

सौ. सुरेखा बोऱ्हाडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय ज्ञानशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, अध्यापक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई होते.
त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला. शिक्षणाची त्यांना अतिशय आवड होती. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी वर्गाबाहेर बसून आणि रात्री रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून केले. परदेशातून अर्थशास्त्रासह दोन विषयांत त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्या वेळी ते भारतातील सर्वांत प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्चविद्याविभूषित व्यक्ती होते.
तत्कालीन भारतीय समाजाचा संपूर्ण अभ्यास करून आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभारली. समाजातील शोषित आणि वंचित घटकांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सामाजिक चळवळीचे नेतृत्व केले. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र त्यांनी प्रकाशित केले. शूद्र पूर्वी कोण होते?, हिंदू कोड बिल, द अनटचेबल, भारताचे संविधान अशी ५८ पुस्तके आणि ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांच्या लेखन विचारातून आजही सामाजिक विकासास नवी दिशा मिळते. जागतिक पातळीवरील शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यामध्येही आंबेडकरांचे कार्य, विचार प्रेरणादायी ठरले.
पारंपरिक सामाजिक रूढी परंपरांना छेद देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री असताना समाजाच्या सर्व स्तरांचा विकास व्हावा, यासाठी आवश्यक बिल त्यांनी मंजूर करून घेतले. अस्पृश्यतेचे उच्चाटन आणि महिलांचे सक्षमीकरण या गोष्टींना त्यांनी प्राथमिकता दिली. समाजाचा अर्धा भाग असलेल्या पण पुरुषसत्ताक पद्धतीमुळे अन्यायग्रस्त, मागास राहिलेल्या संपूर्ण स्त्री वर्गाला कायद्याचे कवच असल्याशिवाय हक्क मिळणार नाही, हा विचार करून त्यांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी अनेक महत्त्वपूर्ण कोड बिल लागू केले. यामध्ये लग्न संबंधातील स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना वारसा हक्क, घटस्फोटाचे स्वातंत्र्य, पोटगीचा हक्क, पुनर्विवाह अधिकार इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यात स्त्रियांना प्रसूती रजा, पालकत्वाचा अधिकार या महत्त्वाच्या बाबींही अंतर्भूत आहेत.
हरितक्रांतीची दूरदृष्टी
डॉ. बाबासाहेबांच्या शेतीविषयक विचारांमुळे आणि कार्यामुळे शेती आणि वीज निर्मितीला चालना मिळाली. शेती प्रश्नांविषयी त्यांनी मूलभूत उपाय योजना मांडल्या. त्यांनी मांडलेल्या सिंचन योजनेमुळे देशात हरितक्रांतीला चालना मिळाली. शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, बियाणे, उत्तम खते देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, असे बाबासाहेबांनी ठासून सांगितले होते. त्यानुसार काही अंशी सरकारने या योजना राबविल्या आहेत. भारताचे पाटबंधारे व ऊर्जामंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
भारतात संयुक्त प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प या संकल्पना सर्वप्रथम बाबासाहेबांनीच मांडल्या. केंद्रीय कॅबिनेटमंत्री असताना चार वर्षांच्या काळात त्यांनी दामोदर नदी प्रकल्प, हीराकुंड प्रकल्प, सोनू नदी प्रकल्प व देशातील १५ मोठ्या धरणांच्या कामाची सुरुवात केली होती. या सर्व प्रकल्पांचा उद्देश पूर नियंत्रण, जलसिंचन, विद्युतनिर्मिती, पाणीपुरवठा हा होता.
जागतिक पातळीवरील शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यामध्येही आंबेडकरांचे कार्य, विचार प्रेरणादायी ठरले. आपल्या देशाची लोकशाही राजकीय असली, तरी सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने तिला भक्कमपणा मिळावा आणि आधुनिक काळात राष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, जगापुढे भारत एक आदर्श लोकशाही राज्य म्हणून यावे यासाठी त्यांनी राज्यघटनेत अनेक महत्त्वपूर्ण विधेयक मांडले.
भारताच्या सामाजिक समतेसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यासाठी सामाजिक चळवळी घडवून आणल्या. समाजाचे मानसिक परिवर्तन केले. दलित समाजाला हक्क मिळवून देणे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटी अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. आयुष्यभर त्यांनी सामाजिक एकतेसाठी, विकासासाठी संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!’ असा गुरुमंत्र दिला. त्यांच्या या सर्व कार्यामुळे ते खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार ठरले.
९१५८७७४२४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.