Alibaug News : अलिबाग जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून अनेक तालुक्यात जनजीवन विस्कळित झाले. शनिवारी शाळा, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. सकाळी दहानंतर पावसाचा जोर वाढला. जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात गळती लागल्याने रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. खलाटीत पाणी शिरल्याने लावणी झालेली भाताची रोपे पाण्याखाली गेली.
आतापर्यंत ४०.८२ टक्के पाऊस पडला आहे. दरदिवशी ६० मिमीच्या सरासरीने जिल्ह्यात पाऊस पडत असून शनिवारी सकाळपर्यंत दिवसभरात ९८.६६ मिमी पावसाची नोंद झाली. मुरूड, रोहा, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी पार केली होती. जिल्ह्यातील सावित्री, काळ, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांची पाणीपातळी वाढली असली तरी अद्याप धोका पातळी ओलांडली नसल्याचे कोलाड पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्जिकल वॉर्डमध्ये पाणीच पाणी झाले होते. वॉर्डमधील वस्तूही भिजल्याने पुढील काही दिवस शस्त्रक्रिया होऊ शकणार नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
पुढील नक्षत्रही पावसाचे
पूर्वी नक्षत्रांच्या स्थितीवरून पावसाचे अंदाज बांधले जायचे. ग्रामीण भागात आजही ही प्रथा कायम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही जुन्या-जाणत्या लोकांची भाकिते आजही खरी ठरत आहेत. सध्या पुनर्वसू नक्षत्र असून या नक्षत्रात सूर्याने ५ जुलै रोजी हत्ती वाहनावरून प्रवेश केला आहे, अशी माहिती पंचांग अभ्यासक वासुदेव जोशी देतात. हत्तीला पाणी आवडते म्हणून या नक्षत्रात पाऊस जास्त पडतो, असे बोलले जाते.
१९ जुलैपासून सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत असून बेडूक वाहन आहे. त्यामुळे पावसाचे सातत्य ऑगस्टपर्यंत सुरू राहील, २ ऑगस्ट रोजी हे नक्षत्र संपणार असून या दिवसापासून सूर्याचा आश्लेषा नक्षत्रात प्रवेश होत आहे. याचे वाहन गाढव आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होणार असून मध्येच एखादी सर येऊन पुन्हा ऊन पडते. या संपूर्ण नक्षत्रात ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.