Agrowon Anniversary 2024 : हवामान बदलाची भीती नको; चिंता करा

Climate Change Conference : ‘हवामान बदलामुळे होत असलेल्या स्थित्यंतराची भीती न बाळगता चिंता करायला हवी. शेती व्यवस्थेमधील जुन्या व नव्या पद्धतीची सांगड घालत या समस्येला हिमतीने तोंड द्यावे लागेल,’’ असे प्रतिपादन भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी शनिवारी (ता.२०) येथे केले.
Agrowon Anniversary 2024
Agrowon Anniversary 2024Agrowon

Pune News : ‘‘हवामान बदलामुळे होत असलेल्या स्थित्यंतराची भीती न बाळगता चिंता करायला हवी. शेती व्यवस्थेमधील जुन्या व नव्या पद्धतीची सांगड घालत या समस्येला हिमतीने तोंड द्यावे लागेल,’’ असे प्रतिपादन भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी शनिवारी (ता.२०) येथे केले.

‘सकाळ अॅग्रोवन’चा एकोणिसावा वर्धापन दिन राज्यभर उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या शिरनामे सभागृहात आयोजित हवामान बदल परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. केळकर बोलत होते. ‘अॅग्रोवन’ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या परिषदेत कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण व्यासपीठावर होते. राज्याच्या सात खोऱ्यांतील मुख्य नद्यांचे पाणी असलेल्या सरिताकलशाचे पूजन करून परिषदेचे उदघाटन करण्यात आले.

‘नव्या, जुन्या शास्त्राची सांगड घाला’

डॉ. केळकर म्हणाले, ‘‘शेतकरी श्रम पेरतात आणि अन्नाची कापणी करतात. त्यामुळे शेतकरी अन्नदाता असल्याचे विसरू नये. शेतकरी वर्ग पेरणी ते कापणीपर्यंतच्या समस्यांची उत्तरे हवामानात शोधतो. पारंपरिक ज्ञान व पद्धतीच्या आधारे प्रतिकूल हवामान स्थितीशी आपला शेतकरी झुंजत आलेला आहे.

चक्रीवादळे, महापूर, दुष्काळ, ढगफुटी यापुढेही होत राहतील. आपत्तीची भीती न बाळगता आपल्याला उपायांबाबत चिंता करावी लागेल. कारण, शेतीला कधीही १०० टक्के अनुकूल हवामान लाभलेले नव्हते. मॉन्सून कधीही आदर्श नव्हता. तरीही भूतकाळात या संकटांशी आपण यशस्वीपणे लढत आलो आहोत. आपली पारंपरिक विद्वता, जुनी बुद्धिमत्ता आणि आताची कृत्रिम बुद्धिमत्ता याची सांगड घालायला हवी. त्यासाठी संशोधन व्हावे.’’

Agrowon Anniversary 2024
Fight for Climate Changes : सारे जग सरसावले हवामान बदलाशी लढायला

‘...तर मानवजात नष्ट होईल’

कुलगुरू डॉ. पाटील यांनी, हवामान बदलास मानवी हस्तक्षेप कारणीभूत ठरल्याचे ठासून सांगितले. ते म्हणाले, ‘‘दुबईत तीन वर्षांचा एकूण पाऊस आठ तासांत कोसळला. ही घटना म्हणजे हवामान बदल समस्येने भविष्याबाबत दिलेला इशारा आहे. त्यामुळे आता एकत्र येत गांभीर्याने उपाय न केल्यास मानवजातच नष्ट होईल.

भविष्यात नैसर्गिक संकटे वाढतील. त्यातून शेती धोक्यात येईल. दुसऱ्या बाजूला लोकसंख्या वाढेल आणि अन्नधान्याला मागणीही वाढेल. त्यामुळे हवामान बदलाचे सर्वांत मोठे आव्हान कृषी शास्त्रज्ञांसमोर आहे. अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणे, हवामान बदलाला अनुकूल वाणांचा शोध घेणे, पौष्टिक भरडधान्याचे उत्पादन वाढविणे हे उपाय आपल्या हाती आहेत.’’

