Orange Export : संत्रा उत्पादकांना दुहेरी फटका| कृषी आणि ग्रामीण विकासासाठी परिषदेची स्थापना? | शेतीच्या बातम्या

विदर्भातील नागपूर, अमरावती भागात संत्र्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. पण सध्या उष्णतेच्या झळासोबत केंद्र सरकारच्या धोरण लकव्याचा फटका संत्रा उत्पादकांना बसतोय.
Orange
Orange Agrowon

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी

सध्या गरम उन्हाच्या झळा विदर्भातील शेतकऱ्यांची परीक्षा घेतायत. विदर्भातील नागपूर, अमरावती भागात संत्र्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. पण सध्या उष्णतेच्या झळासोबत केंद्र सरकारच्या धोरण लकव्याचा फटका संत्रा उत्पादकांना बसतोय. गेल्यावर्षी एप्रिल मे दरम्यान दरदिवशी ६ हजार टन संत्र्यांची बांगलादेशला निर्यात केली जात होती. मात्र बांगलादेशनं नोव्हेंबर २०२३ मध्ये संत्र्यावरील आयात शुल्क ८८ रुपये प्रतिकिलो केल्यामुळं निर्यात मंदावली.

संत्र्याचे दर दबावात आले. त्यामुळे सध्या दिवसाला फक्त १०० टन संत्र्याची निर्यात करत असल्याचं महाऑरेंजचे कार्यकारी संचालक मनोज जवंजाळ यांनी सांगितलं. डिसेंबर महिन्यात लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी बांगलादेशने आयातशुल्क वाढवल्यामुळं संत्र्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याची कबुली दिली होती. तर राज्य सरकारनं संत्रा निर्यातीवर अनुदान देण्याची घोषणा केली खरी पण त्यातही अटीशर्थीचा खोडा घातला. त्यामुळे अनुदानाचा शेतकऱ्यांना फायदा मिळाला नाही.

Orange
Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

कृषी आणि ग्रामीण विकासासाठी परिषदेची स्थापना? 

केंद्र सरकार एक राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण परिवर्तन परिषद स्थापन करण्याची योजना आखतंय. या परिषदेतून कृषी आणि ग्रामीण भागातील विकास कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे सदस्य असतील. वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या धर्तीवर या परिषदेची स्थापना करण्यात येईल, अशीही चर्चा आहे.  

कृषी सचिव मंजो आहुजा यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक झाली. या बैठकीत ग्रामीण विकास. सहकार आणि पंचायत राज मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते. नव्यानं सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम निश्चित करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय नियोजन आहे. त्यामध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण परिवर्तन परिषदेची स्थापन करण्याची योजना आखण्यात आली आहे. 

शेती कामांसाठी इलेक्ट्रिक उपकरणे 

शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी ई अस्त्रा एनएसीओएफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडनं ई-वीडर, ई-रीपर, ई-ब्रश कटर आणि ई-कार्गो मल्टी-युटिलिटी थ्री व्हीलर या उपकरणांची निर्मिती केली आहे. एनएसीओएफही एक खाजगी कंपनी आहे. देशातील शेतकऱ्यांना किफायतशीर दरात तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक व्हीकलचा वापर करता यावा, यासाठी इलेक्ट्रिक उपकरणांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहनं देऊन त्यांच्या समस्या कमी होतील, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणाची निर्मिती केली जात असल्याचं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश बाबू पी यांनी सांगितलं.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com