Tomato Farming : टोमॅटो शेतीतून पुढारलेले माळी वाडगाव

Water Conservation : माळी वाडगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) गावात जलसंधारणाची विविध कामे घडली. त्यातून गावातील टोमॅटो शेतीला मोठी चालना मिळाली. आज गावशिवारात सुमारे तीनशे एकरांवर हे पीक असावे.
Tomato Farming
Tomato FarmingAgrowon

Success Story : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळी वाडगाव (ता. गंगापूर) हे सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील कौटुंबिक अर्थव्यवस्था शेतीवरच आधारित आहे. गावात २०१५ पूर्वी पारंपरिक शेती व्हायची. शेतकरी टोमॅटोसारख्या पिकातून अर्थकारण उंचावण्याच्या प्रयत्नात होते.

या पिकाखालील क्षेत्र जेमतेम १५ ते २० एकर असावे. बाजारपेठ तयार नव्हती. स्थानिक तसेच सुरत, पुणे या बाजारपेठेत टोमॅटो विकायचा तर वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात लागायचा. दर, खर्च आणि उत्पन्न हे समीकरण जुळत नव्हते.

झाले जलसंधारण

सन २०१७-१८ च्या सुमारास गावात लोकसहभाग व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या सहकार्यातून जलसंधारणाची कामे झाली. चार किलोमीटरवर असलेल्या होळनदीवर सात बंधारे बांधण्यात आले. चार पाझरतलावांचे खोलीकरण झाले. शिवारातील पाणी शिवारात जिरविण्याचा प्रयोग झाला. पाण्याची शाश्‍वती झाली.

पावसाचा अनियमितपणा, दोन पावसांतले दीर्घकाळ खंड आदी समस्यांची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. त्यातून टोमॅटो क्षेत्रवाढीस चालना मिळाली. व्यापाऱ्यांना एकाच ठिकाणी अधिक माल मिळण्याची आणि शेतकऱ्यांना जागेवरच बाजारपेठ मिळण्याची संधी तयार झाली.

गावातील शेतीचे आणि कुटुंबांचे अर्थकारण बदलण्यास सुरुवात झाली. टोमॅटो हे गावचे प्रमुख पीक झाले असून, त्यामध्ये जिल्ह्यात गावाने खास ओळख तयार केली आहे.

Tomato Farming
Tomato Cultivation : पुणे जिल्ह्यातील आंबेगावच्या पूर्व भागात टोमॅटो लागवडीला वेग

विकसित झाली टोमॅटो शेती

स्थानिक शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार गावातील टोमॅटोचे क्षेत्र ३०० ते ३२५ एकरांच्या आसपास असावे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत टोमॅटोला मागणी जास्त असते. त्यानुसार जुलैच्या दरम्यान लागवडी होतात. या काळात अन्यत्र देखील लागवडीचे प्रमाण कमी असते.

लागवडीआधी शेतकरी नर्सरी व्यावसायिकांकडून रोपे तयार करून घेतात. पॉली मल्चिंग पेपर, दुहेरी गादीवाफा, तारा- बांबू बांधणी आदींचा वापर होतो. मजूरटंचाई दूर करण्यासाठी शेतकरी एकमेकांना मदत करतात. गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे शेणखताची उपलब्धता व वापर चांगला आहे. त्यामुळे टोमॅटोची गुणवत्ता चांगली मिळते.

उत्पादन, बाजारपेठ

गावातील शेतकरी व व्यापारी विलास गवळी यांचे प्रातिनिधिक उदाहरण घ्यायचे तर दरवर्षी ते साडेचार ते पाच एकरांवर हे पीक घेतात. बाकी दोन- अडीच एकरांपासून ते कमाल ८ ते १३ एकरांपर्यंतही हे क्षेत्र असलेले शेतकरी गावात आहेत. गवळी यांना एकरी १५ ते १८ टनांपर्यंत उत्पादन मिळते.

उत्पादन खर्च एकरी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत येतो. त्यांच्या म्हणण्यानुसार पंजाब, राजस्थान, हरियाना भागातून सुमारे १२ पर्यंत व्यापारी हंगामात टोमॅटो खरेदीसाठी गावात येतात. सुमारे १२ शेड्‍स व त्या माध्यमातून मालाचे संकलन होते. दिवसाला १५ हजार क्रेट्‍सपर्यंत टोमॅटोची पाठवणूक करण्याची क्षमता माळी वाडगाव गावाने तयार केली आहे.

दरांबाबत बोलायचे तर २०१९-२०२० मध्ये प्रति क्रेट ३०० ते ७०० रुपये, २०२०-२०२१ मध्ये ८० ते १८० रुपये तर २०२१-२०२२ मध्ये १३० ते ५५० याप्रमाणे दर राहिले.

Tomato Farming
Tomato Rate : शिवारातच टोमॅटोचा लाल चिखल

जीवनमान उंचावले

टोमॅटो शेतीतून शेतकऱ्यांची कौटुंबिक अर्थव्यवस्था सुधारली आहे. खरेदीसाठी व्यापारी गावातच येऊ लागल्याने वाहतुकीचा खर्च वाचला आहे. जुन्या घरातून काही शेतकरी आपल्या टुमदार बंगल्यात स्थानांतरित झाले आहेत. काहींनी चारचाकी वाहने घेतली आहेत.

दुग्ध व्यवसाय आकारास

जलसंधारणाच्या कामांमुळे गावशिवारात पाणीपातळी वाढली असून, भर उन्हाळ्यात देखील हिरवाई दिसते आहे. शेतकऱ्यांना चारा पिके घेता येऊ लागली. त्यातून दुग्ध व्यवसायाने आकार घेतला.

भारतीय स्टेट बँकेच्या लासूर स्टेशन शाखेकडून वसुंधरा दूध संकलन केंद्र व शीतकरण केंद्र यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. शंभरावर शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. दररोज तीन संकलन केंद्रामार्फत तीन हजार लिटर दूध संकलित होते.

त्यातून महिन्याकाठी काही लाख रुपयांची उलाढाल होते. शंभरहून अधिक युवक या व्यवसायात गुंतले आहेत. या माध्यमातूनही अर्थकारण उंचावले आहे.

विलास गवळी, ९४२०४९१६४७

गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीपातळी उंचावण्यास मदत झाली. भाजीपाला शेतीसोबतच दुग्ध व्यवसायानेही गावातील अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला आहे.
सुनीता कैलास दुशिंग, सरपंच, माळी वाडगाव
पूर्वी एक हंगाम घेणाऱ्या गावात आज दोन हंगाम घेतले जातात. सुमारे ८० युवकांना भारतीय स्टेट बँकेकडून साडेसहा कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. त्यातून गावात दुग्ध व्यवसाय उभा राहिला आहे. मी देखील संकलन केंद्र सुरू केले आहे.
विकास वैजनाथ तुपे ८५३०९४१७१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com