Drought Crisis In Diwali : पीक-पाण्याशिवाय चैतन्य कुठून येणार?

Maharashtra Drought : दुष्काळ यंदा आ वासून उभा ठाकला. पिके उभी करण्यात खर्च व श्रम गेले. पावसाने ऐन हंगामात वाढीच्या वेळेस पाठ दिली. हंगाम पुरता वाया गेला.
Kolhapur Drought Condition
Kolhapur Drought Conditionagrowon
Published on
Updated on

Jalgaon News : ‘‘दुष्काळ यंदा आ वासून उभा ठाकला. पिके उभी करण्यात खर्च व श्रम गेले. पावसाने ऐन हंगामात वाढीच्या वेळेस पाठ दिली. हंगाम पुरता वाया गेला. हंगाम असला तर हाती पैसा असतो. पैसा असला तर शेतकरी, मजूर खूश असतात; मग दिवाळी सणही धडाक्यात साजरा केला जातो.

पण हंगाम साधला नाही, हाती पैसाही नाही. अशात सणाचे चैतन्य कसे येणार,’’ असा सवाल रोटवद (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील ग्रामस्थांनी उपस्थित करून ग्रामीण भागातील कोलमडलेल्या अर्थकारणाचे विदारक वास्तव मांडले.

रोटवदचे शिवार कापसासाठी प्रसिद्ध आहे. कमाल क्षेत्रात कापूस असतो. पाऊस असला तर रब्बीही बऱ्यापैकी असतो. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. शहरांत चमचमाट दिसू लागला आहे. पण खेड्यांत दिवाळीचा मागमूसही नाही. कारण हंगाम हवा तसा हाती आला नाही. शिवारात पुरेसे काम नसल्याने मजूरही आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत.

गावानजीक मोठी नदी नाही. गावाच्या पश्चिमेला वन विभागाच्या क्षेत्रात विझोऱ्या नाला पाऊसमान चांगले राहिल्यास डिसेंबरमध्येही प्रवाही असतो. पण यंदा तो कोरडा आहे. जसा हा नाला कोरडा आहे, तशा शिवारातील ७० टक्के विहिरी कोरड्या आहेत. तास-दोन तास त्यातून उपसा करता येतो. अर्धा एकर क्षेत्रही त्यात भिजत नाही. त्यात विजेची समस्याही आहे.

Kolhapur Drought Condition
Maharashtra Drought : सरकारी दुष्काळ

बारा एकरात फक्त दीड क्विंटल कापूस

सुरेश कडूबा कोकाटे म्हणाले, ‘‘माझा १२ एकर कापूस आहे. यंदा चांगला पाऊस येईल, असे अंदाज सुरवातीला होते. विहीर जेमतेम सुरू होती. कापूस कसाबसा वाढविला. जूनमध्ये पावसाने ओढ दिली. ऑगस्टमध्ये पीक वाढीच्या वेळेसही २०-२५ दिवस पाऊस नव्हता. कापसाची वाढ हवी तशी झाली नाही. सप्टेंबरच्या पावसाने पीक तगले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. परतीचा पाऊसही आला नाही.

आता पीक ऊन धरत आहे. विहिरीतून दोन तासही पाणी उपसा होणार नाही, अशी स्थिती आहे. १२ एकरात १०.२६.२६ व इतर अशा खतांच्या एकूण ५२ गोण्या दिल्या. खर्च किती झाला, याचा विचार केला तरी अस्वस्थ होते. कापूस घरात फक्त दीड क्विंटल पडला आहे. हाती पैसा नाही. अनेकांनी तीन रुपये प्रतिशेकडा दराने व्याजाने पैसे आणले आहेत. मोठी तंगी आहे. अशात सण उत्सवांचा उत्साह कसा असणार?’’

