Crop Insurance Compensation : पीकविमा भरपाई केंद्राच्या निकष बदलामुळे वादात

Agricultural Update : केंद्र सरकारने ८ मार्च आणि ३० एप्रिल २०२४ ला दोन परिपत्रके काढून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत पीक विम्याची भरपाई देण्याचे निकष बदलेले आहे. या बदलेल्या निकषामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Agriculture Insurance Update : राज्यात अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीकविम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत नुकसान भरपाई मिळते. म्हणजेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर लागू होतो. पण केंद्र सरकारने ८ मार्च आणि ३० एप्रिल २०२४ ला दोन परिपत्रके काढून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत पीक विम्याची भरपाई देण्याचे निकष बदलेले आहे. या बदलेल्या निकषामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे. मग केंद्र सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत भरपाई देण्याच्या निकषात नेमका काय बदल केला आणि शेतकऱ्यांना याचा कसा फटका बसत आहे? याचा केलेला उलगडा....

पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यात पीक नुकसान झाल्यानंतर वेगवेगळ्या ट्रिगरअंतर्गत भरपाई मिळत असते.

१) पाऊस झाला नाही आणि पेरणीच झाली नाही तर पेरणी न होणे या ट्रिगरअंतर्गत भरपाई मिळते.

२) पावसात मोठा खंड पडला आणि उत्पादन सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त कमी होण्याचा नजर अंदाज असेल तर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरअंतर्गत अग्रिम भरपाई मिळते.

३) स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत पीक वाढीच्या काळात शेतकऱ्याचे विमा संरक्षित क्षेत्र पाण्यामुळे जलमय झाले, भूस्खलनामुळे नुकसान झाले, ढगफूटी झाली किंवा वीज कोसळून आग लागून नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळते.

४) पीक काढून वाळवण्यासाठी शेतात ठेवल्यानंतर पिकाचे नुकसान झाल्यानंतर काढणी पश्‍चात नुकसान या ट्रिगरअंतर्गत भरपाई दिली जाते.

५) शेवटी पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळते. ज्यात त्या मंडळातील उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्यानुसार भरपाई मिळते.

सध्या पिकांचे जे नुकसान होत आहे, त्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत नुकसान भरपाई देण्याचा नियम आहे. पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरले किंवा शेतात दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाले तर हा ट्रिगर लागू होता म्हणजेच नुकसान भरपाई मिळते. थोडक्यात काय सध्याच्या पावसाने शेतात साचून किंवा पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तरच भरपाई मिळेल. त्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना ७२ तासांच्या आत द्यावी. तसेच दोन आपत्तींमधील अंतराळ ७२ तासांचा असेल तरच दोन वेगवेगळ्या घटना समजल्या जातील. जर दोन घटनांमधील अंतराळ म्हणजेच अंतर ७२ तास नसेल तर ती एकच घटना समजली जाईल. शेतकऱ्यांनी पूर्वसूचना देताना हा मुद्दाही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगअंतर्गत पंचनामे करण्याचा निकष ३० एप्रिल रोजी बदलला. तसेच नुकसान भरपाई देण्याचा निकष ८ मार्च २०२४ रोजी बदलला. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कमी मिळणार आहे. पहिला बदल म्हणजे पंचनामे करण्याची पद्धती बदलली. दुसरा बदल म्हणजे वाइड स्प्रेड नुकसान झाल्यानंतर २५ टक्के भरपाई लगेच मिळेल आणि उरलेली भरपाई पीक कापणी प्रयोगानंतर देय असेल तर मिळेल.

Crop Damage
Crop Insurance : अमरावतीत विमा भरपाईतील दिरंगाईवरून शेतकरी संतप्त

पंचनाम्याचा नवा निकष आणि ‘वाइड स्प्रेड’ नुकसान :

जुन्या निकषानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत नुकसान झाले आणि शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक नुकसानीचे पंचनामे केले जात होते. या पंचनाम्यातून देय असलेली सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात होती. पण सरकारने ३० एप्रिल रोजी एक परिपत्रक काढून पंचनामे करण्याच्या निकषात बदल केला. आता नव्या निकषानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत पीक नुकसानीच्या पूर्वसूचना त्या मंडळातील एकूण विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी

असतील तरच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे केले जाणार आहेत. म्हणजेच जुन्या पद्धतीने पंचनामे होणार आहेत.

