E-Peak Pahani : पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी कराच; समजून घ्या प्रक्रिया

E-Peak Inspection : सध्या ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना मदत व्हावी यासाठी ई-पीक पाहणी प्रक्रियेची थोडक्यात माहिती...
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon
Published on
Updated on


अनिल जाधव

Crop Insurance : यंदा पावसातील खंड आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे पीक विम्याला महत्त्व आले आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांशी भागांमध्ये मोठा खंड पडला. यामुळे पिके हातची जाण्याची वेळ आली. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षाही कमी येण्याची शक्यता आहे, असे शेतकरी सांगतात. अशा संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीकविम्याचा मोठा आधार मिळेल. पण पीक विमा ई-पीक पाहणीवर अवलंबून आहे. ई-पीक पाहणीत आपण ज्या पिकाची नोंद करणार आहोत, तेच पीक ग्राह्य धरण्यात येणार आहे. सध्या ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना मदत व्हावी यासाठी ई-पीक पाहणी प्रक्रियेची थोडक्यात माहिती...

पीक विम्यात ई-पीक पाहणी महत्त्वाची का?
पीक विम्याचा लाभ मिळण्यात ई-पीक पाहणी पहिला टप्पा आहे. शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी केली नसेल, तर क्षेत्र नापेर पकडले जाण्याची शक्यता असते. समजा एखाद्या शेतकऱ्याने ई-पीक पाहणी केली नाही. तर अशा शेतकऱ्याचा पीक पेरा तलाठी नोंदवितात. पण यंदा तलाठ्यांना पीक पेरा नोंदवण्यास मनाई करण्यात आल्याचे काहीजण सांगतात. यंदा १०० टक्के ई-पीक पाहणी करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. अनेकदा हा पेरा आणि प्रत्यक्ष पीक यामध्ये तफावत असते. अशी तफावत असल्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पीक विमा योजनेतही ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे. ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक आणि प्रत्यक्ष पिकात तफावत दिसत असेल, तर ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेल्या पिकालाच अंतिम गृहीत धरले जाईल. त्यामुळे ई पीक पाहणी महत्त्वाची आहे.

E Peek Pahani
E-Peek Pahani : ई-पीक पाहणी मोहिमेला प्रतिसाद मिळेना

ई-पीक पाहणीचे फायदे
- खरीप २०२२-२३ पासून ई-पीक पाहणी प्रणालीत संकलित झालेली माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या किमान आधारभूत किंमत योजनेकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीत नमूद केलेल्या पिकाची खेरदी केली जाणार आहे. भातापासून याची सुरवात करण्यात आली आहे.
- बँकांना पीक कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची पडताळणीसाठीही ई-पीक पाहणी महत्त्वाची आहे.
- नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाने तयार केलेल्या ई-पंचनामा ॲपमध्ये ई-पीक पाहणी प्रणालीत संकलित केलेली माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सुलभ होणार आहे.
- शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अंत्यत उपयुक्त ठरणार आहे.
- राज्यभरामध्ये एकाच प्रकारच्या पिकासाठी एकच सांकेतांक क्रमांक निश्चित करण्यात येत असल्यामुळे गाव/तालुका/जिल्हा/विभाग निहाय कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे. याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे.
- कृषी विभागाच्या विशिष्ट पिकासाठी देय असणाऱ्या योजना जसे ठिबक/तुषार सिंचन योजना इत्यादींचे लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे सहज शक्य होणार आहे.
- आधारभूत किमतींवर धान/कापूस/हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी देखील पीक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे.
- खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होवू शकते. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांकडून किती रोजगार हमी योजना उपकर व किती शिक्षण कर देय ठरत आहे, हे निश्चित करता येते.
- कृषी गणना अंत्यत सुलभ पद्धतीने व अचूकरित्या पूर्ण करता येईल.

E Peek Pahani
E Peek Pahani : पिक विमा मिळवायची असल्यास आपली ई-पीक पाहणी करून घ्या ; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ई-पीक पाहणीत कुणाची काय भूमिका?
शेतकरी ः


शेतकरी हा ई-पीक पाहणी प्रणालीचा प्राथमिक वापरकर्ता असेल. शेतकरी आपला मोबाईल नंबर नोंदवून व नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून पीक पाहणीला सुरवात करू शकतो.
खासगी सर्वेक्षक किंवा सहाय्यक ः
खासगी सर्वेक्षक किंवा सहाय्यक हा स्थानिक गावातील व्यक्ती असणे आवश्यक आहे. खासगी सर्वेक्षकाला मोबाईल ऍप्लिकेशनवर वैयक्तिक नोंदणी करणे अनिवार्य असेल. तालुका अधिकारी हे खासगी सर्वेक्षकाची नेमणूक करतील.
सुपरवायझर किंवा तलाठी ः
शेतकऱ्याने केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के पडताळणी तलाठी करतील. तसेच खासगी सहाय्यक किंवा सर्वेक्षक यांच्यामार्फत मोबाईल अॅप मधून केलेल्या पीक पाहणीची १०० पडताळणी तलाठी करणार आहेत.
व्हेरीफायर ः
पडताळणी करणारा हा सरकारी नियुक्त अधिकारी असेल. सुपरव्हायझर किंवा तलाठी यांच्यामार्फत दोन वेळेस नाकारलेल्या सर्वेक्षणांची पडताळणी करून पुन्हा पीक पाहणी करेल. व्हेरीफायर हा तालुका अधिकारीद्वारा नियुक्त केलेला असेल.

