Milch Cow Rearing : दुधाळ गाईंच्या संगोपनावर भर

नूल (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील राजाराम विलास कदम यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. जातिवंत दुधाळ गाईंच्या संगोपनावर त्यांचा भर आहे. गाईंचे आरोग्य तसेच खाद्य व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवल्याने दूध उत्पादनात सातत्य आहे. पशुपालनाच्या बरोबरीने मूरघास तसेच गांडूळ खत निर्मितीतून त्यांनी अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे.
Milch Cow Rearing
Milch Cow RearingAgrowon

नूल (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील राजाराम विलास कदम हे प्रयोगशील शेतकरी. त्यांची आठ एकर शेती आहे. यामध्ये ऊस, मका लागवड (Maize Cultivation) असते. इंजिनिअर असलेले कदम व्यवसायाच्या निमित्ताने सुमारे तीस देश फिरले आहेत. कामानिमित्त जाताना त्यांचा फोकस हा शेती विकास (Agriculture Development) आणि नवीन तंत्रज्ञानावर राहिला. कदम यांनी जवळपास वीस देशांतील गोठे पाहिले आहेत.

साधारणपणे २०१६ मध्ये त्यांच्या वडिलांनी पशुपालनास (Animal Rearing) सुरुवात केली. २०१९ मध्ये नोकरी सोडून आल्यानंतर राजाराम कदम यांनी शेती आणि गोठ्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. २०२० पर्यंत वडील गोठ्यामध्ये सक्रिय होते. या वेळी २५ होल्स्टिन फ्रिजियन गाई होत्या. सध्या राजाराम कदम हे चार दिवस नूल येथे गोठ्याच्या व्यवस्थापनासाठी राहतात आणि पुढील दिवसांचे नियोजन करून दोन दिवस कोल्हापूरमध्ये असतात.

गरजेनुसार कदम यांना त्यांचे बंधू डॉ. रणजित कदमदेखील मदत करतात. कदम यांच्या गोठ्यामध्ये सध्या ३६ होल्स्टिन फ्रिजियन, एक खिलार गाय आणि अकरा वासरे आहेत. गोठ्यामध्ये जातिवंत पैदासीवर भर दिला आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ एका गाईला बारा किलो चारा दिला जातो. यामध्ये पाच किलो हिरवी वैरण, दोन किलो सुका चारा आणि ५ किलो मुरघास दिले जाते. तसेच पोषणासाठी दोन किलो गोळी पेंड, पाऊण किलो सरकी पेंड आणि अर्धा किलो मका भरडा दिला जातो. तसेच प्रत्येक गाईला शंभर ग्रॅम खनिज मिश्रण.

Milch Cow Rearing
Animal Care : गोशाळांसाठी तंत्रज्ञान, गुणवत्ता महत्त्वाची...

गाभण गाईंना पंधरा किलो हिरवा, दोन किलो सुका चारा दिला जातो. तसेच २ किलो खुराक तसेच शंभर ग्रॅम खनिज मिश्रण.

तीन एकर शेतीमध्ये चाऱ्यासाठी संकरित नेपिअर, लसूण घास, मका गवताची लागवड.

गाई, गोठ्याची चांगली स्वच्छता ठेवल्याने आरोग्य चांगले राहाते. पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण केल्याने ‘लम्पी’च्या साथीमध्येही गाई सुरक्षित आहेत.

दुग्ध व्यवसायाचे गणित

दुग्धोत्पादनाबाबत कदम म्हणाले की, एक गाय प्रति दिन सरासरी १३ लिटर दूध देते. सध्या दुधात तीस गाई आहेत. दिवसाला साडेतीनशे ते चारशे लिटर दुधाचे संकलन होते. दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. गावातील भारत माता महिला दूध संस्थेमध्ये दूध दिले जाते. सध्या दुधाला प्रति लिटर ३८.५० रुपये दर मिळत आहे. महिन्याचा सर्व व्यवस्थापन खर्च वजा जाता मिळकतीमधून वीस टक्के नफा राहतो. याचबरोबरीने दरवर्षी ५० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. प्रति ट्रॉली २,७०० रुपये याप्रमाणे शेणखताची विक्री होते. शेतकरी गोठ्यात येऊन शेणखत, गांडूळ खत घेऊन जातात

