Latur News : लातूर व धाराशिव जिल्ह्यांत ३० सप्टेंबर १९९३ झालेल्या भूकंपाची आठवण पुन्हा एकदा झाली. या भूकंपानंतरचा मराठवाड्यातील सर्वांत मोठा भूकंपाचा धक्का गुरुवारी (ता. २१) जाणवला आहे. हा भूकंप मराठवाड्यात सर्वत्र जाणवला. लातूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या भूकंपाचे दोन धक्के बसले. या भूकंपाचा केंद्र बिंदू हिंगोली जिल्हा आहे. लातूर येथील भूकंप मापक केंद्रावर ४.५ आणि ३.६ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे.
लातूर व धाराशिव जिल्ह्यांत ३० सप्टेंबर १९९३ रोजी भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. या भूकंपात दोन जिल्ह्यांतील मिळून ५१ गावे जमीन दोस्त झाली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा किल्लारी (ता. औसा) हा होता. त्यानंतर सातत्याने या भागात भूकंपाचे धक्के बसले. पण हे भूकंपाचे धक्के सौम्य राहिले. गुरुवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान मराठवाड्यात पुन्हा धक्के बसले. भूकंपमापक केंद्रावर ४.५ व ३.६ रिश्टर सेक्लवर नोंद झाली आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागात हे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यात जीवित अथवा वित्तहानी झाली नसली तरी भीती मात्र पसरली आहे.
जालना जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २१) सकाळी अंदाजे ६ वाजे दरम्यान कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, जाम समर्थ, मच्छिंद्र चिंचोली येथे भूकंपाचे हलके धक्के जाणवले. अंबड शहरासह परिसरात सकाळी सहा वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तलाठी कार्यालय पाटोदा, हेलसवाडी, तळनी, शिरपूर येथेही भूकंपाचे अंशतः धक्के जाणवले.
जायकवाडीवरील भूकंप तीव्रतामापन यंत्र बंद
जायकवाडी प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेले भूकंप मापन यंत्र जवळपास २०१७ पासून बंद आहे. त्यामुळे भूकंपाची तीव्रता किती हे न कळल्याने भूकंपमापन यंत्राचे महत्त्व स्पष्ट होत आहे. नाथसागर धरणासाठी १९९४ मध्ये याठिकाणी भूकंप मापन यंत्र बसविण्यात आले. ३० वर्षे जुने झालेले हे यंत्र कालबाह्य झाले होते. अनेक नवीन तंत्रज्ञान आले, मात्र अनेक वर्षे हे जुनेच यंत्र वापरण्यात येत होते.
त्यात हे यंत्र अनेक वेळा बंद पडले होते. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी नव्हते. दरम्यान, आता नवीन भूकंप मापन केंद्र बसविण्यात येणार असल्याची माहिती धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली. आता बसविण्यात येणारे यंत्र भारतभरातील भूकंपाची तीव्रता नोंदवून घेऊ शकेल, असेही जायकवाडी प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.