
Mahayuti Nagapur : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (ता.१५) नागपूरमध्ये पार पडला. महायुतीतील तिन्ही पक्षाने नव्याने चेहऱ्यांना संधी देत ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कापले. त्यामुळे महायुतीतील पक्षामध्ये नाराजी नाट्य रंगले आहे. त्यातच भाजपचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त केली.
खोत म्हणाले, "मित्रपक्षांना तिन्ही पक्षांनी सामावून घेणं गरजेचं होतं. त्यासाठी मित्रपक्षांनी काही मंत्रिपद बाजूला काढून ठेवायला हवी होती. दुर्दैवाने, तसं झालं नाही. परंतु आम्ही मात्र लोकसभा असो विधानसभा असो तिन्ही पक्षाचं शेत चांगलं नांगरलं, कोळपलं होतं. धान्याची रास उभी केली होती, पण आम्हाला खळ्यावरून घरला घालवलं. हे योग्य नाही," असं म्हणत खोत यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
युती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सदाभाऊ खोतांच्या गळ्यात विधान परिषद आमदार आणि कृषी राज्यमंत्री पदाची माळ पडली होती. युती सरकार सत्तेतून गेल्यानंतर मात्र राजकीय विजनवास सुरू झाला होता. त्यामुळे आमदारकीची मुदत संपल्यानंतर खोतांनी पुन्हा प्रयत्न करूनही भाजपनं मात्र त्यांच्या नावाचा विचार केला नव्हता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निष्ठा ठेवत खोतांनी प्रयत्न सुरूच ठेवले. त्यानंतर अलीकडेच जून महिन्यात त्यांची भाजपकडून विधान परिषदेवर वर्णी लागली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यामुळे मंत्रीपदाची माळ पुन्हा एकदा आपल्या गळ्यात पडावी, यासाठी खोत यांनी प्रयत्न केले. परंतु भाजपने मात्र त्यांचा विचार केला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होताच सदाभाऊ खोतांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी कृषी खातं मिळालं असतं तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेता आले असते. सिंचन प्रकल्पांना गती देता आली असती आणि कर्जमाफीचा प्रश्न सोडवता आला असता, अशी भावना व्यक्त केली.
पुढे खोत म्हणाले, "आमचा संघर्ष दीर्घकालीन आहे. संघर्ष आमचा सावत्र भाऊ आहे. संघर्ष कधीच सत्तेसाठी नव्हता आणि पुढेही सत्तेसाठी नसेल, ज्या प्रश्नांसाठी आम्ही लढलो, त्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील." असंही खोत म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.