
Sangli News : जिल्ह्यातील विकास सेवा संस्था संगणकीकृत करण्याचा निर्णय वर्षापूर्वी झाला. ५१९ संस्थांचे संगणकीकरण पूर्ण होऊन ऑनलाइन काम सुरू झाले आहे. गावागावांतील शेतकरी, संस्थांची माहिती आता एका ‘क्लिक’वर उपलब्ध होऊ लागली आहे. आता पारदर्शी कारभार होऊन विकासाला चालना मिळणार आहे.
दरम्यान, उर्वरित विकास सेवा संस्थांनाही ऑनलाइनचे काम मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांमध्ये आता संगणक बसविण्यात आले आहेत. सेवा सोसायट्यांत पारंपरिक कीर्दवर चालणारे काम ऑनलाइन सुरू झाले आहे. अन्य व्यवहार, कामेही ऑनलाइन सुरू आहेत.
संस्था गावातच शेतकऱ्यांना विविध सेवा पुरवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यापूर्वी केवळ रासायनिक खते पुरवणारी गावपातळीवरील विकास सेवा संस्था आता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वीजबिल भरणा करणे, ऑनलाइन बँकेचे व्यवहार करणे, गावातील सभासदांसाठी उपयुक्त गरजेच्या सेवा पुरवत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न असणाऱ्या सेवा संस्था शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. संस्था गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा गावातच पूर्ण करतात. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सेवा संस्थांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो.
सहकारी सेवा संस्थांचे दप्तरही संगणकीकृत झाले असून, त्या अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. प्रत्येक गावातील सेवा संस्थांचा पारंपरिक ‘लूक’ आता बदलला असून, त्या आधुनिक होत आहेत.
ऑनलाइनमुळे माहिती तत्काळ
सेवा सोसायट्यांचा कारभार यापूर्वी कागदोपत्री होत होता. अनेक वेळा संस्थेचे प्रमुख कर्जाची फिरवाफिरवी करून कर्ज वाटप-वसुली दाखवत होते. आता ऑनलाइन झाल्याने जुने-नवे हा प्रकार बंद होणार आहे.
ऑनलाइनमुळे संस्था, शेतकऱ्यांची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पीक, कर्ज, क्षेत्र आदी माहिती समजणार आहे. त्यामुळे सरकारला धोरण ठरवताना याचा उपयोग होणार आहे. ऑनलाइनमुळे मनमानीला चाप बसणार असून, पारदर्शी कारभार होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.