Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात काढणीपूर्व अवस्थेतील मका पिकावर ‘सुकवा’ आल्याने अपेक्षित वाढ झाली नाही. तर पीक कणसाची वाढ कमी आहे. कणसातील दाणे पूर्णपणे भरलेले असून ते पोकळ पडत आहे. परिणामी, काढणीपश्चात उत्पादन व गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार आहे. हा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात मक्याचे सरासरी क्षेत्र २ लाख १७ हजार ७१७ हेक्टर इतके आहे. असे असताना यंदा २ लाख ७८ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. ही टक्केवारी १२८.२१ टक्के आहे. कुक्कुटखाद्य व प्रक्रियेसाठी वाढलेली मागणी, चाऱ्याची उपलब्धता व तुलनेत कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून गेल्या पाच वर्षांत नाशिक विभागात मक्याचे लागवड क्षेत्र वाढले. मात्र यंदा हे पीक नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. कळवण, सटाणा मालेगाव, देवळा, चांदवड अशा तालुक्यांत ती समस्या आढळून येत आहे.
अनेक ठिकाणी मका काढणीपूर्व अवस्थेत असून पीक उभे सुकून जात आहे. कणसाची पूर्णपणे वाढ झालेली नाही. दाणे भरले नसल्याने अनेक ठिकाणी ५० टक्क्यांवर नुकसान उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सौंदाणे (ता. मालेगाव) येथील मका नुकसानग्रस्त शेतकरी सुरेश पांडुरंग पवार यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांपासून मका पीक घेतो; मात्र अशा प्रकारची समस्या कधीही मका पिकावर दिसून आली नव्हती. माझ्या तीन एकर क्षेत्रावर मका असून ८० ते १० क्विंटल उत्पादन अपेक्षित होते. मात्र ते नेहमी कमी उत्पादन येऊ शकते.
बुरशीजन्यमुळे मररोगामुळे नुकसानीचा अंदाज
कृषी विज्ञान केंद्र मालेगाव व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने या उशिरा येणाऱ्या रोगासंदर्भात भेटी देऊन पाहणी केली. हा मका पिकावर उशिरा येणारा मररोग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या बाबत विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडून पाहणी व शास्त्रीय निदान झाल्यानंतरच या रोगाची स्पष्टता होणार आहे.
...असे आहे नुकसान
- मक्याच्या उभ्या झाडांवर सुकवा.
- झाड वाळून गेल्याने काही झाडे आडवी.
- मक्याचे कणीस भरत असताना शेवटच्या टप्प्यातील दाणे भरत नसल्याची स्थिती.
- मक्याचे कणीस लागले; मात्र परिपक्व नाही.
- काही कणसांमध्ये दाणे दिसून येत आहेत मात्र ते पोकळ पडल्याने वजन व प्रतवारीत अडचणी.
- मक्याचे झाड उपटून पाहिल्यानंतर मुळ्या सुकून गेल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.