Bitter Gourd Disease : कारले पिकातील ‘डाऊनी मिल्ड्यू’

Downy Mildew : या रोगाला ओब्लिगेट जीव म्हणतात, कारण या रोगाचा प्रादुर्भाव फक्त जिवंत पेशींवर होतो, मृत पेशींवर होत नाही. या रोगामुळे कारले पिकाचे मोठे नुकसान होते. रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पानांवर होतो. प्रादुर्भावामुळे पाने खराब होतात, गळून पडतात.
Bitter Gourd Disease
Bitter Gourd Disease Agrowon

Downy Mildew of Bitter Gourd : कारले पिकातील लीफ ब्लाइट या रोगाची माहिती आपण मागील लेखामध्ये पाहिली. लीफ ब्लाइट या रोगाप्रमाणेच महत्त्वाचा रोग म्हणजे डाऊना मिल्ड्यू. या रोगाला ओब्लिगेट जीव म्हणतात, कारण या रोगाचा प्रादुर्भाव फक्त जिवंत पेशींवर होतो, मृत पेशींवर होत नाही. या रोगामुळे कारले पिकाचे मोठे नुकसान होते. रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पानांवर होतो. प्रादुर्भावामुळे पाने खराब होतात, गळून पडतात.

या रोगाचा नमुना आम्हाला पिंपळस (ता. निफाड, जि. नाशिक) येथून मिळाला होता. सूक्ष्मदर्शकाखाली नमुन्याची तपासणी केली असता सदर रोग हा डाऊनी मिल्ड्यू असल्याचे स्पष्ट झाले.

लक्षणे

प्रथम खालील जुन्या पानांवर कोनीय प्रकारचे डाग पडतात. नंतर डाग नवीन पानांवर देखील दिसू लागतात.

हे डाग दोन शिरांमध्ये मर्यादित असतात. बऱ्याच वेळा हे ठिपके चौकोनी आकाराचे दिसतात. असे ठिपके ही पिवळ्या रंगाचे असतात.

पाने जास्त वेळ ओली राहिली तर पानाच्या खालून हे डाग ओलसर दिसू लागतात. बऱ्याच वेळा असे ओलसर डाग हे जिवाणूजन्य रोगासारखे दिसतात. त्यामुळे या दोन रोगांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. नंतर हे ठिपके वाढत जाऊन पूर्ण पान वाळून जाते व गळून पडते. याचा परिणाम फळांच्या पोषणावर व संरक्षणावर होतो.

जेव्हा जास्त आर्द्रतायुक्त वातावरण असते, त्या वेळी पानाच्या पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या पावडरसारखी वाढ झालेली दिसून येते.

Bitter Gourd Disease
Bitter Gourd Disease : कारले पिकातील ‘लीफ ब्लाइट’

डाऊनी मिल्ड्यू रोगाची माहिती

हा रोग बुरशीसारख्या शेवाळीय जिवांच्या प्रादुर्भावामुळे होतो. त्यामुळे बरेच शेतकरी याला ‘बुरशीजन्य रोग’ समजतात.

हा रोग निर्माण करणाऱ्या जिवाचे शास्त्रीय नाव : स्युडोपेरोनोस्पोरा कुबेन्सीस (Pseudoperonospora cubensis) असे आहे.

आढळ : हा रोग देशातील सर्व कारले लागवड होणाऱ्या राज्यांमध्ये आढळून येतो. यात महाराष्ट्र, राजस्थान, बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम यांचा समावेश प्रामुख्याने होतो.

नुकसान : ५० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान करण्याची क्षमता.

अन्य यजमान पिके : काकडी, गिलके, टरबूज इत्यादी काकडीवर्गीय पिके.

अनुकूल हवामान

या रोगाचे बीजाणू काकडीवर्गीय पिकांवर जिवंत राहतात. खूप जास्त अंतरावरून देखील रोगाचे बीजाणू वाऱ्यामार्फत रोगाचा प्रादुर्भाव करू शकतात.

दमट तापमान १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान ते धुके असलेल्या वातावरणात रोगाची लागण होते. पाने ओली राहिल्यास लागण जास्त लवकर होते.

तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आणि ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास रोगाचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही.

Bitter Gourd Disease
Onion Disease : कांदा पिकातील ‘बेसल रॉट’

नियंत्रणाचे उपाय

लागवडीवेळी दोन ओळींतील अंतर जास्त ठेवावे.

शेतामध्ये हवा खेळती असावी. जेणेकरून रोगाचे ‘इनोकुलम’ जास्त प्रमाणात शेतात राहणार नाही. तसेच पाने ओली राहणार नाहीत.

पीक फेरपालट करावी. कारले पिकानंतर किंवा त्याआधी काकडीवर्गीय पीक घेऊ नये. जसे की गिलके, काकडी, टरबूज, खरबूज, भोपळा.

शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

शिफारस केलेल्या खालीलपैकी बुरशीनाशकांचा सल्ल्याने वापर करावा.

मेटीराम (५५ टक्के) अधिक पायरॅक्लोस्ट्रोबीन (५ टक्के डब्ल्यूजी).

मॅन्डीप्रोपॅमिड (२३.४ टक्के एससी)

झायनेब (७५ टक्के डब्ल्यूपी)

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे वेगवेगळे भाग अतिशय स्पष्टपणे पाहू शकतो. यामध्ये रोगाचे तंतू (Filament) लांब धाग्याप्रमाणे दिसून येतात. या तंतूवर फांद्या प्रमाणे बीजाणू कोषदंड (Sporangiophore) तयार होतात. या कोषंडावर गोलाकार बीजाणू धानी (sporangium) तयार होतात. या बीजाणू धानीमध्ये बीजाणू (Spore) असतात. हे बीजाणू रोग निर्मितीस कारणीभूत असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com