साठ एकरांत फुपाटाच दिसतोय

अतुल सुरेश बोकाडे यांची कापसाची ६० एकर शेती आहे. मक्याचीही पशुधनासाठी लागवड केली होती. पण दोन्ही पिके हातची गेल्याची स्थिती आहे. तीन विहिरी आहेत. पण त्यातील एकच विहिरीचा जलसाठा बरा आहे. त्यातून सिंचन करताना विजेअभावी व इतर तांत्रिक अडचणींमुळे नाकीनऊ येत आहेत. पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाचे एकरी तीन क्विंटलपर्यंतच उत्पादन आल्याचे दिसत आहे.

कोरडवाहू कापूस फक्त एकरी ५० किलोच हाती येईल. त्यात गुलाबी बोंड अळी पडल्याने पिकाचे सिंचन करूनही उपयोग नाही. कारण बोंडेच उमलणार नाहीत. ६० एकरसाठी एकरी १५ ते १६ हजार रुपये खर्च झाला. पण हा खर्च हाती येईल की नाही, अशी स्थिती आहे. पशुधनासाठी चारा चिंचखेडा (ता.जामनेर) व इतर भागातून आणावा लागत आहे. तोदेखील महाग आहे.

Kolhapur Drought Condition
Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळाबाबत सरकार अनभिज्ञ

जानेवारीतच टंचाई असणार, पंचनामेच नाहीत

जून व ऑगस्टमध्ये दुष्काळी स्थिती किंवा उष्णता अधिक होती. या काळात पिकहानीचे पंचनामेच प्रशासनाने केले नाहीत. एक रुपयात पीकविमा योजनेतून कापसासाठी विमा संरक्षण घेतले. पण सरकार आम्हाला एक रुपयाही द्यायला तयार दिसत नाही. टंचाई स्थिती आतापासून तयार होत आहे. जानेवारीत जलसंकट वाढेल, असे महेंद्र वामन पाटील म्हणाले.

ठळक बाबी...

- गावात पाऊसमान बरे राहिल्यास पूर्वहंगामी कापसाची लागवड बऱ्यापैकी असते. परंतु यंदा पाऊस नसल्याने पुढे ही लागवड अपवादानेच किंवा २०० ते ३०० एकरांतच होईल.

- गावात चारा पिकांची पावसाअभावी वाताहत झाली. यामुळे चाऱ्याची समस्या आहे. नजीकच्या वाघूर धरण क्षेत्रातील गावांमधून दोन ते अडीच हजार रुपये प्रतिशेकडा या दरात चारा पशुपालकांना आणावा लागत आहे

- रब्बीची पेरणी गावात यंदा अपवादानेच दिसत आहे. मागील तीन वर्षे पाऊसमान चांगले होते. यामुळे किमान २०० ते २५० हेक्टरवर हरभरा, दादर ज्वारी, ज्वारी, मका पिके असायची. यंदा रब्बीची कुठलीही तयारी शिवारात दिसत नाही

- गावाच्या पूर्वेकडील चौधरी गट नाल्यानजीक विहिरींचे जलसाठे बऱ्यापैकी असल्याने सुमारे ४० ते ४५ एकर क्षेत्रातील कापूस पिकाची स्थिती बरी आहे

- गावाच्या पश्चिमेकडील वन विभागाच्या क्षेत्रातील विझोऱ्या नाल्यास यंदा प्रवाही पाणी काही दिवस होते. हा नाला कोरडाठाक आहे

- गावानजीकचा नेरी (ता. जामनेर) येथील बाजारही शांतच असतो. नेरीचा बाजार पशुधनासाठी प्रसिद्ध आहे. तेथे पशुधनाचे दर कमालीचे घसरले असून, ७० ते ८० हजाराच्या बैलजोड्या ४० ते ५० हजार रुपयात द्याव्या लागत आहेत

- नेरीच्या कापूस बाजारातही कापसाची आवक नाही, कारण हंगाम जेमतेम आहे

आकडे दृष्टीक्षेपात

लोकसंख्या - १९७०

एकूण क्षेत्र - १८३० हेक्टर

कापूस लागवड -१७०० हेक्टर

सरासरी पर्जन्यमान - ७८० मिलिमीटर

प्रत्यक्ष झालेला पाऊस - सुमारे ५५० मिलिमीटर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com