Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Land Dispute : अण्णासाहेब नावाचा एक माणूस १९४० च्या दशकामध्ये गाव सोडून मुंबईला व्यापारासाठी गेला. हळूहळू त्याचा व्यापारामध्ये चांगला जम बसला.
Agriculture Land
Agriculture LandAgrowon
Published on
Updated on

Agriculture Land Story : अण्णासाहेब नावाचा एक माणूस १९४० च्या दशकामध्ये गाव सोडून मुंबईला व्यापारासाठी गेला. हळूहळू त्याचा व्यापारामध्ये चांगला जम बसला. सुरुवातीची काही वर्षे तो गावाशी संपर्क ठेवून होता. नंतर मात्र जसजसा मुंबईतील व्यापाराची उलाढाल वाढली तसतसे त्याचे गावाकडे जाणे कमी होऊ लागले.

मुंबईला गेला तेव्हा अण्णासाहेब तरुण व अविवाहित होता. मुंबईतील एका मुलीशी त्याने लग्न केले. १९६५ मध्ये त्याचे पोटाच्या आजाराने निधन झाले. अण्णासाहेबाच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या मुलाचे निरंजनचे वय १७ वर्षे होते. अतिशय लहान वयात त्याच्यावर व्यापाराची मोठी जबाबदारी आली. अण्णासाहेबाचा मुलगा निरंजन सुरुवातीपासूनच व्यापारात रस घेत होता. वडिलांपेक्षाही त्याने व्यापार कित्येक पटीने वाढवला. २०२२ मध्ये निरंजनचा मुलगा रमेश मुंबईतून ग्रॅज्यूएट झाला. रमेश हा कमी कष्टात मोठे होण्याचे स्वप्न पाहत होता. एका व्यापारी फर्ममध्येच काम करताना रिअल इस्टेट, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड या सर्वांशी त्याची ओळख झाली आणि जास्तीत जास्त पैसे कमी कष्टात कसे कमावता येतील, याची पण तो स्वप्ने पाहू लागला होता.

Agriculture Land
Saline Land : क्षारपड जमीन सुधारणा

त्याला वडिलांच्या बोलण्यातून आपण पूर्वी राज्यातील एका मोठ्या शहराजवळ राहत होतो व तिथे आपली जमीन होती असे कळले. त्यानंतर तो आपली शेकडो एकर जमीन असेल असा विचार करून जमिनीबद्दल खोदून खोदून वडिलांना विचारू लागला. परंतु वडील निरंजन हे देखील जन्मापासून मुंबईत वाढले असल्यामुळे जमिनीबद्दल त्याला फार काही माहिती देऊ शकले नाहीत.

फक्त कोणत्या भागातून आपण मुंबईमध्ये आलो त्या जवळच्या शहराचे नाव त्यांनी रमेशला सांगितले. शेत जमीन, जमिनीचे रेकॉर्ड, सातबारा, टिप्पण, फाळणी उतारा, कडई पत्रक असला कोणताही शब्द न ऐकलेल्या रमेशने प्रथम मुंबईच्या एका वृत्तपत्रामध्ये जमीन शोधून त्याचे उतारे देणाऱ्या व्यक्तीला १५ हजार रुपये इनाम दिले जाईल, अशी जाहिरात दिली. पहिल्यांदा अशा जाहिरातीला कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्याला कळले की जाहिरात मुंबईला देऊन काही फायदा नाही.

मग त्याने ज्या भागातून तो आला होता त्या जवळच्या शहरातील वृत्तपत्रात जाहिरात दिली. या वेळी मात्र त्याने इनामाची रक्कम १५ हजारांऐवजी २५ हजार केली. त्याने जाहिरातीत दिलेल्या फोनवर एक दिवस एका माणसाने संपर्क केला आणि त्याच्याकडून किती जमीन होती, कोणत्या गावात होती व कोणकोणत्या नावाने होती असा तपशील मागितला. रमेशला यातले काहीही माहीत नव्हते. किंबहुना, आजोबा अण्णासाहेब यांच्या वडिलांचे नाव सुद्धा त्याला माहीत नव्हते.

Agriculture Land
Land Dispute : जुनी खरेदी; परंतु मालकच सापडेना

कोणतेही नाव सांगितले तर काय फरक पडतो, असा विचार करून त्याने एक नाव मनानेच तयार करून त्या व्यक्तीला सांगितले. त्या अज्ञात व्यक्तीने त्याला पोस्टाने सर्व कागदपत्रे पाठविण्यासाठी रक्कम पाठविण्यास सांगितले. सर्व रक्कम मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने टपालाने दोन सातबारा उतारे रमेशला पाठविले. रमेशने आठव्या दिवशी त्या माणसाला फोन करून गावी जाण्याचे ठरविले. परंतु ती व्यक्ती फोनवर आता सापडत नव्हती.

थेट रमेश जेव्हा त्या गावात गेला तेव्हा त्या नावाचे गावच तेथे अस्तित्वात नाही व सातबारा पण बनावट तयार करून खोटी नावे टाकून आपल्याला दिल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर कोणीतरी त्याला तुमच्या आडनावाची कुणी व्यक्ती आहे का? हे आधी शोधा असे सांगितले. मग ऑनलाइन सातबारामध्ये एक महिनाभर त्याने त्याच आडनावाची व्यक्ती आजूबाजूच्या गावात कोठे कोठे आहे, असा शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नशिबाने त्याचेच आडनाव धारण करणाऱ्या पाच व्यक्ती त्याला एका गावात सापडल्या. त्यांचे सातबारा उतारे ऑनलाइन साइटवरून काढून रमेश त्या गावी गेला.

ग्रामीण भागाचा कसलाही अनुभव नसल्यामुळे त्या जमीन मालकाकडे जाऊन माझ्या वडिलांचा तुमच्या जमिनीमध्ये हिस्सा आहे, असे त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या जमीनमालकाने त्याला पुन्हा इकडे फिरकला तर पाय तोडून टाकीन, असा दम दिला. मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच ग्रामीण भागाचा अनुभव रमेश घेत होता. त्यानंतर दोन तीन गावी असाच त्याने जमिनीचा शोध सुरू ठेवला. शेवटपर्यंत त्याला कुठलीही जमीन सापडली नाही. नसलेल्या जमिनीचा शोध घेण्यामध्ये एमबीए झालेल्या रमेशने आतापर्यंत दीड लाख रुपये खर्च केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com