पण जर त्या मंडळातील एकूण विमा संरक्षित क्षेत्रापैकी २५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाल्याच्या पूर्वसूचना प्राप्त झाल्या तर ते नुकसान ‘वाइड स्प्रेड’मध्ये म्हणजेच सर्वव्यापी समजले जाईल. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे होणार नाहीत. तर रॅंडम सर्व्हे केले जाईल. त्या मंडळात ३० टक्के पंचनामे रॅंडम पद्धतीने केले जातील आणि भरपाई निश्‍चित केली जाईल. त्यामुळे मंडळातील काही शेतकऱ्यांचे नुकसान जास्त असले तरी रॅंडम सर्व्हेतून आलेल्या भरपाईप्रमाणे त्या शेतकऱ्यांनाही भरपाई मिळेल. म्हणजेच जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई मिळेल. अर्थात, शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे.

नुकसान भरपाईच्या निकषात घोळ :

सरकारने केवळ पंचनाम्याचा निकष बदलला नाही तर भरपाई देण्याचा निकषही बदलला. त्यासाठीचे परिपत्रक ८ मार्च २०२४ रोजी काढले होते. सरकारने हे निकष बदलल्याने नेमकी काय प्रक्रिया आहे आणि किती भरपाई मिळणार याचा थांगपत्ता लागत नाही.

अ) जुन्या निकषाप्रमाणे भरपाई :

जुन्या निकषाप्रमाणे स्थानिक नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना म्हणजेच तक्रारी दिल्यानंतर पूर्वसूचना दिलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वैयक्तिक पातळीवर केले जायचे. तसेच पीक वाढीच्या कोणत्या टप्प्यात किती नुकसान झाले त्याप्रमाणे शेतकऱ्याला भरपाई मिळायची.

जुन्या निकषात पीकवाढीच्या टप्प्यानुसार नुकसानभरपाई

पीकवाढीचा टप्पा…भरपाईची टक्केवारी

पेरणी..४५ टक्के

वाढीची अवस्था…६० टक्के

फुलोरा अवस्था…७५ टक्के

पक्वता अवस्था…८५ टक्के

काढणी अवस्था…१०० टक्के

जुन्या नियमात १०० टक्के नुकसान झाल्यास

जुन्या निकषात पीकवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यात १०० टक्के नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना किती भरपाई मिळायची ते पाहू.

जर समजा सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आणि संरक्षित रक्कम ५० हजार असेल तर जुन्या निकषानुसार पुढीलप्रमाणे भरपाई मिळायची.

पीकवाढीचा टप्पा…भरपाईची टक्केवारी

पेरणी..४५ टक्के…२२,५०० रुपये

वाढीची अवस्था…६० टक्के…३०,००० रुपये

फुलोरा अवस्था…७५ टक्के…३७,५०० रुपये

पक्वता अवस्था…८५ टक्के…४२,५०० रुपये

काढणी अवस्था…१०० टक्के…५०,००० रुपये

म्हणजेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगर अंतर्गतजुन्या निकषानुसार पीक वाढीच्या कोणत्या टप्प्यात आणि किती नुकसान होते, यानुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळायची. नुकसानीप्रमाणे आलेली पूर्ण भरपाई शेतकऱ्यांना मिळत असे.

Crop Damage
Agriculture Crop Insurance : नांदेडला पीकविमा योजनेत ११.१५ लाख अर्ज दाखल

ब) नव्या निकषाप्रमाणे भरपाई

सरकारने ८ मार्च २०२४ रोजी परिपत्रक काढून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत देण्यात येणाऱ्या भरपाईचा निकषही बदलला. जुन्या निकषाप्रमाणे पीक वाढीच्या कोणत्या टप्प्यात किती नुकसान झाले त्यानुसार नुकसान भरपाई मिळत होती. म्हणजेच पीकवाढीच्या कोणत्या टप्प्यात आहे? हे महत्त्वाचे होते. पण सरकारने बदलेल्या निकषानुसार आता पिकाचे नुकसान वाढीच्या कोणत्याही टप्प्यात झाले तरी संपूर्ण विमा संरक्षित रक्कम गृहीत धरून झालेल्या नुकसानीप्रमाणे त्या शेतकऱ्याला भरपाई दिली जाणार आहे.

उदा. पिकाची नुकतीच पेरणी केली असेल, वाढीची अवस्था असेल, पीक फुलोऱ्यात असेल किंवा काढणीची अवस्था असेल या कोणत्याही अवस्थेत पिकाचे किती टक्के नुकसान झाले, त्यानुसार शेतकऱ्याला भरपाई मिळणार आहे. म्हणजेच जुन्या निकषाप्रमाणे पीकवाढीच्या टप्प्यानुसार भरपाई कमी जास्त मिळणार नाही. आता पिकाचे कोणत्याही टप्प्यात जर ५० टक्के नुकसान झाले आणि विमा संरक्षित रक्कम ५० हजार असेल, तर विमा संरक्षित रकमेच्या ५० टक्के म्हणजेच २५ हजार रुपये भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. तसेच १०० टक्के नुकसान झाले तर विमा संरक्षित संपूर्ण रक्कम मिळेल.

