Indian Education : नागरिक घडविणारे ‘बुनियादी’ शिक्षण

Indigenous Education System : महात्मा गांधींनी म्हटले होते, ‘नई तालीम’ शिक्षणपद्धती ही जगाला दिलेली आपली अखेरची सर्वोत्तम देणगी आहे. त्यांनी ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धती नाकारली आणि स्वदेशी शिक्षणपद्धती आणण्यासाठी ‘वर्धा शिक्षण परिषदे’च्या माध्यमातून देशासमोर आपले शिक्षण विचार मांडले.
Indian Education
Indian Education Agrowon
Published on
Updated on

किशोर अमृतकर

Mahatma Gandhi Jayanti : ‘‘नई तालीम म्हणजे मन, बुद्धी, शरीर यांचा समन्वय साधणारं एकात्मिक शिक्षण. व्यक्तीमधील सर्वोत्तम गुणांचा सर्वोत्तम विकास त्यात अपेक्षित आहे.’’ असे महात्मा गांधी म्हणत. समतेवर आधारित शोषणमुक्त समाजरचना हे ‘नई तालीम’चे उद्दिष्ट आहे. आजच्या शिक्षणाने स्पर्धात्मक रचना स्वीकारली आहे. सत्तेसाठी तिचा वापर होतोय. त्यातून भौतिकवाद वाढला. म. गांधींच्या मते, शिक्षणातून स्वतंत्र व चिकित्सकबुद्धीने विचार करणारी, समाजाप्रती कर्तव्यनिष्ठ, जीवनकौशल्य बाळगणारी व शोषणमुक्त जीवनासाठी मन, बुद्धी व शरीराने तयार असणारी व्यक्ती विकसित होणे महत्त्वाचे.

या ‘नई तालीम’ संकल्पनेला पुढे नेण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ ई. डब्ल्यू. आर्यनायकम आणि त्यांच्या पत्नी आशादेवी आर्यनायकम यांनी अथक परिश्रमातून ‘नई तालीम’ शिक्षणपद्धती रुजवली. सेवाग्राम येथे पूर्व बुनियादी, बुनियादी, उत्तर बुनियादी व उत्तम बुनियादी असे विश्वविद्यालयाच्या स्तरापर्यंत शिक्षणाचे प्रयोग व शिक्षक प्रशिक्षणाचे काम मोठ्या प्रमाणावर झाले. देशभरात या कामाचे संयोजन करण्यासाठी `हिंदुस्तानी तालिमी संघ’ स्थापन करण्यात आला.

जी संस्था पुढे ‘नयी तालीम समिती’च्या नावाने काम करीत आहे. १९७४ मध्ये सेवाग्राम येथील विद्यार्थ्यांसह होणारे शैक्षणिक कार्य थांबले. पुढे २००५ मध्ये ‘नयी तालीम समिती’द्वारे आनंद निकेतनची पुन:स्थापना झाली. या विद्यालयात आज राज्यसरकारचा मान्यताअभ्यासक्रम ‘नयी तालीम’च्या पद्धतीने राबविला जातो.

समाजात परस्परावलंबन असायला हवे, सहकार्य हवे व मूलभूत गरजांबाबत स्वावलंबी पद्धतीने जगण्यासाठी आवश्यक व्यक्तिगत कौशल्यांना वाव हवा. आपल्यातील शक्तीला आकार द्यायला हवा. निसर्ग आणि माणूस यांचा संबंध शोषणमुक्त हवा. आजवरच्या आपल्या वागण्यातून आपण अशाश्वततेकडे जात आहोत. आज मानवाने तारतम्याने सर्व संसाधनांचा वापर केला नाही, तर आपलेच अस्तित्व धोक्यात येईल, हा दृष्टिकोन मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणारे विद्यालय म्हणजे ‘आनंद निकेतन.’

