Tomato Farming : चिवट संघर्षातून टोमॅटो शेतीत पुढारले धुळवाड

Tomato Cultivation : धुळवाड (ता.सिन्नर. जि. नाशिक) या डोंगर कपारीत वसलेल्या छोट्या गावात एकेकाळी पिण्यासाठी पाणी नव्हते. मात्र ग्रामस्थांनी चिवट संघर्षातून कृषिकेंद्रित ग्रामविकास साधला आहे.
Tomato Farming
Tomato FarmingAgrowon
Published on
Updated on

मुकुंद पिंगळे

Tomato News : धुळवाड (ता.सिन्नर. जि. नाशिक) या डोंगर कपारीत वसलेल्या छोट्या गावात एकेकाळी पिण्यासाठी पाणी नव्हते. मात्र ग्रामस्थांनी चिवट संघर्षातून कृषिकेंद्रित ग्रामविकास साधला आहे. जमिनी विकसित, सुपीक केल्या. सिंचन सुविधांचा विकास केला. गुणवत्तापूर्ण टोमॅटो उत्पादनात आज गावाने आपली ओळख निर्माण केली आहे.

नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्याच्या दक्षिणेला नंदीसर व मुंढामाळ या डोंगरांच्या कुशीत वसलेलं ११० कुटुंबांचं धुळवाड गाव. प्यायला देखील नाल्यातून ओंजळ भरून पाणी काढण्याची वेळ होती. बहुतांश जमिनी खडकाळ आणि पाच-दहा गुंठ्यांत विभागलेल्या होत्या. पावसाच्या भरवशावर बाजरी, उडीद, मूग, मठ अशी पिके व्हायची. शेळी, गायींचे संगोपन व्हायचे. काही शेतकरी २० किलोमीटरपर्यंत दूध घालण्यासाठी जात. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे गावात नवे नातेसंबंध जोडायला कुणी राजी नसायचं.

बदलू लागले संघर्षाचे दिवस

‘ते संघर्षाचे दिवस अजूनही डोळ्यासमोर येतात’. जुन्या पिढीतील ८५ वर्षीय आजीबाई जिजाबाई शिवराम आव्हाड असोत की ग्रामस्थ, आपल्या त्यावेळच्या व्यथा या शब्दांत व्यक्त करतात.
एकेकाळची ही परिस्थिती बदलण्याचं ग्रामस्थांनी ठरवलं. काहींनी पुढाकार घेत गावातील ओढ्या नाल्यांमधील पाणीउपसा करून थोड्या प्रमाणात भाजीपाला घेण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी खडकाळ जमिनी फोडून सपाटीकरण केले. पंधरा किलोमीटरवरून सुपीक माती आणून जमीन पुनर्भरण केले. लाखो रुपये कर्ज घेऊन, प्रसंगी सोने-दागिने मोडून, तर कधी पदरमोड करून शेतकऱ्यांनी हिंमत दाखवली. अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. या सर्व प्रयत्नांतून गावात बागायती क्षेत्र फुलले.
कांदा, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर, मिरची आदी पिके आहेतच. पण टोमॅटोचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. गावात प्रवेश करताना टेकड्यांवर, सखल भागात टोमॅटोची शेते दृष्टीस पडतात. पोटापाण्यासाठीचे स्थलांतर आज थांबले आहे.

Tomato Farming
Tomato Farming : टोमॅटो शेतीतून पुढारलेले माळी वाडगाव

पाण्याने आणली समृद्धी

गावातील डोंगर परिसरात मुसळधार पाऊस होतो. पण पाणी वाहून जात असल्याने
जानेवारीपासून मेपर्यंत पाण्यासाठी वणवण करावी लागे. टँकरद्वारे पाणीपुरवठा व्हायचा. मग ग्रामस्थांनी सहा किलोमीटवर भोजापूर धरण परिसरात जमिनी खरेदी केल्या. तेथे विहिरी खोदल्या. पाच शेतकऱ्यांनी सामुहिक पाइपलाइन आणली. आज एकत्रित पद्धतीची सिंचन सुविधा वापराचे आदर्श उदाहरण पाहायला मिळते. पाण्याने गावात समृद्धी आणली. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून २७ तर काहींनी स्वभांडवलातून शेततळी उभारली.


