श्री श्री रविशंकर
Ram Mandir : विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल २००२च्या उन्हाळ्यात कांचीपुरमहून बंगळूर आश्रमात मला भेटायला आले होते. त्यांनी रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात तत्कालीन कांची शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली होती. शंकराचार्य आणि प्रमुख मुस्लिम नेत्यांमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर लगेच हे घडले होते.
आता पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राममंदिर उभारणीचा मार्ग निर्णायकपणे मोकळा करावा, अशी अशोकजींची इच्छा होती. हा त्यांचा एककलमी अजेंडा होता. त्यांच्या काही मागण्या, वाजपेयीजी जे आघाडी सरकार चालवत होते त्यांच्या दृष्टीने अव्यवहार्य वाटल्या. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून भारतात परतल्यानंतर २००१ मध्ये आम्ही भेटलो, तेव्हापासून वाजपेयीजी आणि मी अयोध्या प्रकरणाबाबत एकमेकांच्या संपर्कात होतो.
दीर्घकाळ चाललेल्या वादावर शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याचे काम त्यांनी माझ्यावर सोपवले होते. मी मुस्लिम समाजातील नेते आणि प्रभावशाली सदस्यांशी चर्चा सुरू केली. अयोध्या वादावरील आमरण उपोषण मोहिमेदरम्यान अशोकजींना जबरदस्तीने खाऊ घातल्यानंतर त्या वेळी त्यांनी पंतप्रधान वाजपेयींशी अबोला घेतला. रामजन्मभूमीचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी कायदा आणावा, असे मी वाजपेयींना पटवून द्यावे, यासाठी ते माझ्याकडे आले होते.
माझ्या वयाच्या दीड पट असलेल्या अशोकजींच्या डोळ्यात वयाच्या ७६व्या वर्षी एक उत्कट चैतन्य आणि उत्कटता, नैतिक संताप आणि निराशेची ठिणगी दिसली. त्यांनी मला विचारले, की मंदिर कधी बांधले जाईल का? त्यांना त्यांच्या हयातीत ते बघायला मिळेल का? तेव्हा मला अंतर्ज्ञानाने वाटले, की आणखी किमान १४ वर्षे हे घडणार नाही. मला आठवते, ‘त्यासाठी प्रार्थना करा आणि तुमच्या वचनबद्धतेने सर्व शक्य आहे,’ असे मी त्यांना बोललो होतो.
माझे बोलणे काही अंशी अशोकजींना पटले आणि ते आश्रमातून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यान करताना, मला एका जीर्ण झालेल्या देवी मंदिराचे दर्शन झाले, ज्याचे पुनरुत्थान करणे आवश्यक होते. त्या वेळी मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी तमिळनाडूतील एक वृद्ध नाडीसिद्धर आश्रमात आले आणि त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
प्राचीन ताडपत्रे वाचत असताना ते हळुवारपणे म्हणाले, ‘‘गुरुदेव, रामजन्मभूमीचा प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला दोन्ही समुदायांना एकत्र आणण्यासाठी आपली भूमिका बजावावी लागेल असे लिहिले आहे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘नाडीच्या पानांवरून हेही दिसून येते, की श्री रामाच्या कुलदेवी (कुलदैवत) देवकालीसाठी बांधलेले मंदिर गंभीर दुर्लक्षित अवस्थेत आहे. त्याचा जीर्णोद्धार केला जात नाही, तोपर्यंत अयोध्येतील राम मंदिराभोवतीचा हिंसाचार आणि संघर्ष थांबणार नाही.’’
त्यांच्या सांगण्यात निकड आणि दृढ विश्वासाची भावना होती. ‘हे करायलाच हवे!’ असे ते परत एकदा म्हणाले. अशा मंदिराच्या अस्तित्वाची माहिती नाडीसिद्धारला किंवा मला नव्हती. काही सूत्रांद्वारे अयोध्येत काली मंदिरे असल्याबाबतची चौकशी करण्यात आली. तिथे दोन काली मंदिरे आहेत हे आम्हाला कळाले.
पहिले शहराच्या मध्यभागी होते, त्याला लहान देवकाली मंदिर असे म्हणत, तर दुसरे थोडेसे दूर, देवकाली मंदिर म्हणून ओळखले जात होते. देवकाली मंदिराचा ढाचा मोडकळीस आला होता, त्यातला मध्यवर्ती तलाव आता छोटेसे डंपिंग ग्राउंड होता. मंदिराच्या नूतनीकरण, तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम आमच्या स्वयंसेवकांनी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत यशस्वीपणे पूर्ण केले.
