World Water Day : जागतिक जल दिन फक्त औपचारिक नको!

Article by B. D. Jade : आपल्याकडील स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व पाण्याच्या साठ्यांच्या शाश्‍वत संरक्षणाकरिता कार्यरत राहणे हा उद्देश यामागे ठेवण्यात आला आहे. ‘शांततेसाठी पाणी’ अशी यंदाच्या जलदिनाची थीम आहे.
Water
Water Agrowon

डॉ. बी. डी. जडे

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही हे माहीत असूनही पाणी वापराबाबत कोणीही फारसे गंभीर नाही. ‘शांततेसाठी पाणी’ हे वाचल्यानंतर लगेचच लक्षात येते, की गल्लोगल्ली, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, तालुक्यातालुक्यांत, जिल्ह्याजिल्ह्यांत, राज्याराज्यांमध्ये, देशादेशांमध्ये पाण्याकरिता वाद सुरू आहेत.

तसे पाहिले तर पाणी हे पुरेसे आहे; परंतु त्याचा वापर, काटेकोर व्यवस्थापन डोळसपणे केले जात नाही. म्हणून तर त्यामधून वाद निर्माण होतात. पाणी शांतता निर्माण करू शकते किंवा संघर्षाची ठिणगी देखील टाकू शकते. जेव्हा पाण्याचे वाटप असमान होते, त्या वेळी लोकांमध्ये, राज्यांमध्ये, देशांमध्ये तणाव निर्माण होतो.

पाणी शांतता निर्माण करू शकते किंवा संघर्ष निर्माण करू शकते असा संदेश या वर्षीच्या जागतिक जल दिनाच्या निमित्ताने देण्यात आला आहे. समृद्धी आणि शांतता पाण्यावर अवलंबून असते. पाणी आपल्याला संकटातून बाहेर काढू शकते. याकरिता सर्वांनी उपलब्ध पाण्याच्या वापराबाबत गांभीर्याने विचार करायला हवा.

पाण्याच्या समस्येविषयी समजून घेऊन या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे. यामध्ये प्रत्येक कुटुंबातील लहान-मोठा सदस्य, शाळा, महाविद्यालये, खासगी कंपन्या, सरकारी कंपन्या, कार्यालये, विविध संस्था, शासन यांनी एकमेकांमध्ये संवाद ठेवून पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने, योग्य पद्धतीने कसा होईल, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी, खबरदारी कशी घेता येईल यावर विचारमंथन, चिंतन केले पाहिजे. प्रामुख्याने शेतकरीवर्गाने हा विषय अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

Water
Agriculture Water Bill : वाढीव पाणीपट्टी विरोधात शेतकरी आक्रमक, मुंबईवर विराट मोर्चा काढण्याचा इशारा

पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी ९७ टक्के पाणी समुद्रांमध्ये, २ टक्के पाणी बर्फाच्या स्वरूपात उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर तर ०.४ टक्का पाणी हे १००० मीटरपेक्षाही जास्त खोलीवर असून ते पाणी खारवट आहे.

फक्त ०.६ टक्का पाणी हे गोड म्हणजेच पिण्यायोग्य आहे. आपण भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील उपलब्ध पाण्याचा वापर करतो. उपलब्ध पाण्यापैकी ८० टक्के पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो. तर उर्वरित पाण्याचा वापर उद्योगधंदे आणि दैनंदिन गरजा भागविण्याकरिता केला जातो.

सूक्ष्म सिंचनावर हवा भर :

शेती व्यवसायामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, तसाच पाण्याचा अपव्ययही होतो. त्यामुळे शेतीमध्ये पाण्याचा वापर काळजीपूर्वक करण्याची गरज आहे. जास्त पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते असे नाही, हे शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.

उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर होण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन तंत्राचा वापर अधिक करण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे कमी पाण्यातून अधिक उत्पादन घेऊन शेती अधिक फायदेशीर करता येईल.

Water
Water and Agricultural Revolution : ‘किर्तांगळी’त घडली जल अन् कृषी क्रांती

शेतीबरोबरच कारखानदारी, उद्योगधंदे करणाऱ्यांनी देखील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करायला पाहिजे. कारखान्यातून निघालेल्या रासायनिक पाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा उभारली पाहिजे.

घरगुती वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या वापराबाबतही जनजागृती झाली पाहिजे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दिवसभर ज्या-ज्या वेळी पाण्याचा वापर होईल त्यावेळी तो काटकसरीने कसा होईल यावर कार्यवाही झाली पाहिजे.

राजस्थानसारख्या वाळवंटी भागात, ज्या खेड्यांमध्ये शेतीला पाणी नाही, पिण्याच्या पाण्याकरिता महिलांची होणारी पायपीट पाण्याचे खरे महत्त्व सांगणारी आहे. यातून खरेतर बोध घेतला पाहिजे आणि

पाण्याचा जपून, काटकसरीने वापर करायला शिकले पाहिजे. पाणी नसेल तर सर्वांचे अस्तित्व संपण्यास वेळ लागणार नाही. म्हणून आपल्याकडील पाण्याचा कार्यक्षम, काटकसरीने वापर तसेच पाणी साठ्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. नाही तर पाणी नाही तर जीवन नाही! जागतिक जलदिन नुसता औपचारिकरीत्या साजरा न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला हवी. फक्त जागतिक जलदिना पुरते एक दिवस जागृक न राहता दैनंदिन जीवनात देखील पाण्याचा काटेकोर वापर करणे गरजेचे आहे.

डॉ. बी. डी. जडे,

(वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com