Forest Conservation : अशीही एक ‘जंगल कप स्पर्धा’

Article by Dr. Nagesh Tekale : डॉर्फ केटल जंगल कपचा महत्त्वाचा फायदा म्हणजे गावकऱ्यांनी खऱ्‍या अर्थाने आपले गाव हरित करून दुष्काळ मुक्तीसाठी गावामध्ये हजारो देशी वृक्ष लावले.
Forest Conservation
Forest ConservationAgrowon

डॉ. नागेश टेकाळे

Forest Conservation Initiatives : मागील दोन आठवड्यात मानव आणि वृक्ष संवर्धन या क्षेत्रामधील विविध सकारात्मक आणि नकारात्मक घटनांचा मी आढावा घेत होतो. थिम्माक्का या कर्नाटकमधील आज हयात असलेल्या ११२ वर्षांच्या वयोवृद्ध स्त्रीने स्वतःला मूल नाही म्हणून शेकडो वटवृक्षांना तिच्या गावाजवळून जाणाऱ्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा रुजवून, सांभाळून मोठे केले.

आज या महामार्गाच्या सलग ४५ कि.मी. रस्त्यावर थिम्माक्काचे हे तब्बल ३८५ डेरेदार वटवृक्ष दुतर्फा सैनिकाप्रमाणे एका रांगेत उभे केलेत, म्हणूनच हा महामार्ग त्यांच्याच नावाने ओळखला जातो. थिम्माक्काची वृक्ष लागवडीची तहान फक्त वटवृक्षापुरतीच मर्यादित नव्हती, तिने तिच्या गावात आठ हजारपेक्षाही जास्त वृक्ष लावले. एवढेच नव्हे तर पहाटे चार वाजता उठून दोन कोसावरुन पाण्याचा हंडा आणून त्यांना जगविले देखील!

कर्नाटकमधील तुलसी गौडा सुद्धा अशीच एक स्त्री. वय ८८ वर्षे. तुलसीने तिच्या गाव परिसरात तब्बल ३० हजार देशी वृक्ष फक्त लावले नसून जगविलेही आहेत. २० वर्षांपूर्वी भूगर्भात खोल गेलेले जल तिने वृक्षांच्या साहाय्याने आज भूपृष्ठापर्यंत आणले आहे. पिपलांत्री या राजस्थानमधील नाथद्वारापासून जेमतेम २७ कि. मी. दूर असलेल्या गावाची आणि तेथील सरपंच श्याम सुंदर पालीवाल यांची तर गोष्ट पाठ्यपुस्तकात यावी अशी आहे.

मार्बलच्या खाणीने वेढलेल्या या गावात पाणी तब्बल ८०० फूट खोल गेलेले, पिण्याच्या पाण्याचे हे महासंकट म्हणून या गावात लग्नासाठी कुणी मुलीही देत नव्हते. आपल्या गावात मुली येत नाहीत म्हणून येथील गावकऱ्‍यांनी स्त्रीभूण हत्या सुरू केली. सरपंचाच्या किरण या मुलीचा वयाच्या १७ व्या वर्षी पाणी पाणी म्हणत मृत्यू झाला.

तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ पालीवाल यांनी गावामध्ये एक वृक्ष लावला आणि आज या गावात मुलगी जन्माला आली की तिच्या नावाने १११ वृक्ष लावण्याचे त्यांनी गावकऱ्‍यांना केलेले आवाहन त्यांच्याच साहाय्याने प्रत्यक्ष कृतीत आणले. आज या गावात प्रत्येक जन्मलेल्या मुलींच्या स्वागतासाठी तब्बल ३ लाख ५० हजार वृक्षांनी गर्दी केली आहे. गावचे पाणी सुद्धा भूपृष्ठापर्यंत आले आहे. या गावामधील शेतकरी आता मार्बल खाणीवर कामावर न जाता ‘हरीभरी वसुंधरा’ म्हणत शेती करत आहेत.

Forest Conservation
Forest Conservation : जंगल, जमीन, जल यांचे संवर्धन हे राष्ट्रीय कार्य

थिम्माक्का, तुलसी आणि श्यामसुंदर पालीवाल आज पद्मश्रीने सन्मानित आहेत. वृक्ष सेवेचाच हा सन्मान आहे, असे म्हणणारे हे तिघेही पूर्वी जसे होते तसेच आजही वृक्षाप्रमाणेच विनयशील आहेत. झारखंड मधील चामी मूरमू या आदिवासी महिलेने शेकडो स्त्रियांना एकत्रित करून ५०० गावात तब्बल २८ लाख वृक्ष मागील ३६ वर्षांत लावले आहेत.

त्या सुद्धा या वर्षीच्या पद्मश्रीच्या मानकरी आहेत. कर्नाटक, राजस्थान आणि झारखंड या तीन राज्यांच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या महाराष्ट्राकडे वळून पाहिले आणि धक्काच बसला. मागील पाच वर्षांत आपल्या राज्याने तब्बल एक लाख २८ हजार ३१४ हेक्टर जंगल केवळ वणव्यात गमावले आहे.