नुकसान भरपाईवरून वाद

शेतकऱ्यांना पिकाच्या कोणत्याही टप्प्यात नुकसान झाल्यानंतर संपूर्ण विमा संरक्षित रक्कम गृहीत धरून भरपाई दिली जाईल, हा बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचा दिसत असला तरी सरकारने एक मेख मारून ठेवली. सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत नुकसान भरपाई देताना आणखी एक मेख मारून ठेवली. जर मंडळातील विमा संरक्षित क्षेत्रापैकी २५ टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्रावर नुकसानीच्या पूर्वसूचना आल्या असतील तर शेतकऱ्यांचे वैयक्तिक पंचनामे करून त्या शेतकऱ्याला नुकसानीप्रमाणे आलेली भरपाई दिली जाईल. म्हणजेच जर शेतकऱ्याचे ५० टक्के नुकसान असेल आणि ५० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असेल तर त्या शेतकऱ्याला लगेच २५ हजार रुपये मिळतील.

पण जर त्या मंडळातील पिकाचे नुकसान हे विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर ते वाइड स्प्रेड म्हणजेच सर्वव्यापी समजले जाईल. वाइड स्प्रेड'मध्ये ३० टक्के रॅंडम पंचनामे केले जातील. पण आलेली सर्व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लगेच मिळणार नाही. तर केंद्र सरकारने बदललेल्या नव्या निकषानुसार देय असलेल्या एकूण भरपाईपैकी केवळ २५ टक्के भरपाई लगेच दिली जाईल. उरलेली ७५ टक्के रक्कम पीक कापणी प्रयोगानंतर देय असेल तरच दिली जाईल. म्हणजेच पीक कापणी प्रयोगातून ७५ टक्क्यांपेक्षा कमी रक्कम आली तर आलेली रक्कमच दिली जाईल. म्हणजेच शेवटी ७५ टक्केच रक्कम मिळेल, असे नाही. जर पीक कापणी प्रयोगाअंती नुकसान भरपाई देय झाली नाही तर शेवटी काहीच मिळणार नाही.

शेतकऱ्यांना कमी भरपाई :

‘वाइड स्प्रेड'मध्ये नुकसान झाल्यानंतर जर त्या मंडळातील काही शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले तरी त्यांना रॅंडम सर्व्हेनुसार जी रक्कम येईल त्यानुसार भरपाई मिळणार आहे. तसेच सर्व रक्कम लगेच मिळणार नाही आणि उरलेली रक्कम पीक कापणी प्रयोगांती पूर्ण मिळेलच असे नाही. समजा एखाद्या मंडळात काही शेतकऱ्यांचे ५० टक्के नुकसान झाले आणि विमा संरक्षित रक्कम ५० हजार आहे. मात्र वाइड स्प्रेड'मध्ये रॅंडम सर्व्हेमध्ये नुकसान ३० टक्केच आले. तर ५० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही ३० टक्के नुकसानीप्रमाणेच नुकसान भरपाई दिली जाईल. पण वैयक्तिक पंचनामे झाले असते तर त्या शेतकऱ्यांना ५० टक्के नुकसानीसाठी ५० हजार रुपये विमा संरक्षित रकमेतून २५ हजार रुपये भरपाई मिळायला हवी होती. पण ‘वाइड स्प्रेड’मध्ये गेल्याने या शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या म्हणजेच ५० हजारांच्या ३० टक्के भरपाई देय येईल. अर्थात १५ हजार रुपये भरपाई निश्‍चित होईल. पण वाइड स्प्रेडमध्ये गेल्यामुळे ही सर्व रक्कम लगेच मिळणार नाही. तर भरपाई निश्‍चित झालेल्या १५ हजार रुपयांचे २५ टक्के म्हणजेच ३ हजार ७५० रुपये भरपाई लगेच मिळेल. उरलेले ११ हजार २५० रुपये पीक कापणी प्रयोगानंतर देय असेल तरच मिळतील. यापेक्षा कमी रक्कम देय झाली तर कमी रक्कम मिळेल. म्हणजेच जास्त नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना वाइड स्प्रेडमध्ये नुकसान गेल्यानंतर कमी भरपाई मिळणार आहे. थोडक्यात काय, तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत वाइड स्प्रेडमध्ये नुकसान गेल्यानंतर अग्रिम भरपाईप्रमाणे सूत्र लागू केले, असे म्हणता येईल.

