
Bhayandar Nwes : इंग्रजांच्या काळापासून मुंबईतील मरोळ येथे सुक्या मासळीचा बाजार भरतो. येथे मुंबईतील ठरावीक भागातील १५० महिला विक्रेत्यांनाच व्यवसायासाठी परवाना (पिच लायसन्स) देण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा महिला विक्रेत्यांनी केला आहे. त्यामुळे या निर्णयावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
या बाजारात निवडक महिलांना परवाना देण्यात येणार असल्याने डहाणू ते अलिबागपर्यंतच्या अन्य मासळीविक्रेत्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे हा वाद लवकरच मत्स्यव्यवसाय मंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहे.
मरोळ मासळी बाजारात इंग्रजांच्या काळापासून सुक्या मासळीचा बाजार गुरुवार ते शनिवारपर्यंत भरतो. त्याला आठवडी बाजार म्हटले जाते. रविवारीसुद्धा देशभरातील सुक्या मासळीचे व्यापारी मालाची चढउतार या ठिकाणी करतात.
या मासळी बाजारात डहाणू ते अलिबागपर्यंतच्या एक हजाराहून अधिक महिला आपल्या सोयीनुसार आठवडा बाजारात सुक्या मासळीची विक्री करण्यासाठी येतात. दररोज सुमारे एक कोटींची उलाढाल या बाजारात होत असते.
भाईंदरजवळील उत्तनमधूनसुद्धा ५०० च्या आसपास मच्छीमार महिला या बाजारात जातात. असे असताना मुंबईतीलच १५० महिला विक्रेत्यांना या बाजारात व्यवसाय करण्यासाठी परवाना देण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा महिला विक्रेत्यांनी केला आहे. त्याला मरोळ बाजार मासळीविक्रेत्या महिला संघटनेचा तीव्र विरोध आहेच, शिवाय डहाणू ते अलिबागपर्यंत या विरोधाची कक्षा वाढू लागली असून, आता
गुजरातमधील मासेमार समाजही महापालिकेच्या धोरणाविरुद्ध संघर्षाच्या पावित्र्यात आहे. ठरावीक महिलांनाच परवाना देण्यात आले, तर अन्य महिलांना त्या ठिकाणी सुकी मासळी विकायला मज्जाव होईल, काही ठरावीक लोकांचीच त्या ठिकाणी मक्तेदारी निर्माण होईल, असे मासळीविक्रेत्या महिलांचे म्हणणे आहे.
त्यामुळे सर्व महिलांना व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी कोणालाही परवाना नकोच, अशी सुकी मासळीविक्रेत्या महिलांची भूमिका आहे. मच्छीमार महिलांमध्ये आपसातच तेढ होऊ नये, यासाठी त्यांनी आपली ओळख उघड करण्यास नकार दिला.
गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न
मरोळ बाजाराच्या सुयोग्य वापरासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळातर्फे या मरोळ बाजाराचा आहे, त्याच प्रयोजनासाठी विकास करण्यात येणार आहे. तथापि काही विकसकधार्जिणे लोक वेगवेगळ्या अफवा पसरवून मच्छीमार समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही या महिलांनी केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.