E Peek Pahani
E Peek Pahani : ‘ई-पीक पाहणी’ पंचनाम्यांची अट काही दिवसांसाठी शिथिल

ई-पीक पाहणी कशी करावी?
ई- पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी व्हर्जन २ हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे. या नव्या अॅपमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सुधारित मोबाईल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे (centroid) अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचा अचूक फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.

मोबाईल अॅप उघडल्यानंतर काही परवानग्या द्याव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला लॉगिनचे अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी ‘’शेतकरी म्हणून लॉगीन’’ करा हा पर्याय निवडा. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकावा. पहिल्या वेळेस खातेदार नोंदणीसाठी विभाग, जिल्हा, तालुका, गाव निवडा. आपण टाकलेला खातेक्रमांकही नोंदवावा. पुढे या बटणावर क्लिक केल्यावर वापरकर्त्याला नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलायचा आहे का? अशीही विचारणा केली जाते. बदलायचा असल्यास तसा क्रमांक बदलताही येतो.



ई-पीक पाहणीचे टप्पे
नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला होमपेज दिसेल. खालील दिलेल्या स्क्रीन प्रमाणे यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. अशा प्रकारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. कायम पड असल्यास प्रथम कायम पड जमिनीची माहिती नोंदवावी. त्यात खाते क्रमांक, गट क्रमांक, कायम पड, पड क्षेत्राची माहीत देऊन फोटो अपलोड कारावा. नंतर माहितीची पडताळणी करावी.

शेतकऱ्यांना बांधावरची झाडेही नोंदवता येतील. त्यासाठीही तारीख, खाते क्रमांक, गट क्रमांक, बांधावरची झाडे, झाडांची संख्या आदी माहिती भरल्यानंतर फोटो अपलोड करावा. आपण भरलेली माहिती तपासून घ्यावी. ४८ तासांमध्ये माहिती दुरुस्ती करता येते.

पीक माहिती नोंदविण्यासाठी शेतकऱ्याने सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी खाते क्रमांक, भूमापन, गट क्रमांक, जमिनीचे एकूण क्षेत्रफळ, पोट खराबा, हंगाम, पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, पिकाचा वर्ग, पिकाचे नाव, क्षेत्र भरा, जल सिंचनाचे साधने, सिंचन पध्दत, लागवडीचा दिनांक आदी माहिती भरावी. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर गट क्र., सर्वे क्रमांकाचा नकाशा पाहण्यासाठी आणि पिकाचा फोटो काढण्यासाठी पुढे जा या बटणावर क्लिक करावे.


नंतर आपण निवडलेल्या गट क्रमांकाचा नकाशा आणि आपले गटापासूनचे अंतरही स्क्रिनवर दिसेल. आपण गटापासून जास्त अंतरावर असाल तर लाल रंगाने दर्शविले जाईल. त्यावेळेस तुम्हाला गटापासून अचूक अंतर कोणते हेही पाहता येईल. आपण योग्य अंतरावर असाल तर हिरव्या रंगाने दर्शविले जाईल. त्यानंतर तुम्हाला पिकाचा फोटो काढता येईल. पिकाचा फोटो काढून अपलोड केल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती तुम्हाला पाहता येईल. ही माहिती अचूक असल्यास पुढच्या टप्प्यावर जावे. सर्व माहिती अपलोड केल्यानंतर मोबाईलच्या उजव्या कोपऱ्यात ‘पिकांची माहिती पहा’ असा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन तुम्ही ४८ तासांमध्ये एकवेळ दुरुस्ती करू शकता. तुम्हाला तुमची तसेच गावातील इतर खातेदारांनी ई-पीक पाहणी केली असेल तर त्यांचीही माहिती पाहता येईल.


ई-पीक पाहणीत अडचणींचा डोंगर
ई-पीक पाहणीसाठी शासनाने नवीन अॅप आणले खरे, पण या अॅपमध्ये अनेक त्रुटी असल्याचे शेतकरी सांगतात. ई-पीक पाहणीत सतत सर्व्हर डाऊनच्या समस्या येत आहेत. काही शेतकरी तर दोन-तीन मोबाईलवरूनही ई-पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरीही ते शक्य होताना दिसत नाही. ई-पीक पाहणीतील अडचणी पाहून सरकारने १५ दिवसांची मुदतवाढ दिली. पण समस्या सुटल्या नाहीत. तसेच शेतकरी आपल्या शेतामधून माहिती नोंदवत असताना जिओ फेंचिंगमध्ये शेतकरी गटापासून दूर दाखवते, अशा अनेक अडचणी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे शक्य होत नाही. त्यातच यंदा प्रशासनाने तलाठ्यांना पीक पेऱ्याची नोंद करण्यास मनाई केली आहे. यंदा १०० टक्के ई-पीक पाहणी शेतकऱ्यांमार्फतच होणार आहे. तलाठी केवळ १० टक्के नोंदीची तपासणी करणार आहेत. त्यामुळे या तांत्रिक अडचणींमुळे ई-पीक पाहणी करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. पण राज्याच्या ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या या अडचणींवर ठोस उपाय होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना अडचणी आल्यास थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या मोबाईवरून पुन्हा प्रयत्न करा, अशा मोघम मार्गदर्शनावर बोळवण केली जाते. ई-पीक पाहणीचे ॲप तांत्रिकदृष्ट्या सदोष आहे. पण याची शहानिशा न करताच शासनाने १०० टक्के ई-पीक पाहणी करण्याचा निर्णय घेतला का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com