Maharashtra CM Oath Ceremony : मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस सत्तारूढ

Maharashtra New Government Formation : २०१९ मध्ये युती तुटल्याने आणि अडीच वर्षांपूर्वी सत्तांतरावेळी एकनाथ शिंदे यांना भाजपने संधी दिल्यामुळे मुख्यमंत्रिपद हुकलेले देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर शपथ घेऊन पुन्हा सत्तारूढ झाले.
Mahayuti
MahayutiAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : २०१९ मध्ये युती तुटल्याने आणि अडीच वर्षांपूर्वी सत्तांतरावेळी एकनाथ शिंदे यांना भाजपने संधी दिल्यामुळे मुख्यमंत्रिपद हुकलेले देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर शपथ घेऊन पुन्हा सत्तारूढ झाले. गुरुवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाच वाजता शानदार सोहळ्यात राज्यपाल सी. राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासह अन्य महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रही असल्याने शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह तिघांना शपथ दिली. अन्य मंत्र्यांचा शपथविधी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे लांबल्याचे चित्र होते.

आझाद मैदानावर भव्य शामियान्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन आणि अन्य मंत्री व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यात २८८ जागांपैकी महायुतीने तब्बल २३७ जागांवर विजय मिळविला. मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्याने शिंदे यांनी आधी मुख्यमंत्रिपदावर दावा केला. मात्र काही दिवसांनी तो सोडला. त्यानंतर गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या खात्यांसाठी त्यांनी आग्रह धरला. काही काळ ते अज्ञातवासात होते.

Mahayuti
Devendra Fadnavis CM Oath : फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

त्यानंतर त्यांनी स्वपक्षाच्या आमदारांचीही भेट घेणे टाळले. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र भाजपने या दबावाला न जुमानता शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू केली होती.
सत्तेत दुय्यम पद घेण्यापेक्षा अन्य मंत्र्यांनी शपथ घ्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली, मात्र त्यास शिवसेनेच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला.

शिंदे यांनी मंत्रिमंडळाबाहेर राहू नये यासाठी बुधवारपासून स्वपक्षातून प्रचंड दबाव होता. गुरुवारी दुपारी गिरीश महाजन यांनीही शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. शिंदे हे अखेरपर्यंत मंत्रिमंडळात सहभागी होण्यास राजी नव्हते, त्यामुळे उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे ,अन्यथा शिवसेनेचा कुणीही आमदार शपथ घेणार नाही असे जाहीर केले. त्यामुळे शिंदे यांनी शपथ घेतली.

आझाद मैदान परिसर सकाळपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यांनी फुलून गेला होता. भगवे कपडे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, आझाद मैदान, मंत्रालय, नरिमन पॉइंट परिसरांत मोठी गर्दी झाली होती. शपथविधी सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता.

भगव्या पडद्यांनी आच्छादलेल्या या शामियान्यात तीन व्यासपीठ बनविले होते. एका व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे आणि सर्वधर्मीय संत, दुसऱ्या व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम, तर मुख्य व्यासपीठावर शपथविधी सोहळा पार पडला. मुख्य व्यासपीठासमोर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची आसनव्यवस्था केली होती. या वेळी आमदार, खासदार, महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती, उद्योजक आणि सिनेसृष्टीतील व्यक्ती उपस्थित होत्या.

विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी ‘लाडक्या बहिणीं’ना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. यांच्यासह अंबानी कुटुंबीय या वेळी पहिल्या रांगेत बसले होते. त्यांच्यामागे मर्चंट कुटुंबीय, कुमार बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, अभिनेते शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, यांच्यासह क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, दिलीप संघवी, अनिल अंबानी, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर, बिरेंद्र सराफ, अनिल काकोडकर यांच्यासह महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होते.सोहळ्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ‘एक है तो सेफ है’ लिहिलेले टी-शर्ट परिधान केले होते. हा सोहळा शासकीय असला तरी सोहळ्यावर भाजपची पूर्ण छाप होती.

Mahayuti
Mahayuti Oath Taking : महायुतीचा शपथविधी झाला; शेतकऱ्यांना पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळणार?

सांस्कृतिक कार्यक्रमात हिंदुत्व

शपथविधी सोहळ्याआधी उजव्या बाजूच्या व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात धार्मिक गीतांसह नेत्यांवरील गाणी सादर करण्यात आली. प्रसिद्ध गायक कैलाश खेर, अजय-अतुल आणि अन्य कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सुहास सावंत यांनी ‘देवा भाऊ’ हे गाणे सादर केल्यानंतर उपस्थितांनी दाद दिली. या वेळी अमृता फडणवीस यांच्या आवाजातील आणि अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले गाणेही सादर करण्यात आले.

पंतप्रधान मोदी, शहा, योगींच्या एंट्रीला जल्लोष

शपथविधी सोहळ्यासाठी मुख्य व्यासपीठावर गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन होताच उपस्थितांनी मोठा जल्लोष केला. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या आगमनावेळीही त्यांचा चेहरा स्क्रीनवर दिसताच मोठा जल्लोष झाला. त्यानंतर आलेल्या पंतप्रधान मोदी यांचे स्वागत कार्यकर्त्यांनी ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा देऊन केले.

शिंदे यांनी केले बाळासाहेबांचे ‘स्मरण’

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार अस्त्विात आल्यानंतर बहुतांश नेत्यांनी आपले नेते आणि श्रद्धा असलेल्या व्यक्तींच्या नावाचा शपथ घेण्यापूर्वी उल्लेख केला होता. गुरुवारी या प्रसंगाची आठवण एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्या वेळी करून दिली. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर राज्यपालांनी त्यांना शपथ दिले. तर अजित पवार यांनी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो, की असे म्हणत शपथ घेतली.

दिग्गजांची उपस्थिती

या सोहळ्यास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, सुब्रमण्यम गोस्वामी, आश्‍विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, जीतनराम मांझी, राजीव रंजन सिंग, जोतिरादित्य शिंदे, चिराग पासवान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री महेंद्र यादव, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह ओडिशा, गोवा, उत्तराखंड, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com