या कालावधीत थोड्याथोडक्या नाही तर वणव्याच्या ३७ हजार ४०३ घटनांची नोंद झाली म्हणजेच एकीकडे वृक्ष लागवड करावयाची, त्याची कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यावयाची मात्र शेकडो वर्षांपासून अबाधित देशी वृक्षांचे जंगल वाऱ्यावर सोडून द्यावयाचे असेच काही तरी होत आहे. जंगलात लावलेले वृक्ष स्वतंत्र होण्याचा कालावधी कमीत कमी १० वर्षे आणि कार्बन सामावून घेणारी त्यांची क्षमता स्थिर होण्यास तीस वर्षे आणि त्यापुढील कालावधी लागतो. आज आपली जंगले खरचं सुरक्षित आहेत काय? उत्तर नकारार्थी आहे.

आपल्या या उध्वस्त जंगलाच्या नकारात्मक पार्श्वभूमीवर मागील महिन्यात (२२ फेब्रुवारी) मला गाव आणि तेथील लोकसहभागातून जंगल लागवड आणि संवर्धनाची एक जगावेगळीच कल्पना संगमनेर तालुक्यामधील ५० गावामध्ये पाहावयास मिळाली. पंचायत समिती, संगमनेर, जि. अहमदनगर, मुंबई स्थित डॉर्फ केटल केमिकल हा उद्योग समूह आणि त्यांना साथ देणाऱ्‍या नवदृष्टी आणि सप्रेम या मुंबई स्थित सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ऑक्टोबर २०२२ मध्ये मियावाकी पद्धतीची ही देशी वृक्षांची हरित जंगल गाथा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती’ या संत तुकारामांच्या अभंगाचा जयघोष करत या ५० दुष्काळी गावामध्ये सरपंच आणि गावकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून लिहिली गेली आणि आज त्याचा सुदृढ, सशक्त आणि कुणीही कुठेही वाचावा, असा ग्रंथ तयार झाला आहे.

Forest Conservation
Forest Conservation : जंगलांचे संवर्धन गरजेचे...

शासनाद्वारे होणाऱ्‍या वृक्ष लागवडीपेक्षा स्थानिक लोकसहभागातून ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेवर केलेले वृक्षारोपण अधिक शाश्वत होऊ शकते, हा यामधून मिळालेला सकारात्मक संदेश प्रत्येक गावाने स्वीकारण्या योग्य आहे. डॉर्फ केटल कंपनीद्वारे सीएसआर अंतर्गत प्रत्येक सहभागी गावांना ४३ प्रकारच्या देशी वृक्षांची ३०० रोपे देण्यात आली.

एक गुंठा जागेवर शाळकरी मुलांच्या हस्ते गावकऱ्यांनी गावाच्या दर्शनी भागात त्यांचे रोपण केले, वर्षभर त्यांची काळजी घेतली आणि आज प्रत्येक गावाचे हे वन खरोखरच दृष्ट लागण्यासारखे झाले आहे. अनेक छोटे पक्षी, फुलपाखरे या वनात येतात, शाळेतील मुले तेथे अभ्यासासाठी जातात. सायंकाळी वृद्धांना हक्काचे विरंगुळा स्थानही मिळाले.

या सर्व गावांसाठी उत्कृष्ट जंगल निर्मितीची स्पर्धा घेण्यात आली आणि प्रथम क्रमांकास एक लाख रुपये आणि आकर्षक जंगल कप देण्यात आला. दुसरा आणि तिसरा क्रमांक ७५ व २५ हजारांचा होता. त्याचबरोबर प्रत्येकी दहा हजारांची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके आणि प्रत्येक सहभागी गावास सन्मानपत्र देण्यात आले.

पळसखेडे, तिगाव आणि झोळे ही गावे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास पात्र ठरली. या डॉर्फ केटल जंगल कपचा फायदा म्हणजे दुष्काळ मुक्तीसाठी गावामध्ये हजारो देशी वृक्ष गावकऱ्यांनी लावले. मियावाकी जंगल निर्मिती हे त्यांच्यासाठी प्रेरणा स्थानच ठरले. संगमनेरला हजारो लोकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमास बिजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी उपस्थित राहून फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रथमच होत असलेल्या या अनोख्या वृक्ष स्पर्धेला मनापासून आशीर्वाद दिले.

डॉर्फ केटल जंगल कप २०२४ च्या निमित्ताने या दुष्काळी पट्ट्यामधील स्पर्धेत सहभागी ५० गावांनी एकत्रित येऊन या निमित्ताने आज तब्बल ९५ हजार वृक्ष लावले आहेत. यातील प्रत्येक वृक्ष आम्ही आमच्या लेकराप्रमाणे सांभाळून त्यास मोठे करणार हे गावकऱ्‍यांचे म्हणणे, मला एक भीष्म प्रतिज्ञाच वाटत होती. २२ फेब्रुवारीचा हा कार्यक्रम येथेच संपणार नसून आमचा उद्योग समूह असाच जंगल कप पुढील काही वर्षे इतर दुष्काळी तालुक्यात सुरू करण्याच्या प्रयत्नात असून या माध्यमातून आपले महाराष्ट्र राज्य पाणी टंचाई आणि दुष्काळ मुक्तीच्या शासनाच्या भगीरथ प्रयत्नामधील आमचेही एक त्यांच्या बरोबरीचे यशस्वी पाऊल असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com