Pune News : बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून कोकण, विदर्भासह राज्याच्या विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर शनिवारी (ता.२४) झालेल्या पावसामुळे पुण्यातील डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला. यामुळे पुन्हा एकदा येथील नागरीकांची तारांबळ उडाली. तर कोल्हापूर सांगलीसह नाशिक, नगर, लातूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाने झोडपले. नगर जिल्ह्यात तर मुसळधार पावसामुळे १ हजार हेक्टरपैक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे.
पुण्यात रिमझिम, धरण क्षेत्रात धो धो
गेल्या दोन ते तीन दिवसापासून पुण्यासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाने सुरूवात केली आहे. पुणे शहरात सध्या पावसाची रिमझिम होत असून आधी मधी पावसाला उघडीप मिळत आहे. पण धरण साखळी क्षेत्रात पावसाची धो धो सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी खडकवासला धरणातून नदी पात्रात ३५ हजार ३१० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. ज्यामुळे पुण्यातील डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला. यावेळी नदी पात्रात पार्क करण्यात आलेल्या गाड्या काढण्यासाठी नागरीकांची तारांबळ उडाली होती.
नाशकात पूर
नाशिक जिल्ह्यासह धरणक्षेत्रात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत ३९ हजार ००२ क्यूसेक ने विसर्ग सोडण्यात आला. यामुळे गोदा पात्र दुथडी भरून वाहत असून पुन्हा एकदा विसर्गात १३ हजार ३०६ क्यूसेक वाढवण्यात आल्याने सध्या ५२ हजार ३०८ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे जायकवाडीला मोठा आधार मिळत असून जायकवाडीकडे गोदावरीतून २० टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. सध्या जायकवाडीत उपयुक्त पाणीसाठा ३९.५६ टक्क्यांवर पोहचला आहे. यावेळी गंगापूर धरणातूनही ८ हजार ४२८ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात होता.
कोल्हापूर, सांगलीला झोडपले
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून सहा नंबरच्या स्वयंचलित दरवाज्यातून १ हजार ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तर सांगलीला शुक्रवारी आणि शनिवारी मुसळधार पावसाने धुतले. यामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीत किंचीत वाढ झालेली आहे. पण धरणातून अद्यापही विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.
सिंधुदुर्गात जनजीवन विस्कळीत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शुक्रवारी रात्रीपासून पाऊस कोसळत असून येथील जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हात सरासरी ११४ मि.मी एवढा पाऊसाची नोंद झाली असून नदी नाल्यांना पूर आला आहे. तर हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील अंजना नदीला पूर
संभाजीनगर जिल्ह्यात मागील ३ दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून सोयगाव तालुक्यासह कन्नड तालुक्यातही जोरदार पाऊस होत आहे. येथे सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर आला असून सोयगाव तालुक्यातल्या कालदरी परिसरात शेतात असणारा बांध फुटला. यामुळे मक्का पिकांच्या शेतातून पाणी शिरल्याने नदीच स्वरूप आलं आहे. कन्नड तालुक्यातही जोरदार पावसामुळे अंजना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला.
नगरला पावसाने झोडपले! शेतीचे नुकसान
दरम्यान मागील आठवड्यापासून पावसाने अहमदनगर जिल्ह्यास चांगलेच झोडपले असून नगर तालुका, संगमनेर, नेवासे, श्रीगोंदे, अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. तर गेल्या आठवड्यात रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे १ हजार १७० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, मूग, बाजरी (खरीप) पिकांसह उसाचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका श्रीगोंदा तालुक्याला बसला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे नगर तालुक्यातील तीन घरांचे अंशतः पडझड झाली असून राहुरी तालुक्यातील दोन, अकोले, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा या तालुक्यांतील प्रत्येकी एका घरांची पडझड झाली आहे. या घराच्या पडझडीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आला आहे.
जळकोट घोणशी मंडळात जोरदार पाऊस
यंदा लातूरमध्ये चांगला पाऊस सुरू झाला असून जळकोट तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला आहे. जळकोट मंडळासह घोणशी मंडळात अनुक्रमे ९० मिमी आणि ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच साठवण तलाव तुडुंब भरले असून आता तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर गेल्या दोन वर्षांनंतर यंदा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्याने शेकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.