Hailstorm In Maharashtra : अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची पिकं झाली भुईसपाट!

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात गारपीटीवरून कॉँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मदत द्यावी अशी मागणी केली.
Hailstorm In Maharashtra
Hailstorm In MaharashtraAgrowon
Published on
Updated on

विदर्भात जोरदार वादळी पाऊस आणि गारपीटीनं सोमवारी (ता.२७) संध्याकाळी धुमाकूळ घातला. त्यामुळे रब्बीतील हरभरा, गहू, ज्वारी, कांदा पिकासह फळबागा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं. बुलढाणा जिल्ह्याच्या १३ तालुक्यात पावसाने तर शेगाव, नादुरा, संग्रामपुर भागात गारपीटीने झोडपून काढलं. अकोला जिल्ह्यातील अकोट, पातूर आणि तेल्हारा तालुक्यात मुसळधार पावसासोबत गारपीट झाली.

विदर्भातील उर्वरित जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली होती. तसेच मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात गारपीटीनं हरभरा, ज्वारी पिकं भुईसपाट केली. तर नाशिक, नंदुरबार, जळगाव, सोलापूर जिल्ह्यातही जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, नाशिकमधील मनमाडमध्ये गारपीटीनं रब्बी पिकं भुईसपाट केली. शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही वाया गेला आहे.

Hailstorm In Maharashtra
Soybean-Cotton Rate: कांदा, सोयाबीन, कापसावरून आम्हाला राजकारण करायचं नाही : अजित पवार

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात गारपीटीवरून कॉँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मदत द्यावी अशी मागणी केली. "अवकाळी पावसाने राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी." असंही थोरात म्हणाले. त्यावर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दुपारी फेसबुक पोस्टमधून नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी विधानसभेत याबद्दल माहिती दिली. मुंडे म्हणाले, "नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली आहे." यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारनं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी केली. नाना पटोले यांनी सरकारच्या कारभारावर टीकाही केली. पटोले म्हणाले, " मागच्या वेळी नुकसान भरपाईची मागणी केली पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. पुरवण्या मागण्यामधून शेतकरी मदतीसाठी निधी मंजूर केला जातो, त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल," असं म्हणत पटोले यांनी टीका केली.

राज्यात अवकाळी पावसानं शेतकरी कशी बेजार झालेत, याची कहाणी अनिल देशमुख यांनी विधानसभेत मांडली. हवामान विभागानं आजही विदर्भातील वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना वीजांसह पावसाचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांच्या ताटात माती मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढलेली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हरभरा रब्बीत मोठ्या प्रमाणात घेतला जातो. सध्या रब्बी हरभरा काढणीचा हंगाम आहे. शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला हरभरा पावसात भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.

गहू, ज्वारी, कांदा, मका या पिकांसोबत संत्री, मोसंबी या फळपिकांची अवस्था हीच झालीय. सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिलेत खरे पण जानेवारी महिन्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीने पिकांची माती केली होती. पण सरकारकडून त्याची अजूनही मदत मिळाली नाही, असं शेतकरी सांगतात. वास्तविक सरकारच्या धोरण लकव्यामुळं आधीच मातीमोल किंमतीत शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात या अस्मानी संकाटानं तोंडचा घास हिसकावून घेतला. सरकारनं या अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना आधार द्यायला हवा. कारण खरीपातील दुष्काळ आणि रब्बीतील अवकाळीनं शेतकऱ्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com