Indian Education
Indian Education : शिक्षण - विद्यार्थ्यांना विविध संधी देणारे

कर्मेंद्रियांचा उपयोग सृजनासाठी

सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० ही मोठ्या मुलांच्या शाळेची वेळ, तर छोटी मुलं ४.३० पर्यंत शाळेत असतात. अनुभवातून शिक्षण हा उद्देश समोर ठेवून शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. शारीरिक श्रमाला व हाताच्या कौशल्याला महत्त्व देत अनेक विषय शिकविले जातात. त्यामध्ये बागकाम, स्वयंपाक, चित्रकला, सूतकताई, शिवणकाम, विणकाम इत्यादी कौशल्याच्या तासिका अभ्यासक्रमासोबत शिक्षण दिले जाते. इथे होणारी श्रमाची कामे उत्पादक स्वरूपाची आहेत. कर्मेंद्रियांचा उपयोग सृजनासाठी केला की, मुलं विध्वंसक ऊर्जेकडे वळत नाहीत, याचा आनंदानुभव ती घेतात. यातूनच मुलांमध्ये सहकार्याची भावना, आदर, संघभावना, श्रममूल्य, समतेचा दृष्टिकोन वाढीस लागतो. परस्परांसोबत वावरताना मुलांमध्ये हळूहळू ही मूल्ये रुजतात.

बागकामाची, शेतीची ओळख लहानपणापासून करून दिल्याने अन्नाची गरज भागवण्यासाठीचे तिचे महत्त्व तर त्यांना कळतेच; पण त्यामुळे ज्ञानाची विविध क्षेत्रे खुली होतात. शेती शिकताना शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांचे सामाजिक, आर्थिक व्यवस्थेत होणारे शोषण, शेती उत्पन्नाचा ‘किमान हमी भाव’ या संकल्पना समजत समाजातील अशा समस्यांना अहिंसक मार्गाने भिडण्याचे महत्त्व मुलांना कळते. भावनिक विकास उत्तम रीतीने साधतो. समन्वयाने काम करताना एकमेकांना विचारात घ्यावे लागते. त्यातून संवेदनशीलता वाढते. या विषयामुळे मुले शेतकरी होतील, अशी अपेक्षा नाही. त्या विषयाची त्यांना उत्तम ओळख होणे महत्त्वाचे.

शेतीशी जोडले न गेलेले जीवन अपूर्ण होय, असे गांधीजी म्हणत. वस्त्रनिर्मितीच्या माध्यमातून मुलांना अनेक प्रकारचे अनुभव मिळतात. मुलांची ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये काम करतात. मन एकाग्र होऊन हाताची कौशल्ये अधिक विकसित होतात. यातून वस्त्रनिर्मिती प्रक्रिया तर कळतेच; सोबत भोवतालचे जगसुद्धा लक्षात येते. याद्वारे पर्यावरणाचे भान जागृत होऊन मुलांसाठी हे शिक्षण दिशादर्शक ठरते.

स्वयंपाकाच्या माध्यमातूनही मुले बरीच शिकतात, स्वयंपाक नुसती कृती नव्हे. त्याच्या अवतीभवती ज्ञानाची, मनाची, भावनांची मांडणी असते, हे मुलांना यातून उमगते. स्वयंपाकघर महत्त्वाचे असते; पण ती फक्त स्त्रियांचीच जबाबदारी नाही तर पुरुषही ही कामं करू शकतात, हे मुलांना इथेच कळतं. रोज स्वयंपाकाची पूर्वतयारी मग स्वयंपाक, भांडी घासणं यात एक वारंवारिता आहे. इथे सर्जनशीलता संपू शकते; पण स्वयंपाकाच्या प्रक्रियेत नावीन्य आणून ती जोपासताही येऊ शकते हे त्यांच्या लक्षात येते. स्वयंपाक आणि जेवण हा विषय आरोग्याशी निगडित आहे, हे कळते. आहाराचे तक्ते केवळ पुस्तकातील कागदांवर न राहता आहारप्रक्रिया त्यांना हाताळता येते आणि मग तिचं महत्त्व मनावर बिंबते. कुटुंबाप्रती असणारी आपली जबाबदारी शिकत सोबतच जोडीला अर्थशास्त्र, विज्ञान, गणित, आरोग्यशास्त्र कळते.