Tomato Farming
Tomato Cultivation : टोमॅटो लागवड अर्ध्यावर ! टोमॅटोचे दर घसरण्याची शक्यता धुसर

टोमॅटोचा देशभर पुरवठा, निर्यातही

सन २०११ नंतर गावात टोमॅटो पीक रुजले. आज गावात शंभरहून अधिक कुटुंबे टोमॅटो शेतीत आहेत. परिश्रम, पिकाविषयीचे ज्ञान, देशभरातील बाजारपेठा, मागणी- पुरवठ्याचे सखोल ज्ञान ही शेतकऱ्यांची बलस्थाने झाली. एप्रिलमध्ये लागवडी असतात. पंचवीस ते ३० मायक्रॉन पेपर, तसेच ठिबकद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. जैविक निविष्ठांच्या वापरावर भर असतो. उन्हाचा चाळिशीचा पारा सहन करून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यात इथले
शेतकरी कुशल झाले आहेत. वाण निवड, रोपे खरेदी, पीक संरक्षण, वाहतूक व मजुरी दर आदी बाबी ग्रामस्थ एकविचाराने ठरवतात. सुमारे एक हजार मजुरांना हंगामी रोजगार उपलब्ध झाला आहे. एकरी ४० ते ५० टनांपर्यंत उत्पादन शेतकरी घेतात. नाशिक, संगमनेर येथे टोमॅटो जातो. पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी खरेदीसाठी येतात. देशभरासह आखाती देशात निर्यात होते. टिकवणक्षमता, वजनदार, चकाकी असलेल्या वाणांची निवड होते. स्वतःच्या वाहनातून तसेच छोट्या शेतकऱ्यांकडून समूह पद्धतीने एकत्रित वाहनाद्वारे विक्री होते.

जलसंधारणाची यशस्वी मोहोर (इन्फो १)

-गावाचे ‘वॉटर बजेट’ तयार करून कामांची दिशा.
- गावातून जोगीन दरा नावाची नदी वाहते. तिच्या मुख्य प्रवाहात दहा- बारा ठिकाणी सिमेंट बांध.
-साखळी बंधाऱ्यांमुळे शाश्‍वत पाणीसाठा.
-एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम व जलयुक्त शिवार योजनेची कामे.
-सहा सिमेंट नाला, तर १५ मातीनाला बांध.
-सर्व कामांत ग्रामस्थ तसेच तत्कालीन सरपंच इंदूबाई भाऊसाहेब आव्हाड यांचा सहभाग.
चार ठिकाणचा एकूण तीस हजार घनमीटर गाळ काढण्यात आला.
-कृषी विभागामार्फत जल- मृद्‍संधारण, शेततळे, अस्तरीकरण कांदा चाळ, यांत्रिकीकरण, मल्चिंग पेपर आदींची कामे. जिल्हा परिषद, लघू पाटबंधारे, जलसंधारण विभाग, पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडूनही दीड कोटींहून अधिक कामे.

गावाची एकी

गावात जत्रा, हरिनाम सप्ताह, सण, उत्सव, करमणुकीचे कार्यक्रम गुण्यागोविंदाने साजरे होतात.
गावाला वारकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी आहे. ‘आत्मा’अंतर्गत शेतकरी गटांची नोंदणी झाली आहे. सुमारे तीनशे शेतकऱ्यांनी एकत्र येत साई शरण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. त्यातून टोमॅटोचे मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न आहे. आजवर संकटांशी लढलो, म्हणून इथपर्यंत पोचलो असे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. त्यामुळे शेतीचा सर्वांगीण विकास, मुलांचे उच्चशिक्षण करणे शक्य झाले. डोंगराच्या कपारीला टुमदार घरे, यांत्रिकीकरण, शेतीमाल वाहतूक साधने आदी सुविधा तयार करता आल्या.

वाचनसंस्कृती वाढविणारी शाळा

मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतर्फे दररोज दुपारी अर्धा तास वाचन कट्टा उपक्रम राबविला जातो. प्रत्येक मुलाचा वाढदिवस स्मरणात राहावा यासाठी त्या दिवशी दोन झाडे लावण्याचा पर्यावरणपूरक संकल्प शाळेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यातून शाळा परिसरात सुंदर उद्यान साकारले आहे.
.............................................................
संपर्क : वसंतराव आव्हाड, ७५८८४३०५०९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com