एकापेक्षा जास्त पूर्वसूचना दिल्यास भरपाई किती मिळेल?

आधी पीक वाढीच्या टप्प्यानुसार नुकसान भरपाईची संरक्षित रक्कम कमी जास्त होती. पण आता पीकवाढीच्या सर्व टप्प्यांमध्ये विमा संरक्षित रक्कम सारखीच आहे. त्यामुळे पीकवाढीच्या कोणत्याही टप्प्यात पीक नुकसानीची पूर्वसूचना दिली तरी संपूर्ण विमा संरक्षित रक्कम गृहीत धरूनच भरपाई दिली जाणार आहे. तसेच पिकाचे एकापेक्षा जास्त वेळा नुकसान झाले झाले आणि शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त पूर्वसूचना दिल्या तर पंचनामे झाल्यानंतर दोन्ही नुकसानीच्या घटनांपैकी ज्या घटनेत जास्त भरपाई निश्‍चित झाली तीच भरपाई मिळणार आहे. समजा, पहिल्या नुकसानीच्या घटनेत शेतकऱ्याला १० हजार भरपाई देय झाली आणि दुसऱ्या घटनेत १२ हजार रुपये भरपाई देय झाली. तर दुसऱ्या घटनेतील भरपाई जास्त असल्याने १२ हजार रुपये भरपाई दिली जाईल.

तसेच एखाद्या शेतकऱ्याने पहिली नुकसानीची पूर्वसूचना दिली. त्या वेळी त्या शेतकऱ्याचे वैयक्तिक पातळीवर पंचनामे झाले. पण पुन्हा त्या शेतकऱ्याच्या मंडळात नुकसान झाले आणि नुकसान क्षेत्र २५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने वाइड स्प्रेडमध्ये गेले. तर या परिस्थिती वैयक्तिक पातळीवरील नुकसानीसाठी येणारी भरपाई आणि वाइड स्प्रेडमधील नुकसानीसाठी येणारी भरपाई यापैकी जी भरपाई जास्त असेल ती शेतकऱ्याला मिळेल. उदा. जर वैयक्तिक पातळीवर पंचनाम्यातून येणारी भरपाई १० हजार असेल आणि वाइडस्प्रेडमधून येणारी भरपाई १२ हजार असेल. तर त्या शेतकऱ्याला वैयक्तिक पातळीवर झालेल्या पंचनाम्यातून आलेली भरपाई मिळणार नाही तर जास्त असलेली वाइड स्प्रेडमधील भरपाई मिळेल.

एकदाच जास्त असेल ती भरपाई मिळणार

स्थानिक नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान एकापेक्षा जास्त वेळा झाले तर शेतकरी नुकसानीच्या पूर्वसूचना एकापेक्षा जास्त देऊ शकतात. पण जर नुकसान वैयक्तिक पातळीवर असेल तर पंचनाम्यासाठी साधारण १५ दिवस गृहीत धरले जातात. या १५ दिवसांच्या आत पुन्हा नुकसान झाले आणि पूर्वसूचना दिली आणि आधीच्याच नुकसानीचे पंचनामे झाले नसतील तर एकच पंचनामा होईल. वाइड स्प्रेडमध्ये हा कालावधी साधारण १ महिन्याचा गृहीत धरला जातो, असे कृषी विभागाने सांगितले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून आता केवळ एकदाच भरपाई मिळणार आहे. मग ती वैयक्तिक पातळीवर असेल किंवा वाइड स्प्रेड पातळीवर मिळणारी भरपाई असेल. कारण जुन्या निकषात पीक वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यात भरपाई देताना संरक्षित रकमेची टक्केवारी वेगळी होती. पण आता प्रत्येक टप्प्यावर विमा संरक्षित रक्कम समान आहे. त्यामुळे एकाच वेळी भरपाई दिली जाईल. शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त पूर्वसूचना दिल्या तर त्यापैकी ज्या पूर्वसूचनेच्या पंचनाम्यातून जास्त रक्कम येईल ती दिली जाईल. वैयक्तिक असेल तर पूर्ण रक्कम मिळेल. नुकसान वाइड स्प्रेड असेल तर २५ टक्के आता आणि उरलेली रक्कम पीक कापणी प्रयोगांती देय असेल तरच मिळेल, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com