रंथराज लीळाचरित्रापासून मानली जाते आणि गणलीही जाते. रिद्धपूरच्या वाजेश्‍वरी मंदिरात प्रस्तुत ग्रंथ सिद्ध झाला, शिवाय ‘महदंबेचे धवळे’ .ही आद्यपद्य मराठी ग्रंथाची निर्मिती रिद्धपूरमध्येच झाली. एवढेच नव्हे तर महानुभव साहित्यातील एकूण चरित्रे, सूत्रात्मक, टीकात्मक, न्याय, व्याकरण, शास्त्र, क्षेत्रवर्णन, व्यक्ती माहात्म्य, स्तोत्रे, सातीग्रंथ ही अवघी साहित्य निर्मिती व तिचा पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्‍मयीन अनुबंधही या स्थळाची आहेच. म्हणून मराठी भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी, स्थापनेसाठी रिद्धपूर श्रीक्षेत्राची यथार्थ निवड करण्यात आली. प्राध्यापक डॉ. अविनाश आवलगावकर यांची या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून सरकारने नुकतीच निवड केली आहे आणि हे मराठी विद्यापीठ सुरू झाले. या विद्यापीठातून भाषा, साहित्य, संस्कृती, संशोधनाला नवे आयाम मिळतील.

विद्यापीठाचे नवपैलू

महाराष्ट्रात कार्यरत असणारी अकृषी विद्यापीठे त्या विद्यापीठांत मराठीचे विभाग असताना पुन्हा मराठी विद्यापीठ कशासाठी, अशी एक चर्चा बरीच रंगली. सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांनी लोकभाषा, राजभाषा, ज्ञानभाषा, धर्मभाषा या संदर्भात विश्‍वव्याप्ती विचारच सातत्याने मांडला. आणि समाज-संस्कृतीत तो रुजवलाही! तत्त्वज्ञानासोबत त्यांनी समाज, जात, धर्म, पंथ, प्रदेश, वंश, वर्ण, रूढी, चालीरीती यांच्यापल्याड जाऊन ममतेचा, समतेचा, न्यायतत्त्वांचा, मानवतेचा, शांती करुणेचा पण वैश्‍विक संदेश अखिल मानव जातीला दिला. सर्वथैव असे हे समतातत्त्व, शिक्षणात, संशोधनातही हवेच. ही भूमिका आणि दृष्टी मराठी विद्यापीठ स्वीकारून पुढे वाटचाल करेल आणि ‘हे विश्‍वचि माझे घर’ ही शिक्षण विचारांची भूमिकाही हे विद्यापीठ बजावत राहील. ‘छत्र विद्यापीठ’ अशी अभिनव संकल्पना मराठी भाषा विद्यापीठाच्या मुळाशी आणि कार्याची जोडताना विद्यापीठ स्थापना समितीने त्यासंबंधीची विधायक मीमांसाही केलेली आहे. त्यांचे पैलू विद्यापीठ कार्य शैलीत दिसतीलच!

Marathi Language University
Marathi Language Policy : भाषा धोरणाने उभारली मराठीच्या विजयाची गुढी

मूल्यांची रुजवण आणि उगवण

श्री चक्रधरस्वामींनी संपूर्ण मानव विश्‍वाला सत्य, अहिंसा, मानवता, समानता, प्रेमभाव, आत्मीयता, दयाभाव, न्यायसमानता ही मूल्ये दिली आहेत. या साहित्यातही या मूल्यांचा परिपोष किंवा मोठा आढळ आहे. ही सगळी चिरंतन मूल्ये आहेत. परंपरा आणि नवता यांची सांगड घालून पायाभूत मूल्य शिक्षणही आज अनिवार्यच ठरते. केवळ शैक्षणिक परीक्षांपेक्षा आत्मपरीक्षा पण मोलाची असते. केवळ नोकरीसाठीच्या प्रचलित शिक्षणापेक्षा जीवनशिक्षण, आनंदशिक्षण किंवा नवेशिक्षण जे जगात तुम्हाला कुठेही पोहोचलात तरी स्वाभिमानाने उभे राहायला ऊर्जा देत राहील. अशा दूरदृष्टीच्या ज्ञानपरंपरेला हे मराठी भाषा विद्यापीठ आत्मसात करीत उज्ज्वल ज्ञानाचे नव संशोधनाचे, कौशल्यांचे, समाज जीवनाचे धडे सत्वर देत राहील. एक जागतिक मुद्रा उभी करणारे हे विद्यापीठ जरूर असेल, इतकी सूक्ष्मतेने तसेच दूरदृष्टी जपत या विद्यापीठाची रचना योजलेली आहे.

मुळात पाहू जाता सर्वधर्मसमभावाचा उदात्त विचार शिक्षणाच्या संस्कारांतून वेगाने पुढे जाणारा असतो. ‘महाराष्ट्र म्हणजे महंतराष्ट्र’ अशी थोरवी एकंदरीत इतिहासात बाराव्या शतकांत नोंदवलेली वाचावयाला मिळते. श्री चक्रधरस्वामींच्या जवळ सर्व जातिधर्माचे लोक असायचे. म्हणजे मानवतेच्या स्वीकार आणि त्यासंबंधीच्या संदेश म्हणूनही त्यांच्या आचरणाकडे, निरूपण शक्तीकडे एकूण महानुभाव लेखनांकडे हमेशा आपण सारे पाहतो. मग असा महान, चिरंतन असा संदेश देणाऱ्या भूमीमध्ये रिद्धपूरलाच हे मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याचा समुचित साक्षेपी विचार राज्य सरकारने करून श्रीक्षेत्र रिद्धपुरला हे विद्यापीठ कार्यन्वित झाले आहे. त्यामुळे जगभरातील ज्ञानवंतांना, संशोधकांना, प्रतिभावंतांना, कौशल्यवंतांना, शास्त्रज्ञांना किंवा तत्त्वज्ञानींना, अर्थात या विद्यापीठाचे महाद्वार स्वाभाविकच खुले असेल. रूढ शिक्षणांत ज्या संधी सेवा कदाचित उपलब्ध नसतील त्या सर्व संधी सर्वांना द्यावयास हे मराठी भाषा विद्यापीठ जनता जनार्दनासाठी स्वागतोत्सूक असेल.

(लेखक महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार समितीचे आणि शासनाच्या मराठी भाषा विद्यापीठ मसुदा समितीचे तज्ज्ञ सदस्य आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com