Linguistic Development: मराठी भाषेकडे दुर्लक्ष नको

Educational Success: उत्तम भाषिक विकास झालेले विद्यार्थी शैक्षणिक यश संपादन करतात तर शैक्षणिक अपयश हे मूलतः भाषिक अपयश आहे, असे म्हटले जाते. यादृष्टीने शिक्षणाच्या प्रारंभिक अवस्थेत स्व-भाषा म्हणजेच मराठी भाषा शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
Marathi Language
Marathi LanguageAgrowon
Published on
Updated on

शिवाजी काकडे

Marathi Language Learning: एक गरीब पण होतकरू तरुण रोजगार मिळविण्यासाठी शहरात जातो. चार-पाच वर्षे शहरात राहून तो काबाडकष्ट करून भरपूर पैसे कमवतो. आता आपण गावाकडे जाऊन थोडीफार शेती विकत घेऊ, घर बांधू, असा विचार करून तो गावाकडे जायला निघतो. सोबत आपल्या सामानाची पिशवी, पैसे घेऊन तो पायी प्रवासाला सुरुवात करतो. वाटेत त्याला एक चोर भेटतो. चोरी करण्याच्या उद्देशाने तो त्या तरुणाशी मैत्री करतो. तुझ्या गावाकडेच मलाही जायचे आहे असे चोर त्याला सांगतो.

दोघेजण सोबत प्रवासाला निघतात. तो तरुण आपली सर्व माहिती चोराला सांगतो. चोराला पक्की खात्री होते याच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि आपण आता चोरी करणार. रात्री दोघेही एका धर्मशाळेत मुक्कामाला थांबतात. दोघेही जेवायला बाहेर जातात. चोर पटकन जेवण आटोपून त्या तरुणाच्या खोलीत येऊन त्याच्या सामानाची आणि संपूर्ण खोलीची झाडाझडती घेतो. मात्र त्याला पैसे सापडत नाहीत.

सकाळी तो तरुण आंघोळीला गेल्यावर देखील तो अशीच झाडाझडती घेतो. तरीही चोराला पैसे सापडत नाहीत. असाच दिनक्रम आठ दिवस चालतो. आता त्या तरुणाचे गाव जवळ आले होते. सहवासाने तरुणाची आणि चोराची चांगलीच मैत्री झाली होती. चोर शेवटी त्या तरुणाला म्हणतो, ‘‘मित्रा मला एक गोष्ट कबूल करायची आहे, मी चोर आहे आणि चोरी करण्याच्या उद्देशाने तुझ्यासोबत आलो होतो. तू म्हणाला होतास मी भरपूर पैसे कमवून घरी चाललो, पण तुझ्याकडे खरंच पैसे आहेत का?’’ तो तरुण म्हणतो, ‘‘हो आता सध्या माझ्याकडे पैसे आहेत.

Marathi Language
Marathi Language : आता सर्वठायी वाचा, बोला, लिहा मराठी

तु चोर असणार अशी शंका मला आली होती म्हणून मी जेवायला जाताना, अंघोळीला जाताना माझे पैसे तुझ्या अंथरुणाच्या उशीखाली ठेवून जायचो. मला माहिती होते तु माझ्या पैशाचा शोध माझ्या खोलीत, माझ्या सामानाची झाडाझडती घेऊन करशील. पण तू स्वतःच्या उशाखाली ते कधीच शोधणार नाही. त्यामुळे माझे पैसे सुरक्षित राहीले. तुला आयुष्यात काही करायचे असेल तर स्वतःकडे लक्ष द्यायला शिक.’’ अशाच प्रकारे आजच्या शिक्षणव्यवस्थेत जगाचे ज्ञान मिळवताना स्व विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.

‘स्व’ भाषेकडे दुर्लक्ष

नुकतेच महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याची घोषणा केली . प्रचंड विरोधानंतर अनिवार्य शब्दाला स्थगिती देत असल्याची घोषणाही करण्यात आली. हिंदीला भाषा म्हणून विरोध असण्याचे कारणच नाही. मात्र, लहान मुलांवर आपण अभ्यासाचे किती ओझे लादणार हा खरा प्रश्न आहे. ज्या मुलांची मातृभाषा मराठी आहे आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात त्या शाळांतील मराठीची भाषिक कौशल्ये मुलांना पुरेशी आत्मसात नाहीत, असे विविध सर्वेक्षणातून समोर येते.

नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण (NAS 2021) या अहवालात इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेच्या क्षमतेबाबत काही निरीक्षणे नोंदविली आहेत. सर्वेक्षणाप्रमाणे सर्वसाधारणपेक्षा कमी व मूलभूत स्तरावरील विद्यार्थ्यांची संख्या अधिक दिसून येते. अपेक्षित क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा क्षमता प्राप्त न केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा - २००५ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० हे अधोरेखित करतात की, सध्या प्राथमिक स्तरावरील अंदाजे पाच कोटीहून अधिक विद्यार्थांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त केलेले नाही.

यावरून मराठी भाषा शिक्षणाबाबत अधिक कार्य करण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित होते. स्व-भाषा शिक्षणाची अशी दुर्दशा असताना आणखी एक भाषा वाढवून काय साध्य होणार आहे? भाषा शिक्षण हा बालशिक्षणाचा प्राण असतो. भाषा हेच जगण्याचे, विचार करण्याचे, स्वतःला व्यक्त करण्याचे आणि ज्ञानार्जनाचे माध्यम असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने मातृभाषेतील शिक्षणाचा पुरस्कार केला आहे.

Marathi Language
Marathi Medium Education: शिक्षणाची दीपस्तंभ – स्पृहा इंदू!

मराठी भाषा शिक्षणाचा दर्जा सुधारल्याशिवाय शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार नाही. मराठीत लिहिलेले वाचता येत नाही, बोललेले समजत नाही, ऐकलेले लिहिता येत नाही, अशा विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पायाच डळमळीत होऊन जातो. शिक्षण ही जग समजून घेण्याची, स्वतःला अर्थपूर्ण रीतीने अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया असेल तर मराठी भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शैक्षणिक यशापयशातही भाषा महत्त्वाची असते.

''स्व'' शोध म्हणजे शिक्षण

हिंदी विषय अनिवार्य करताना दोन गोष्टींचा तर्क देण्यात आला. एक म्हणजे लहान मुले अधिक भाषा शिकण्यासाठी ग्रहणशील असतात आणि दुसरा म्हणजे बहुभाषिकतेमुळे रोजगाराच्या संधी मिळतील. लहान मुले अधिक ग्रहणशील असतात ही गोष्ट खरी असली तरी त्या ग्रहणशीलतेचा उपयोग केवळ अधिकची भाषा शिकण्यासाठीच करायचा का? याच वयात मुले संस्कारशीलही असतात. स्वभाषेतून, अनुभवातून, कृतीतून त्यांच्यावर उत्तम संस्कार करणेही आवश्यक आहे. नीती, मूल्य, तत्त्वे यांचेही शिक्षण देणे आवश्यक आहे. शहरातील नामांकित बोर्डांच्या समजल्या जाणाऱ्या शाळेतील अनेक कोवळे विद्यार्थी व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत. याचा दोष मुलांना द्यायचा की या पापाची जबाबदारी पालक आणि व्यवस्थेने स्वीकारायची हे पाहण्याची वेळ आता आली आहे.

मुलांना तणावमुक्त आणि आनंददायी शिक्षण देण्याची गरज आहे. खेळ, कृती, अनुभव, जिज्ञासा आधारीत अभ्यासक्रम आखून आशय कमी करण्याची गरज आहे. मुलांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, कलात्मक विकास करणारे शिक्षण प्रारंभिक अवस्थेत मिळावे. यातून सहृदयी नागरीक निर्माण होईल. मुलांचे मन ताजेतवाने, निष्पाप आणि तणावमुक्त असेल तर मुले संवेदनशील, सर्जनशील होतात. खूप भाषा शिकणे अथवा खूप माहिती मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. स्व चा शोध घ्यायला शिकवते ते शिक्षण.

शिक्षण म्हणजे व्यक्तींमधील उत्तम अंतस्थ शक्तीचे प्रकटन करणे होय. आत्मिक गुणांचा विकास होऊन आत्मजागृती, आत्मभान येणे म्हणजे खरे शिक्षण होय. स्वतःचे ज्ञान असणे, कृतीचे, विचारांचे आणि भावनांचे भान असणे म्हणजे शिक्षण होय. स्वतःला जाणणे ही अलौकिक सर्जनाची सुरुवात असते. आणि ती बालपणी झाल्यास मुलांची प्रज्ञा विकसित होते. मुलांवर लहानपणीच अभ्यासाचे ओझे टाकल्यास मुले संवेदनशील आणि सर्जनशील प्रजेची होणार नाहीत. पहिलीपासून हिंदी शिकवून दुसऱ्याचा घराचा शोध घेतल्यापेक्षा स्व-भाषेतून'स्व' विकास करणारे शिक्षणच जीवनविकासाकडे घेऊन जाईन याचे भान व्यवस्थेने ठेवावे.

७८८७५४५५५७

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com