Ayodhya Ram Mandir Ceremony : घराघरांवर रत्नतोरणे...!

Article by Vijay Sukulkar : ‘‘जरा धीरे धीरे हांको, मेरे राम गाडीवाले...’’ प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तमाला गाडीवानाची उपमा देणाऱ्या संत कबीरांना जो श्रीराम अभिप्रेत होता, तोच आज देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या मनी विसावला आहे.
Ram Mandir
Ram MandirAgrowon

Ram Mandir Inauguration : ‘‘जरा धीरे धीरे हांको, मेरे राम गाडीवाले...’’ प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तमाला गाडीवानाची उपमा देणाऱ्या संत कबीरांना जो श्रीराम अभिप्रेत होता, तोच आज देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या मनी विसावला आहे. कबीराचा गाडीवान राम जीवनाची गाडी हाकणारा. ‘है जी गाडी अटकी रेत में, मेरी मजल पडी है दूर, धर्मी धर्मी पार उतर गया, पापी चकनाचूर...’ अशी ही या गाडीवानदादाची गाडी.

संकटांच्या खाचखळग्यातून, अपप्रवृत्तींच्या वाटमारीमधून मुसाफिराला अलगद बाहेर नेणारी. त्याच्याच भरवशावर तर हा प्रवास चालला आहे, याची जाणीव करून देणाऱ्या संत कबीरांना जो राम दिसला होता, तोच रामराणा आज धनुष्यबाणासहित अयोध्येतील मंदिरात स्थानापन्न होईल. श्रीराम हे आपल्या बहुसंख्यांचे दैवत. किंबहुना, आदर्श मनुष्यप्राणी कसा असावा, याचा तो मूर्तिमंत वस्तुपाठच.

अयोध्येचा हा राजा, देव असला तरी नियतीचे फासे त्यालाही चुकले नव्हते. जीवनातले संघर्ष पार करत, दुष्टप्रवृत्तींना आपल्या रामबाणाने विद्ध करत श्रीरामांनी आपले ‘रामपण’ सिद्ध केले. त्या रामतत्त्वाचे शाश्‍वत मंदिर अयोध्येत उभे राहिले आहे. एकवचनी, एकबाणी, मातापित्यांच्या आज्ञा विनाविवाद स्वीकारणारा, सत्य सिद्ध व्हावे म्हणून स्वत:च आयुष्यातल्या अवघड परीक्षेला धीरोदात्तपणे सामोरा जाणारा श्रीराम हे आपल्यासाठी एक जीवनमूल्य आहे.

त्या जीवनमूल्याची प्रतिष्ठापना आज अयोध्येतील दिव्यसुंदर मंदिरात होत आहे. हा सोहळा अनेकार्थांनी भारतीयांसाठी ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. त्याला सांस्कृतिकतेचे रंग आहेत. काही भलेबुरे सामाजिक संदर्भ आहेत, अपरिहार्यपणे मिळालेली राजकारणाची डूबदेखील आहे. या सर्वांच्या वर हा विश्‍वाचा विश्राम राम दशांगुळे वर उभा आहे. म्हणूनच त्याच्या सोहळ्यात सारा देश एकसमयावच्छेदेकरोन रममाण झालेला दिसतो.

Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : पुन्हा यावे मानवतावादी रामराज्य

स्वत:च्याच जन्मभूमीत अनिकेत ठरलेल्या श्रीरामलल्लांच्या प्रतिष्ठापनेचा हा दिवस अखेर उजाडला, हाच मुळी एक दुर्मीळ योग आहे. भांडणतंटे, आंदोलने, हिंसाचार, कोर्टकज्जे, राजकीय डावपेच या साऱ्यांमधून तावून सुलाखून निघालेली ती सुंदर मूरत आज त्या भव्य मंदिरात प्रतिष्ठापित होईल, तेव्हा कोट्यवधी भाविकांना ‘याजसाठी केला होता अट्टहास’ ही जाणीव भावविभोर करेल.

अर्थात, काही कणसूर लागताना दिसतात. ‘मंदिराची उठाठेव करण्यापेक्षा भाकरीत आपला राम शोधणाऱ्या गरिबाच्या मुखी चार घास पडतील, असे बघा’ असे सुनावणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. पण या विरोधातही राम आहेच! श्रीरामांच्या भक्तीने देशातील बहुसंख्यांचा आनंद ओसंडून वाहत असेल, तर त्यात आपणही आपले थोडके स्मित मिसळावे.

Ram Mandir
Aodhya Ram Mandir : लोकसहभाग आणि नियोजनबद्ध प्रयत्नांतून मंदिर

देशभरातील कोट्यवधी भाविक आज आपापल्या घरांचे उंबरे दिव्यांनी उजळून टाकतील. घरोघरी गोडधोड होईल. ज्या घरात अजूनही दारिद्र्याचा काळोख आहे, तिथे गोडधोडाचा प्रसाद नेऊन देण्याची खटपट होईल. मंगलकार्य यालाच म्हणायचे असते. एकमेकांच्या मंगलाची भावना जिथे जागृत होते, तो क्षण वाया का दवडायचा? एकाच वर्षात यंदा दोनदा दिवाळीचा सण आल्यागत वातावरण साऱ्या देशात निर्माण झाले आहे.

‘घराघरांवर रत्नतोरणे, अवतीभवती रम्य उपवने, त्यात रंगती नृत्यगायनें, मृदंगवीणा नित्य नादति, अलकानगरीपरी...’ या ‘गदिमां’च्या गीतरामायणातील पंक्ती चक्क प्रत्यक्षात भूमीवर अवतरल्या आहेत. कालपरवापर्यंत जिथे तणावग्रस्त वातावरण होते, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता, तिथे आता यापुढे रामभक्तांच्या आणि पर्यटकांच्या रांगा लागणार आहेत.

जिथे रामलल्लांचे दर्शन अवघड बनले होते, तिथे स्थापत्य आणि शिल्पकलेचा आधुनिक नमुना ठरणारे भव्य मंदिर उभे राहिले आहे. ऐन कलियुगात त्रेतायुगाच्या निळ्यासावळ्या सावल्या पडल्या आहेत. या सोहळ्याची राजकीय किंवा सामाजिक मीमांसा पुढील काळात होत राहील. तशी ती व्हायलाच हवी. तूर्त तरी या गाडीवानदादाच्या गाडीत बसून आसपासची दिव्यशोभा पाहून मनोमन हात जोडावेत, हे खरे. सदिच्छांमध्येच खरा राम वसत असतो, आणि तो तर अंतर्यामी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com