‘जगाला तारेल कृत्रिम बुद्धिमत्ता

‘‘हवामान बदलाने संकटात आलेल्या जगाला केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तारेल,’’ असे आग्रही मत ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी मांडले. ‘‘हवामान बदलामुळे शेतीसमोर येणाऱ्या संकटाची चाहूल सकाळ माध्यम समूहाने ओळखली.

त्यामुळेच आम्ही अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचा प्रकल्प बारामतीमध्ये राबविण्यास सुरुवात केली आहे. यात सरकारी सहभागाची वाट न बघता आम्ही पहिल्या टप्प्यात दहा हजार शेतकऱ्यांपर्यंत हा प्रयोग नेत आहोत. तेथून पुढे देशात नव्हे; तर जगभरातील शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता विस्तारेल,’’ असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

Agrowon Anniversary 2024
Agrowon Anniversary 2024 : ‘ॲग्रोवन वर्धापन दिना’निमित्त पुण्यात हवामान बदल परिषद

‘अॅग्रोवन’ने आणली घराघरांत समृद्धी

संपादक संचालक श्री. चव्हाण यांनी ‘ॲग्रोवन’च्या एकोणीस वर्षीय वाटचालीचा ओघवता आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘देशाच्या मुद्रित माध्यमात शेती व ग्रामविकास विषय दुर्लक्षित होते. मात्र त्यात दिमाखदार कामगिरी ‘अॅग्रोवन’ने केली आहे. ‘अॅग्रोवन’मुळे राज्यातील शेतकरी वाचकांच्या घरात समृद्धी नांदते आहे. दैनिकातील उपयुक्त माहितीमुळे हजारो शेतकरी प्रयोगशील झाले व कर्जमुक्त झाले. पाच शेतकऱ्यांनी आपल्या नव्या घरांना ‘अॅग्रोवन’चे नाव दिले आहे. ‘अॅग्रोवन’ परिवाराने केलेल्या अद्वितीय कार्याची यापेक्षा वेगळी पावती असूच शकत नाही.’’

या परिषदेला कृषी, ग्रामविकास तसेच कृषी संलग्न क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. परिषदेत पहिल्या दोन चर्चासत्रात ‘हवामान बदलाचे वर्तमान व भवितव्य’ तसेच ‘हवामान बदलामुळे शेती आणि पशूंवरील परिणाम’ या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे, ‘यशदा’तील जलसाक्षरता केंद्राचे समन्वयक डॉ. सुमंत पांडे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर व अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. रवींद्र बनसोड,

‘माफसू’चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने आणि तिसऱ्या गटचर्चेत हवामान अनुकूल शेतीचे प्रारूप या विषयावरील चर्चेत महाधन अॅग्रीटेक लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश देशमुख, बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कृत्रिम बुद्धीमत्ता विभागाचे प्रमुख तुषार जाधव आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार सहभागी झाले होते. प्रा. धीरज कणखरे व ‘अॅग्रोवन’चे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

‘अॅग्रोवन’वर शुभेच्छांचा वर्षाव

वर्धापन दिनानिमित्ताने हवामान बदल परिषदेत सर्व वक्त्यांनी ‘अॅग्रोवन’चे मुक्तकंठाने कौतुक केले. राज्याच्या विविध भागात ‘अॅग्रोवन’कडून चर्चासत्रे घेण्यात आली. या चर्चासत्रांमध्येही शेतकऱ्यांनी लाडक्या ‘अॅग्रोवन’ला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कृषी व संलग्न क्षेत्रातील संस्था, निविष्ठा कंपन्यांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ तसेच ग्रामविकासातील संस्था, सरपंचांपासून ते कृषिमंत्र्यांपर्यंत मान्यवर लोकप्रतिनिधींनीही ‘अॅग्रोवन’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

‘स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांना आवरा’

‘‘सध्या कोणीही उठतो आणि हवामानाचा अंदाज सांगतो. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अभ्यास नसतानाही चुकीची भाकिते करणाऱ्या स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांना आवरायला हवे. त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाही. अशी चुकीची माहिती देणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद हवी,’’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी परिषदेत मांडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com