Women Income Sources : महिलांसाठी उत्पन्नाचे विविध स्रोत...

Article by Deepa Kshirsagar : आजच्या भागात आपण आपण नेमक्या कोणकोणत्या मार्गांनी महिला अर्थार्जन करून खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम बनू शकतात, याबाबत चर्चा करीत आहोत.
Sources of Income
Sources of IncomeAgrowon
Published on
Updated on

दीपा क्षीरसागर

Financial Capability of Women : अर्थार्जनाचे मार्ग हे शैक्षणिक पात्रता, कौटुंबिक पाठिंबा, भांडवल गुंतवणूक क्षमता, शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक कुवत, अशा अनेक बाबींवर अवलंबून असते. आजकाल बऱ्याच ग्रामीण मुली किंवा स्त्रिया उच्च शिक्षण घेतात, त्यापैकी काहींनी पुढे काय करायचे? हे आधीपासून ठरवलेले असते, किंवा काही ध्येय समोर ठेवूनच त्यांनी शिक्षण घेतलेले असते.

परंतु काही मुली केवळ मैत्रिणी शिकत आहेत किंवा घरची सुखा सुखी परिस्थिती आहे म्हणून किंवा त्या शिक्षणाच्या आधारावर उच्चशिक्षित, श्रीमंत किंवा शहरातील मुलाशी लग्न जुळावे म्हणून उच्च शिक्षण घेतात. मनासारख्या घरात लग्न झाले, की ते शिक्षण कपाटात गुंडाळून ठेवून गृहिणी म्हणून जगणे पसंत करतात, कारण सासरीदेखील आर्थिक परिस्थिती तशी चांगलीच असते.

परंतु शिक्षण असून देखील त्यांची वैयक्तिक प्रगती खुंटते.अशा महिलांसाठी त्यांचे गृहिणी पद सांभाळत करता येण्यासारखे अनेक व्यवसाय आहेत. जसे की, घरच्या घरी मुलांची शिकवणी, अर्धवेळ नोकरी, स्वतःच्या एखाद्या विषयातील ज्ञान किंवा माहितीचा वापर करून यू-ट्यूब चॅनेलची सुरुवात, वैयक्तित कौशल्याचा वापर करून ऑनलाइन व्यवसाय किंवा योग्य प्रशिक्षण घेऊन शेअर मार्केट ट्रेडिंग करता येते. या व्यतिरिक्त थोडे कमी शिक्षण असलेल्या आणि अर्थार्जन करू इच्छिणाऱ्या स्त्रियांसाठी कोणते व्यवसाय असू शकतात ते आपण पाहूयात.

Sources of Income
Women Leadership : स्त्री नेतृत्वाचा जागर

विविध व्यवसायांतील संधी

ज्या महिलांना स्वयंपाकाची आवड आहे, त्यांच्यासाठी खाद्यपदार्थांचा व्यवसाय हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो. चहा, नाश्ता, जेवण, डबे, फराळाचे पदार्थ, उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ, लोणची, मुरंबा, केक, बेकरी उत्पादनांची निर्मिती, घरगुती कार्यक्रमासाठी जेवण पुरवठा असे अनेक छोटे व्यवसाय घरातील जबाबदारी सांभाळून करता येतात.

काही स्त्रिया घरचेच स्वयंपाकघर सांभाळून थकलेल्या असतात, मग तुमच्या घरात एखादे छोटेसे दुकान टाकता येईल एवढी जागा असेल तर ब्युटी पार्लर, साड्या किंवा लहान मुलांच्या कपड्यांचे दुकान, खेळण्याचे दुकान, स्टेशनरी दुकान, किराणा माल दुकान, दूध व दुधापासून बनवलेल्या पदार्थ विक्रीचे दुकान, मोबाइलसाठी लागणाऱ्या विविध साहित्याचे दुकान, भाज्या फळे विक्री केंद्र, इत्यादी व्यवसाय करू शकतात.

आजकाल ग्रामीण भागातही लग्न, साखरपुड्यामध्ये भारी साड्या, लेहेंगा, शेरवानी, कुर्ता, पगडी, केसांचे तयार स्विचेस, पायातील बूट, सँडल, मोजडी, वेगवेगळ्या डिझाइनचे ब्लाउज, फोटोशूटमध्ये दाखविण्यासाठी हॅण्ड बॅग, डेकोरेशन साहित्य, अशा अनेक गोष्टींची खूप फॅशन सुरू आहे. प्रत्येकाला या महागड्या वस्तू एका दिवसासाठी खरेदी करणे परवडत नाही, त्यामुळे थोडी भांडवल गुंतवणूक करायची तयारी असेल तर अशा सर्व वस्तू भाड्याने देण्याचा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो.

इन्स्टाग्राम, फेसबुक केवळ करमणुकीसाठी न वापरता त्यावर अनेक प्रकारच्या उत्पादनांची विक्री करता येते. त्याच प्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्रातही जाहिरातीचे काम तसेच रिअल इस्टेट एजंट, जागा खरेदी विक्री भाडे तत्त्वावर देणे या प्रक्रियेतील करार, ऑनलाइन स्टॅम्प ड्यूटी भरणे इत्यादी अनेक कामे करू शकतात.

