
Nomadic Lifestyle : एक पोतं ज्वारी हे धन असतं. हे धन विकल्यावर मिळतात ते पैसे वा द्रव्य. पशू हे धन. हे धन बाळगणारे धनगर. महाराष्ट्रात धनगरांच्या सुमारे २०-२५ जाती आहेत. डांगे धनगर म्हशी पाळतात. रायगड, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत त्यांची वस्ती आहे. म्हशींना पाणी आणि हिरवा चारा बारा महिने मिळेल, अशा प्रदेशात त्यांची वस्ती असते. ते स्थलांतर करत नाहीत.
सणगर धनगर हे लोकरीच्या घोंगड्या विणण्याचं काम करतात. साहजिकच महाराष्ट्राच्या बहुसंख्य जिल्ह्यांत त्यांचं वास्तव्य आहे. लाधसे धनगर मेंढी पालन करतात आणि सुती वस्त्रंही विणतात. त्यांचं वास्तव्य अमरावती आणि भंडारा जिल्ह्यांत आहे. झेंडे धनगर मध्य युगात घोड्यांची पैदास करायचे. अर्थातच लष्करासाठी म्हणजे मराठा सैन्यासाठी. त्यांचं वास्तव्य कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आहे.
हाटकर धनगर मेंढ्या पाळतात. त्यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांची वस्ती आहे. कोकणात मेंढी पालन शक्यच नाही, त्यामुळे कोकण वगळता सर्वत्र हाटकर धनगर आहेत. त्याशिवाय हांडे, खुटेकर, कुरमार, मेंढे, तेलंगी अशा अनेक धनगरांच्या जाती मेंढी पालन करतात.3 गवळी धनगर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील गावांत गाई पाळतात. आपला आणि आपल्या जनावरांचा चरितार्थ पिढ्यान् पिढ्या चालू राहील अशा पर्यावरणातच पशुपालक वस्त्या करतात.
धनगरांची गावं वा वस्त्या पर्जन्यछायेच्या म्हणजे जिथे कमी पाऊस पडतो त्या प्रदेशात असतात. कारण मेंढ्यांना पाऊस सोसत नाही. खरीपाच्या सुगीनंतर ते मेंढ्या चारायला गावातून बाहेर पडतात. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो कोकणात आणि घाटमाथ्यावर. घाटमाथ्याला लगटून असलेल्या प्रदेशात पूर्व वाहिनी नद्यांची सुपीक खोरी आहेत. तिथेही बऱ्यापैकी पाऊस पडतो.
जसे पूर्वेला जाऊ तसं पावसाचं प्रमाण कमी होतं. धनगरांच्या वाड्या, वस्त्या या प्रदेशात असतात. खरिपाच्या सुगीनंतर धनगर आपल्या मेंढ्यांच्या कळपासह पश्चिमेकडे म्हणजे मावळतीला प्रवास करू लागतात. मावळतीची हद्द म्हणजे घाटमाथा. म्हणून त्या प्रदेशाला मावळ म्हणत असावेत.
काही धनगर कोकणात उतरतात. काही धनगर वाई देशात (घाटमाथ्यापासून देश सुरू होतो) तर काही मावळात वा मराठवाड्यात. तिथले शेतकरी त्यांची वाट पाहत असतात. धान, तूर, सोयाबीन, कापूस यांच्या धसकटांवर मेंढ्या चरतात आणि शेताला मेंढ्यांचं मलमूत्र मिळाल्याने मातीचा कस वाढतो.4 पावसाळ्याची म्हणजे मॉन्सूनची चाहूल लागली की धनगर आपल्या मेंढ्यांच्या कळपासह पूर्वेकडे म्हणजे उगवतीच्या दिशेने कूच करतात.
पशुपालक आणि मॉन्सून
हिमालयाची पर्वतरांग काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत आहे. काश्मिरातले बकरवाल (म्हशी), हिमाचल प्रदेशातील गद्दी, कानेट, कौली, किनौरी(शेळ्या-मेंढ्या), उत्तर प्रदेशातले गुज्जर वा वन गुजर (म्हशी), भोटिया (शेळ्या-मेंढ्या), नेपाळातले शेर्पा (याक), अरुणाचल प्रदेशातले मोंपास इत्यादी सर्व पशुपालक उन्हाळ्यात हिमशिखरांच्या पायथ्याशी जातात आणि हिवाळ्यात हिमालयाच्या पायथ्याशी येतात. त्यांचे स्थलांतराचे मार्ग म्हणजे प्राचीन व्यापारी मार्ग. भोटिया हे व्यापारीही आहेत. लडाखमधले चांगपास हे पशुपालक (याक) तिबेटमधील गावांशी व्यापारही करायचे.
उत्तर आफ्रिकेपासून ते उत्तर आशियापर्यंतचा पट्टा जागतिक शुष्क पट्टा समजला जातो. आरवली पर्वतरांग ही त्या पट्ट्याची पूर्व सीमा आहे. आरवली पर्वत रांग गुजरातपासून दिल्लीपर्यंत आहे. राजस्थानातील थरचं वाळवंट आरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेला आहे. तिथे वर्षाला केवळ १०० ते ६०० मिलिमीटर पाऊस पडतो. या पट्ट्यात शेती नाही तर पशुपालन हेच चरितार्थाचं प्रमुख साधन होतं.
राजस्थान आणि गुजरात मधील रायका, रबाडी, भारवाड हे पशुपालक पावसाळ्यानंतर आपली जित्राबं घेऊन पूर्वेकडे कूच करतात. हरयाना, मध्य प्रदेश, गुजरात काही तर पार विदर्भापर्यंत येतात. मॉन्सूनची चाहूल लागली की आपल्या मूळ गावांकडे म्हणजे कमी पावसाच्या प्रदेशाकडे जाऊ लागतात.
गवताळ प्रदेश झपाट्याने कमी होत आहेत, शेतीचं यांत्रिकीकरण आणि रासायनीकरण झाल्याने त्यांच्या पशूंना पुरेसा चारा मिळत नाही, त्यांच्या पशुजन्य उत्पादनांना बाजारपेठ नाही. दूध आणि मांस यांच्यासाठी बाजारपेठ आहे. परंतु त्यासाठी एका जागी पशुपालन करायला हवं. म्हणजे भांडवली खर्चासह पशुखाद्य, औषधपाणी यांच्या खर्चात वाढ होते. तो खर्च त्यांना परवडणारा नाही. शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, पशुपालकांना पशुपालन परवडत नाही. म्हणून प्रत्येक समूह राखीव जागांची मागणी करतो आहे. त्यासाठी संघर्ष करतो आहे. मॉन्सूनपासून जनजीवनाची फारकत झाली, परंतु नवी रचना जगण्याचे प्रश्न सोडवू शकत नाही, असा हा घोळ आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.