Milch Cow Rearing
Animal Care : चारा व्यवस्थापनासह योग्य लसीकरण महत्त्वाचे

हिशेबाच्या नोंदी महत्त्वाच्या

गोठ्याचे व्यवस्थापन करताना कदम प्रत्येक तपशीलवार झालेल्या खर्चाचा बारकाईने हिशेब लिहून ठेवतात. कोणत्या कारणासाठी किती खर्च झाला, कोणत्या मजुराने किती रक्कम घेतली यासह अन्य खर्चाचा तपशील नोंदवहीत लिहून ठेवला जातो. त्यामुळे प्रत्येक महिन्याला किती खर्च झाला याचा अंदाज येतो.

गाईंच्या व्यवस्थापनाचा चांगला अभ्यास झाल्याने कदम स्वतः औषधोपचार करतात. भविष्यामध्ये मोठा मुक्त संचार गोठा तयार करून गाईंची संख्या ८० पर्यंत नेण्याचे नियोजन आहे. यातून प्रति दिन एक हजार लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट आहे. जातिवंत पैदाशीवर लक्ष देऊन गोठ्यातच दुधाळ गाई तयार होतील याकडे कदम यांनी लक्ष दिले आहे.

स्थानिक कामगारांवर जबाबदारी

बरेच पशुपालक बाहेरील राज्यातून कामगार आणून गाई,म्हशींचे व्यवस्थापन करतात. मात्र कदम यांनी स्थानिक मजूरांना रोजगार देऊन गोठ्याचे व्यवस्थापन केले आहे. ज्यांना रोजगाराची अत्यंत गरज आहे असे पाच मजूर कदम यांनी निवडले आहेत. मजुरांकडून गोठा व्यवस्थापन करताना कदम कधीही मालक म्हणून काम करत नाहीत. अगदी त्यांच्यातील एक होऊनच स्वतः व्यवस्थापन करतात. त्यामुळे मालक आणि कामगार असा भेदभाव नाही.

त्यामुळे तीन वर्षांपासून त्यांच्या गोठ्यामध्ये कामगार आनंदाने काम करत आहेत. पहाटे पाचपासून सायंकाळी सातपर्यंत वेगवेगळ्या वेळेमध्ये हे कामगार नेमून दिलेली कामे करतात. प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली आहे. गोठा आणि जनावरांची स्वच्छता, धारा काढणे, जनावरांना चारा, पशूखाद्य देणे, चाऱ्याची कापणी करणे आदी ठरलेली कामे प्रत्येक जण आपापल्या वेळेत करत असल्याने कामकाजाचे नियोजन करणे सुलभ होते. कामगारांना वार्षिक बोनस, दिवाळीचे साहित्य, आरोग्य तपासणी अशा सुविधा दिल्या जातात. आठवड्यातून एक दिवस सुट्टी दिली जाते. योग्य व्यवस्थापनामुळे कामगारांची देखील आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे.

मुरघास निर्मिती व्यवसाय

राजाराम कदम यांनी गाईंच्या खाद्यासाठी मूरघास निर्मितीवर भर दिला आहे. स्वतःच्या गाईसाठी ते मुरघास तयार करतात, याचबरोबरीने विक्रीदेखील करतात. मुरघास तयार करण्यासाठी कदम यांना खंडेराव शिंदे यांचे सहकार्य मिळाले आहे. चंदगड, भुदरगड, गोवा आणि अन्य ठिकाणांहून पशुपालक मुरघास घेऊन जातात. साधारणपणे वर्षाला दीडशे टन मुरघासाची विक्री होते. मक्याची वर्षभर उपलब्धता होण्यासाठी त्यांनी ५० शेतकरी जोडले आहेत. सरासरी आठ हजार रुपये प्रति टन या दराने मुरघासाची विक्री केली जाते.

राजाराम कदम ८४४६७४५६४१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com