Koyna Dam Rain : राज्याची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात संतगतीने वाढ होत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर दमदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे.
दरम्यान जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मागच्या २४ तासांत नवजाला २० आणि महाबळेश्वर येथे २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कोयना धरणात २२ दिवसात १८ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे, जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला. पूर्व तसेच पश्चिम भागातही हजेरी लावली. पण, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी अधिक राहिले आहे. त्यातच काही दिवस उघडीपही होती. त्यामुळे यंदा जोरदार पावसाला सुरुवात कधी होणार, अशी चिंता लागलेली आहे.
कास परिसरात गेले सात- आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. आता सांडव्यावरून पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे. कास धरणाची उंची वाढवण्याचे काम गतवर्षी पूर्ण झाले; परंतु गतवर्षी पाऊस कमी झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने ओसंडून भरले नव्हते. यंदा सुरूवातीपासून चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्णक्षमतेने भरले आहे.
वजराई धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळणार
भारतातील सर्वांत उंच धबधबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांबवली- वजराई धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा मुख्य स्रोत कास तलावच असल्याने वजराई धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे धबधब्याचा विहंगम नजारा पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.