मी १८ सप्टेंबर २००२ला काही लोकांसोबत अयोध्येला पोहोचलो. हनुमान गढी, श्री रामजन्मस्थान आणि इतर पवित्र स्थळांना भेटी दिल्या. या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षात किती साधुसंतांना प्राण गमवावे लागले याच्या दु:खद कथा होत्या. कोणताही आश्रम, कुटुंब किंवा स्थानिक आधार नसलेल्या या साधूंच्या बाजूने कोणीही बोलण्याचे धाडस करणार नव्हते.
त्यांच्या दु:खाच्या या कथांना माध्यमांत कोठेही स्थान नव्हते. १९ सप्टेंबरला सकाळी देवकाली मंदिराचा पुन: अभिषेक झाला. आमच्या आश्रमातील पंडितांच्या चमूने माझ्या उपस्थितीत समारंभ पार पाडला. पवित्र अग्नीत पूर्णाहुती अर्पण करताना देवकाली तिच्या सर्व वैभवात चमकत होती.
डॉ. बी. के. मोदीसुद्धा त्या दिवशी तिथे उपस्थित होते. माझी दृष्टी आणि नाडीसिद्धरचा अंदाज मी सुरुवातीला बाजूला सारला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मंदिरातील पूजेनंतर, शहरात जातीय हिंसाचारामुळे कोणताही रक्तपात किंवा दंगल झालेली नव्हती. एक भविष्यवाणी पूर्ण झाली होती. अशोक सिंघलसुद्धा त्या दिवशी हजर होते.
अंतिम ठरावाकडे गती मिळण्यासाठी त्या संध्याकाळी देवकाली मंदिर परिसरात संत समागम झाला, त्यात आम्ही एक हजाराहून अधिक हिंदू आणि सुफी संतांना आमंत्रित केले होते. सर्वांनी वाद शांततेत सोडविण्यासाठी एकत्रित प्रार्थना केली. मी मुस्लिम नेत्यांचा सन्मान करत असताना, त्यांनी मला तुलसी रामायण पुस्तकासह कुराणाची प्रत दिली आणि श्रीरामांबद्दलची त्यांची नितांत श्रद्धा असल्याचे सांगितले. म्हणजे निहित स्वार्थ असलेल्यांनाच समुदायांमध्ये फूट पडावी, असे वाटते.
काळाच्या कसोटीवर उतरणारा तोडगा हवा होता. हे लक्षात घेऊन २००३मध्ये, मी न्यायालयाबाहेर समझोता प्रस्तावित केला होता, जेथे मुस्लिम समुदाय सद््भावना म्हणून हिंदूंना रामजन्मभूमी भेट देऊ शकतील आणि त्या बदल्यात हिंदू त्यांना ५ एकर जमिनीचा भूखंड भेट देऊ शकतील, ज्यामुळे मशिदीच्या बांधकामासाठी त्यांना मदत होईल. यातून दोन्ही समुदायांमध्ये पुढील अनेक पिढ्या टिकेल इतका बंधुभावाचा स्पष्ट संदेश जाईल.
देवकाली प्राणप्रतिष्ठेनंतर अशोकजींनी मला अलाहाबाद येथील वडिलोपार्जित घरी बोलावले. सामूहिक ध्यानानंतर, मी अशोकजींना सांगितले, की हा एकट्याचा मानवी प्रयत्न नाही आणि कोणत्याही कृतीच्या फलश्रुतीमध्ये दैवी इच्छादेखील भूमिका बजावते. आणि त्यासाठी संयम ठेवावा लागतो. मी त्यांना सुचवले, की त्यांनी घाई करू नये आणि घाईघाईत कोणते पाऊल उचलू नये.
संध्याकाळच्या अखेर, ते अधिक निश्चित आणि आश्वस्त दिसले. वाजपेयी सरकारच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मवाळ केली. २०१७ मध्ये, दोन्ही समुदायांच्या नेत्यांनी आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सूचित केल्याने, मी रामजन्मभूमी प्रकरणात मध्यस्थी करण्याचे माझे प्रयत्न पुन्हा सुरू केले. सरतेशेवटी, सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या बांधकामासाठी या जमिनीचे वाटप आणि मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा निश्चित करण्याचा निर्णय दिला.
५०० वर्षे जुना संघर्ष शांततापूर्ण मार्गावर पोहोचला. जी गोष्ट बऱ्याचदा स्थूल घटनेसारखी वाटू शकते, त्याला प्रत्यक्षात एक अंतर्निहित सूक्ष्म पैलू असतो. आपण मूर्त क्षेत्रामध्ये कार्यकारण-प्रभावाचे तत्त्व त्याच दिशेने लागू करतो, क्वचितच आपले आकलन त्यापलीकडे जाते. आपल्या भौतिक जगामध्ये सरते शेवटी काय घडणार, यावर सूक्ष्म क्षेत्राच्या शक्तींचे मोठे नियंत्रण असते. आपण राहत असलेल्या या गूढ जगाचे आणखी एक रहस्य!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.