Sources of Income
Women Progress : श्रमबलातील वाढता स्त्री सहभाग

अलीकडे स्त्रियांमध्ये वाहन चालविण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. ग्रामीण भागातील मुली, स्त्रिया देखील दुचाकी, चारचाकी चालविताना दिसतात. त्यामुळे ज्या स्त्रिया उत्तम वाहनचालक असतील त्या इतरांना वाहन चालक प्रशिक्षण देण्याचे काम करू शकतात.

थोड्याफार शिक्षित आणि भांडवल गुंतवू शकत असणाऱ्या स्त्रिया मोबाइल, लॅपटॉप विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय करू शकतात.

अलीकडे फिरायला जाणे, पर्यटन करणे, थाटामाटात विवाह, साखरपुडा, वाढदिवस, प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग शूट, डोहाळे जेवण, बारसे मोठ्या थाटामाटात केले जाते. जर का तुमच्याकडे कोणतेही कौशल्य, शिक्षण किंवा जास्तीचे भांडवल नसेल पण तुमच्याकडे चार चाकी गाडी, स्कूटर, बाईक, डीएसएलआर कॅमेरा अशा काही वस्तू असतील आणि रोजच्या रोज त्या वापरात येत नसतील तर त्यांचा वापर तुम्ही अशा समारंभांना भाड्याने देण्यासाठी करू शकता, जेणेकरून त्यात गुंतवलेली रक्कम वसूल होईल.

त्या वस्तूंमार्फत जास्तीचा पैसा देखील येत राहील. आता तुम्ही म्हणाल, की या व्यवसायात आमच्या वस्तूंच्या सुरक्षेची काय खात्री किंवा त्याचे काही नुकसान झाले तर काय? तर याचे उत्तर असे आहे की, जी कोणती वस्तू तुम्ही भाड्याने देणार असाल त्याची घसारा किंमत त्यांच्याकडून डिपॉझिट म्हणून घ्यायची.

जेणेकरून त्यांनी ती वस्तू परत केली नाही किंवा ती चोरीला गेली तरी तुमचे नुकसान होणार नाही, आणि परत देताना जर त्याचे काही नुकसान झाले असेल तर त्याची नुकसान भरपाई आणि ठरलेले भाडे तुम्हाला त्या डिपॉझिटमधून वळते करता येतात. ज्याला तुम्ही कोणतीही वस्तू भाड्याने देता त्याच्या ओळखपत्राची प्रत, पत्ता, मोबाइल नंबर, त्याला ओळखणारे किंवा त्याची जबाबदारी घेऊ शकणारे दोन साक्षीदार यांची माहिती, एका फॉर्मवर तुमच्या सुरक्षेसाठी नोंद करून ठेवावी.

याचबरोबरीने निमशहरी तसेच शहरी भागांमध्ये घरकाम, बागेची देखभाल, लहान मोठी फॅक्टरी, पॅकेजिंग प्रोसेसिंग युनिटमध्ये नोकरी, शेतीच्या ठिकाणी कुशल कामगार, लहान मुलांचे पाळणा घर, एकट्या राहणाऱ्या म्हाताऱ्या लोकांची सेवा शुश्रूषा तसेच त्यांच्यासाठी घरी जेवण, स्वच्छता, देखरेख करणे अशा कामामध्ये देखील संधी उपलब्ध आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे अर्थार्जनाचे मार्ग आज बाजारात उपलब्ध आहेत, आपण त्यांना ओळखून, शोधून, संधींचा फायदा घेऊन आर्थिक प्रगतीचा मार्ग निवडला पाहिजे.

शेतीपूरक उद्योगांना गती

काही कुटुंबांकडे स्वतःची शेतजमीन असते, अशा कुटुंबातील स्त्रिया शेतीशी संलग्न असे व्यवसाय करू शकतात, जेणेकरून त्यांचा घरच्या शेतीला ही हातभार लागेल आणि जोडधंदा करून अधिकचे अर्थार्जन होते.

सेंद्रिय शेती, पोल्ट्री फार्मिंग, मांस उत्पादन, अंडी उत्पादन, कुक्कुट खाद्य उत्पादन, पशुखाद्य उत्पादन, खते, बियाणे, कीडनाशक विक्री असे अनेक जोड धंदे महिला करू शकतात.

बऱ्याच स्त्रियांचे संवाद आणि सामाजिक कौशल्य चांगले असते. अशा स्त्रिया बचत गट, स्वयंरोजगार पुरवणे, ऑनलाइन जाहिराती करणे, ऑनलाइन मालाची विक्री, होलसेल मधून रिटेल वस्तू विक्री करणे इत्यादी व्यवसाय करू शकतात.

: kshirsagardp@yahoo.com, (लेखिका मुंबई येथे राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये व्यवस्थापिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com