Indian Education
Educational Changes : आनंददायी शिक्षणासाठी...

दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व या शाळेत मुलांच्या चांगलंच सवयीचं होते. ते काम जराही कमी दर्जाचं नाही, हे कळते. शाळेतील संपूर्ण स्वच्छतेचं काम मुले आणि शिक्षक सोबत करतात. इथे सफाई कर्मचारी नाही. वर्ग स्वच्छतेपासून शौचालय सफाईपर्यंतची कामे शिक्षक व विद्यार्थी सोबतच करतात. अनोखे प्रयोग येथो होतात. बुद्धी आणि श्रम यांचे एकत्रीकरण साधले जाते. अशा शाळाच समाजाला समानतेकडे, शाश्वततेकडे नेतात. त्यासाठी होणारे अनेक प्रयत्न शाळेत विविध उपक्रमांतून मुलांना देण्याचा प्रयत्न असतो. स्वावलंबनाचा परिचय मुलांना होतो. शाळेत संगणक, आधुनिक विज्ञान यासोबतच कृतिशील प्रशिक्षणालाही महत्त्व दिले जाते. ‘मुलगा-मुलगी असा भेद न करता वर्कशॉप व तांत्रिक शिक्षण’ दिले जाते. घरातील दैनंदिन तांत्रिक कामे मुले-मुली सहजपणे करू लागली आहेत.

‘नई तालीम’ फक्त गरिबांची वा श्रीमंतांची शाळा नाही. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी सगळे प्रयोग सारखेच आहेत. शिक्षक प्रयोगशील हवा आणि मुलांना निर्भय वाटलं पाहिजे, याकडे ‘आनंद निकेतन’ मध्ये पुरेपूर लक्ष दिलं जाते. विद्यालयात होणारी बालसभा ही या निर्भयतेची ताकद आहे. त्यामुळे समस्येतून मार्ग काढायला मुलं शिकतात, अभिव्यक्त होतात आणि ऐकायलाही शिकतात.

एकूणच शाळेत लोकतांत्रिक पद्धतीने काम चालते. विद्यार्थी-शिक्षक-पालक सगळ्यांनी मिळून विचारप्रक्रियेत सहभागी होऊन निर्णय घेणे, शाळेतील विविध वार्षिक उपक्रमांच्या नियोजनात पालकांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने खऱ्या अर्थाने ही शाळा आपली आहे, ही भावना पालकांच्या मनात बहुतांशाने रुजलेली आहे. ही पद्धती आज शिक्षणक्षेत्रात सर्वदूर राबवली जाणे हे तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.

महात्मा गांधीजींच्या ‘नई तालीम’वर आधारित विद्यार्थी व शिक्षक सोबत एकत्रितपणे विविध उत्पादक, सर्जनशील श्रम करतात. शिक्षकांना ‘सर’, ‘मॅडम’ न म्हणता ‘ताई’ व ‘दादा’ म्हणून संबोधले जाते. यातून परस्परसंबंधांमध्ये जवळीकता साधली जाते. विद्यार्थ्यांची एकमेकांशी तुलना केली जात नाही. एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रवास शिकविणारी ही शाळा मुलांना केवळ गुणांमध्ये अडकवत नाही. मातृभाषेतून आणि सोबतच इंग्रजीतून शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर अधिक भर दिला जातो. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व अधिक सखोलपणे रुजविणारी ही शाळा आज सर्वधर्मीय पाल्यांच्या प्रवेशासाठी अगदी मुक्त आहे.

आज केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मिळणारे पुस्तकी शिक्षण खरा नागरिक घडविण्यासाठी पुरेसे नसून, मुलांच्या सर्वांगीण विकासासमवेत, सर्वसमावेशक व्यक्ती घडविणे आजची आवश्यकता आहे. तेव्हा ‘आनंद निकेतन’ केवळ विद्यार्थीच नव्हे, तर उद्याचे जबाबदार नागरिक घडविणारे विद्यालय होय.

(लेखक सेवाग्राम येथील ‘आनंद निकेतन’मध्ये शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com