Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाला दमदार सुरूवात! सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, नाशिक, पुण्यासह बुलढाण्यात पावसाचा जोर

Maharashtra Rain News : गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात पाऊस सुरू झाला असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, नाशिक, पुण्यासह बुलढाण्यात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. हवामानशास्त्र विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यात पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, नंदुरबार, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणाला येत्या तीन, चार तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकण, गोवा आणि घाट माथ्यांवर अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. यादरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, नाशिक, पुण्यासह बुलढाण्यात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.

पुण्यासह ग्रामीण भागात पाऊस

पुणे शहरासह ग्रामीण भागात देखील पावसाने हजेरी लावली. यावेळी शुक्रवार आणि शनिवारी सकाळी देखील पुण्यात जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन- तीन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात विसर्ग केला जाणार आहे. सांडव्यावरून २ हजार १४० क्युसेकचा विसर्ग करण्यात येणार असल्याने नदी काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Update
Maharashtra Rain Update : विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

सिंधुदुर्गमध्ये दमदार हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसापांसून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र शुक्रवारी (ता.२३) रात्रीपासून सिंधुदुर्गात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. कोकणातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यात शुक्रवारी चांगला पाऊस झाला असून पावसामुळे कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

नांदेडमध्ये देखील आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पावसाने झोडपून काढले. शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान ढगफूटीसदृश्य पाऊस झाल्याने कवठा भागात आयोजित शिवपुराण कथा वाचन कार्यक्रम रद्द करावा लागला. येथे पाणीच पाणी झाल्याने चिखल झाला होता. तर विष्णुपुरी धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत झापट्याने वाढ झाली. यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता. सध्या विष्णुपुरी धरण ९८ टक्के भरले असून धरणातून ४६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

Rain Update
Rain Update : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

नाशिकच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार

दरम्यान नाशिक जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला चांगलाच वाढला असून गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस पडत आहे. येथे दारणा धरणातून २ हजार क्यूसेस आणि गंगापूर धरणातून ५०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर सध्या हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असल्याने गंगापूर आणि दारणा धरणात पाणी वाढण्याची शक्यता आहे. तर धरणांतून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरीत पावसाची बॅटिंग!

रत्नागिरी जिल्ह्यात देखील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवाररात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला असून जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर किनारपट्टी भागात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. तर पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

बुलढाणा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला!

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाण्याच्या येळगाव, सागवान परिसरात शुक्रवार रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सागवान येथील पैनगंगा नदीला मोठा पूर आला असून बुलढाणा शहरासह दहा ते बारा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com